भारतातील एकमेव सांदण दरी!
नगर जिल्ह्याच्या पश्चिम घाटातील सांदण दरी हा एक आगळावेगळा भू-आकार आहे. ती त्या प्रकारची भारतातील एकमेव तर आशिया खंडातील क्रमांक दोनची दरी समजली जाते. तशी पाटी ‘महाराष्ट्र वनविभागा’ने तेथे लावली आहे. परंतु दऱ्यांचे नंबर वन-नंबर टू वेगवेगळ्या प्रकारे – म्हणजे लांबी, रुंदी, खोली अशा – वर्णन केले जातात व त्यांवरून दरीची भव्यता लक्षात येते, इतपतच नंबराचे महत्त्व. जमिनीला पडलेली दीड किलोमीटर लांबीची मोठी घळ म्हणजे ती सांदण दरी. स्वाभाविकच, सांदण दरीची लांबी पंधराशे मीटर असून रुंदी दरीच्या बाजूला पन्नास मीटर तर उगमाच्या बाजूला चार मीटर इतकी आहे. दरीची खोली अंदाजे शंभर ते दीडशे मीटर असावी. ती दरी एवढी अरूंद आहे, की दरीत काही ठिकाणी सूर्यप्रकाशदेखील पोचत नाही. दरीला 'सांदण' या नावाने ओळखले जाते, त्याचे कारण त्या दरीचा आकार - तेथे जणू दोन डोंगरांचे कडे एकमेकांना सांधले (जोडले) जातात. तसे दृश्य तेथे दिसते. दोन उंच कडे एकमेकांच्या जवळ आणून ठेवलेले दिसतात. सांदण दरीचे स्वरूप पाहून ती दरी कशी तयार झाली असावी हा प्रश्न थक्क करतो. ती दरी प्रस्तरभंगामुळे किंवा प्रचंड झिजेमुळे तयार झाली असावी असा तर्क आहे. दरी ‘बसॉल्ट’ खडकासारख्या ‘हार्ड रॉक’पासून तयार झाली आहे.