वेदकाळात भूमापन दोरीने होत असे. दोरीवर मोजमाप करण्याकरता सम अंतरावर काही खुणा असत, त्यांना मात्रा म्हणून संबोधत. ह्याच शुल्बसूत्रांच्या आधारे भूमापन, वास्तू, रंगमंच, मंदिरे, प्रासाद व अनेक शिल्पे यांचे मापन होऊन त्यानुसार ती बांधली जात असत. त्याच बरोबरीने शुल्बशास्त्राचा खरा उपयोग झाला तो वैदिक काळात: यज्ञवेदी बांधणे, यज्ञकुंडाचे मोजमाप करणे व यज्ञमंडपाचे मोजमाप करणे यासाठी. यज्ञवेदीचे व चितीचे आकार हे चौकोनी, त्रिकोणी व वर्तुळ असे असत, किंवा यज्ञवेदी पक्षाच्या आकाराच्यादेखील असत. जरी आकार निरनिराळे असले तरी ते समक्षेत्रफळाचे असावेत असा दंडक होता, निरनिराळ्या यज्ञांकरता वेगवेगळ्या वेदी बांधल्या जात असत व जसा यज्ञाचा हेतू तसे त्यांचे आकारमानही मोठे होत जाई, प्रचंड अशा वेदी बनवाव्या लागत. क्षेत्रफळ वाढत असे पण त्याचे प्रमाण मात्र ठरलेले असे, वेदी प्रमाणाच्या बाहेर गेल्या, की ज्या कारणाकरता यज्ञ आखला गेला असे, ते कारण वा तो हेतू मुळी साध्यच होत नसे. त्यामुळे वेदी किंवा चिती आखण्याचे काम अतिशय प्रमाणबध्द असे.
अशी ही शुल्बसूत्रे, की ज्यांमध्ये अनेक प्रमेये तयार झाली, त्यांच्यासाठी सूत्रांची रचना झाली. ही प्रमेये खगोलविज्ञान, यज्ञशास्त्र, अवकाशशास्त्र यांतील लांबी, रुंदी, व्यास, परीघ, त्रिज्या ठरवणे, गतीची गणिते करणे यांसाठी वापरली गेली.