बल्लाळेश्वर गणपतीचे पाली
पाली हे गाव मुंबई-गोवा हायवेवर नागोठण्यापासून आतमध्ये दहा किलोमीटरवर आहे. तेथे खोपोलीमार्गेही जाता येते. ते सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. गावात मामलेदार कायार्लय, न्यायालय, बी.डी.ओ. ऑफिस आणि सर्व प्रकारची सरकारी कार्यालये आहेत. गावात अष्टविनायक गणपतींपैकी बल्लाळेश्वर गणेशाचे दगडी देवालय आहे. तेथे भाविकांची गर्दी असते.
पालीपासून सात किलोमीटर अंतरावर सुधागड नावाचा किल्ला आहे. सुधागड हे तालुक्याचे नाव आहे. गडावर भोराई देवीचे देऊळ व शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांपैकी एक पंतसचिव यांचा वाडा होता. वास्तविक ते पंतसचिव पुण्याजवळील भोर येथे राहत. (आजही त्यांचा राजवाडा देश स्वतंत्र होईपर्यंत ताब्यात होता). किल्ल्याजवळून एक वाट घाटमाथ्यावर (लोणावळ्याला) जाते व तेथून पुणे येथे जाता येते. गाव संस्थानाच्या ताब्यात असल्यामुळे इंग्रजी आमदानीतील अनेक सुधारणा तेथे पोचल्या नाहीत. ब्रिटिशांची हद्द नागोठण्यापासून होती. गावाची रचना लांबट उभी असून गावामध्ये समांतर असे दोन-तीन रस्ते आहेत. गावाची सुरुवात देऊळ वाड्यापासून होते.