डोंबिवली ग्रंथ संग्रहालय गेल्या काही वर्षांत पुन्हा चैतन्यमय झाले; तेथे अनेक उपक्रम होऊ लागले, वाचकांची वर्दळ वाढली. सुधीर बडे यांच्या नेतृत्वाखाली काही ज्येष्ठ नागरिकांनी या वाचनालयास आकार प्राप्त करून दिला. एका छोट्या खोलीपुरते उरलेले वाचनालय इमारतीच्या पूर्ण मजल्यावर पसरले. वाचकांची वर्दळ वाढली. महाराष्ट्रात ग्रंथालयांची दीडशे वर्षांची परंपरा आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या आणि महत्त्वाच्या तालुक्याच्या ठिकाणी वाचनालयाची जुनी, मोठी इमारत असते. तेथे परंपरानिष्ठ नित्यनियमाने पुस्तके बदलून नेत असतात. गावातील काही मोकळे लोक वर्तमानपत्रे चाळत बसलेले असतात. सेवकवर्ग या वाचकांना नियमावलीप्रमाणे सेवा पुरवून उत्साहाने रजिस्टरे भरत असतो आणि पदाधिकारी त्यांच्यावर आलेली जबाबदारी कार्यनिष्ठेने पार पाडत असतात. त्यातून वार्षिक व्याख्यानमाला घडत असतात. स्मरणदिवस ‘साजरे’ होतात. सरस्वती पूजनादी परंपरा सांभाळल्या जातात, परंतु गावातली एकेकाळची गजबजलेली ही ठिकाणे उदास भासतात, बृद्ध जाणवतात. तेथे चैतन्य नसते, तारुण्याची सळसळ जाणवत नाही.
दादरचे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय. मराठीतील जवळजवळ प्रत्येक पुस्तक तेथे पाहायला मिळते. संदर्भ विभाग चोख आहे. सेवक तत्पर आहेत. पदाधिकारी वातावरणात साज आणायच्या प्रयत्नात असतात. परंतु संग्रहालयाचा कट्टा म्हणून एकेकाळी असलेली या वास्तूची महती केव्हाच हरपली आहे ! ‘काही नाही तर कट्ट्यावर चल’ ही वृत्ती लोप पावली आहे. या कट्ट्यावरच नारायण सुर्वे मोठे झाले. त्यांची प्रागतिक लेखक सभा उदयास आली व तिचे संवर्धन झाले.
राजा राममोहन रॉय प्रतिष्ठान व सरकार यांच्या देणग्यांमधून ग्रंथालयांना सुगीचे दिवस आले आहेत. जागा जुन्या असल्यामुळे ‘रिअल इस्टेट’चा भाव वधारला आहे, परंतु तेथील उपक्रमशीलता लोपली आहे. गावच्या सांस्कृतिक जगाचे व्यासपीठ म्हणून असलेला त्यांचा लौकिक नाहीसा झाला आहे. गावच्या संस्कृतीचे हे केंद्र नागरिक व वाचक तिकडे ओढला जात नसल्याने ‘बाजूला’ पडले आहे.