अमेरिकेत नृत्यझलक, नाट्यदर्पण आणि अशोक चौधरी
मराठी माणसे अमेरिकेत येऊन स्थायिक होणाऱ्या भारतीयांत फक्त पाच टक्के आहेत. बहुसंख्य लोक गुजराती व दक्षिण भारतीय आहेत. साधारणतः अनुभव असा, की अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या पहिल्या पिढीतील भारतीय लोक सांस्कृतिक स्तरावर वेगवेगळे भाषिक समाज व संघटना करून राहतात. ती मंडळी त्यांची भारतात गोठलेली तीच संकुचित वृत्ती धरून सारा जन्म काढतात. अशोक चौधरी नावाचे गृहस्थ त्या मंडळींना त्यांच्या त्या भिंती फोडून एकत्र आणण्याचे कार्य मराठी समाजासाठी गेली दहा वर्षें करत आहेत. चौधरी पुण्याचे. त्यांनी आय.आय.सी.मधून Organic Chemistry विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांचे पेपर्स रेडियो फार्माशुटिकल्स ह्या विषयावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या नावाने पाच पेटंट्स आहेत. ते न्यू जर्सीतील जगप्रसिद्ध फ़ार्माशुटिकल कंपनीत (Siemans मध्ये) मोठ्या हुद्यावर आहेत.