नवरात्रातील वडजाई
नवरात्राला गणेशोत्सवासारखे स्वरूप येत चालले आहे, पण आमच्या लहानपणी तसा प्रकार नव्हता; तरीही आम्ही नवरात्राची वाट कितीतरी आतुरतेने बघत असू! घटस्थापनेला घरोघरी घट बसवले जात. पहिली माळ, दुसरी माळ असे करता करता दहाव्या माळेला दसर्याचा, आनंदाला तोटा नसणारा सण दारात हजर होई.
ताई स्वयंपाकघरात जेथे दिवा विझणार नाही अशा कोनाड्यात घट बसवत असे. घराच्या भोवतीने काळ्या मातीत गहू पेरले जात. देवही त्या नऊ दिवसांत घटी बसत अन् ताईचे नवरात्राचे नऊ दिवसांचे उपवास सुरू होत. आम्हाला ओढ असे ती मात्र वडजाईच्या दर्शनाची.
वडजाई देवीचे मंदिर वडांगळी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. गंगावाटेला तामसवाडीकडे जाताना जुन्या पांढरीवर एका शेतातील चबुतर्यावर घरवजा धाब्याचे छत असलेले ते मंदिर! दहा बाय दहापेक्षाही छोटे. कळसाचा तोरा नसलेले..! (तोरा मिरवत नसलेले मंदिर) शेतात वस्ती करून राहणार्या एखाद्या शेतकर्याच्या घरासारखे. देवीच्या साधेपणाबद्दल कल्पना (मंदिर साधे) त्यावरून यावी. त्याच ठिकाणी जुने गाव वसलेले होते असे म्हणतात. त्यामुळे त्या ठिकाणाला पांढरी असे नाव पडले आहे. रस्त्याच्या पलीकडे जुन्या पांढरीवरील मारुतीचे छोटेसे मंदिर लक्ष्मण मास्तरांनी साकारलेले.
वडजाईची आठवण गावाला होते, ती नवरात्रात. एरवी, ती गावापासून दुर्लक्षित असते. देवीची छोटीशी दगडी मूर्ती, मंदिरासमोर चबुतर्यावर दगडी पादुका, देवीसमोर अखंड नऊ दिवस तेवणारा दगडी दिवा. घट मांडलेले. घटाभोवती हिरवे धने अन् आजुबाजूचा हिरवा शिवार. मुख्य रस्त्यापासून शे-दोनशे फूटांवर असलेल्या मंदिरात पीकांमधून वाट हुडकत जावे लागते.