भारतीय कृषिअर्थशास्त्राचे प्रणेते पी.सी. पाटील
पांडुरंग चिमणाजी पाटील हे महाराष्ट्रातील ख्यातनाम कृषितज्ज्ञ. ते जुन्या मुंबई राज्याचे पहिले भारतीय कृषी संचालक; तसेच, पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य. त्यांनी कृषी अर्थशास्त्र या विषयात महत्त्वाचे कार्य केलेले आहे. ते पी. सी. पाटील या नावाने ओळखले जात. त्यांचा जन्म 19 जून 1877 रोजी साळशी (तालुका शाहुवाडी, जिल्हा कोल्हापूर) या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे गाव वडगाव. तेथून पाच मैलांच्या अंतरावर असलेल्या सरूडच्या शाळेत त्यांचे चौथ्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण झाले. त्यांनी पुढील शिक्षण कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये घेतले. ते मॅट्रिक 1899 साली झाले. शाहू महाराजांनी त्यांना बोलावून घेऊन कौतुक केले व पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते शाहू महाराजांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या मराठा बोर्डिंगमध्ये राहिले. ते त्या बोर्डिंगचे पहिले विद्यार्थी, महाराजांचे त्यांच्यावर विशेष लक्ष होते. त्यांनी पीईची परीक्षा पास झाल्यावर पुण्याच्या कृषी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. ते शेतकीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 1905 साली झाले.