सेवालय - एका प्रार्थनेची गोष्ट
‘‘इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर हो ना...’’
चिमणीसारखी असलेली चिमणी, विश्वास, गायत्री, अनिकेत, सोनाली, अक्षय ....सारेजण डोळे मिटून प्रार्थना म्हणत असतात. त्यांना पाहून इकडे कितीही प्रयत्न केले तरी माझे डोळे मात्र पुन:पुन्हा भरून येतात! ओळखीच्या त्या शब्दांमागे दडलेले वेदनेचे अर्थ कमालीचे अस्वस्थ करत जातात.
चिमणी, धीरज – वय वर्षे सहा, विश्वास – वय वर्षे सात, गायत्री – वय वर्षे आठ आणि इतर अठरा जण. ‘सेवालया’त एकूण पंचवीस मुले-मुली आहेत. ही सारी चिमुरडी HIV+ आहेत. रवी बापटले यांनी या निष्पाप जिवांचे मायबाप होत, त्यांची शैक्षणिक-सामाजिक जबाबदारी उचलत स्वतःला ‘सेवालय’ प्रकल्पास वाहून घेतलेले आहे. हा माणूस ‘दैनिक संचार’ या वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधीपद आणि ‘एमआयटी’ सारख्या नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकी सोडून चार वर्षांपासून ‘सेवालय’च्या माध्यमातून ह्या मुलांसाठी काम करतोय.