संजय गुरव - कात्रणांच्या छंदातून शेतीपर्यंतचा प्रवास
संजय मारुती गुरव हे ‘सिक्युरिटी’ (वॉचमन) म्हणून काम करत. मात्र त्यांचा ओढा सेंद्रीय (शेती) उत्पादने याकडे होता. त्यांना १९९४ पासून वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके यांमधून त्या विषयावरील माहिती जमा करण्यासाठी कात्रणे काढण्याचा छंद लागला. कात्रणे जमा करताना त्यांनी त्या माहितीच्या आधारे शेती करण्याचा ध्यास मनी जपला. त्यांच्या त्या छंदाबद्दल 2010 साली 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'वर लेख प्रसिद्ध झाला. तो लेख वाचून 2012 साली काही व्यक्ती गुरव यांच्या संपर्कात आल्या आणि एका व्यक्तीने त्यांना त्यांची अठ्ठावीस एकर जमिन कसण्यासाठी दिली. आज गुरव त्या जमिनीवर शेतीतील वेगवेगळे प्रयोग करत आहेत. गुरव यांचा ध्यास प्रत्यक्षात उतरवण्यासाठी 'थिंक महाराष्ट्र' वेबपोर्टल सहाय्यभूत ठरले हे या घटनेचे विशेष!
गुरव गेल्या दोन दशकांहून अधिक काळ छंदापायी विविध प्रकारची वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, पुस्तके जमा करत आहेत. ते कोणाकडून शेतीबद्दल माहिती मिळताच किंवा त्यांच्या नजरेस शेती विषयावरील लेख अथवा पुस्तक दिसताच ते प्राप्त करण्यासाठी धडपड करू लागतात. ते एकोणपन्नास वर्षांचे आहेत. त्यांनी शालेय परीक्षा (दहावी) तांत्रिक विषयासह उत्तीर्ण केलेली आहे.