भटक्या विमुक्त समाजामध्ये असा एक समाज आहे, की त्या समाजाकडे प्रत्येक कुळाची संपूर्ण माहिती मिळू शकते! तो हेळवी समाज होय. तो कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात व महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात काही गावांमध्ये आढळून येतो. तो कर्नाटकात चिक्कोडी, निपाणी, संकेश्वर, रायबाग, अथनी, गोकाक या तालुक्यांतील जोडकुरळी, नंदीकुरळी, पट्टणकडोली, चिंचणीमायाक्का, भिरडी, शेडबळ, सत्ती, गुंडखेत्र, हुक्केरी आदी गावांमध्ये व शहरांमध्ये; तसेच, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात आढळून येतो. तो समाज लिंगायत असल्याने त्यांचे धर्माचरण, चालीरीती, परंपरा लिंगायत समाजाप्रमाणे आहेत. मुत्तावर, हालनावर, टंकरावर, इरलावर व चन्नाबचावर अशा पाच कुळी त्या समाजात मानल्या जातात. समाज त्या पाच कुळांमध्येच विस्तारला गेला आहे. चिंचणी मायाक्का, उदगट्टी उद्धवा, कल्लोळी हनुमंता ही त्या समाजाची दैवते. सपाडल स्वामी हे समाजाचे गुरू आहेत. ते प्रत्येक समाजबांधवाच्या घरी वर्षातून एकदा जातात.