देऊळ, लवासा आणि विकास


गरीब खेड्याच्या जवळ, उजाड माळरानावर, एकाकीपणे उभ्या असलेल्या उंबराच्या झाडाखाली जमिनीवर झोपलेल्या गुराख्याला अचानक दत्त दिसल्याचा भास होतो. बातमी खेड्यात पसरते. दत्ताचे देऊळ बांधायचा निर्णय होतो आणि बघता बघता गाव झपाट्याने बदलते. ग्रामस्थांच्या सहभागाने, सहकार्याने आणि कोणतेही विवाद उभे न करता देऊळ बांधले जाते. खेड्याकडे भाविकांचा ओघ सुरू होतो. जत्रा सुरू होते. देवस्थानच्या पैशांच्या रूपाने मिळकत होऊ लागते. देवळाच्या भोवतालच्या इतर दुकानांचा लिलाव करून व्यापार्‍यांना पाचारण केले जाते. खेड्यातील बायाबापड्यांना प्रसाद, फुले, माळ, हार ह्यांच्या छोट्या दुकानांच्या रूपाने विक्रीचा उद्योग मिळतो. लोकांच्या हातात पैसा खेळायला लागतो. देवळाच्या निमित्ताने पाण्याचे नळ येतात. वीजपुरवठा अखंड होतो. स्थानिक पुढार्‍यांचेही राजकीय वजन वाढते. त्यांच्या सत्तेचे वर्तुळ विस्तारते. सिनेमा इथेच थांबतो; परंतु नंतर काय होते ह्याची कल्पना करता येते.

देवस्थानाची भरभराट अशीच होत राहिली तर कालांतराने मोठे भांडवल साचते. अभिषेक आणि प्रसाद ह्यांच्या माध्यमातून जमा झालेले भांडवल भोजनसेवा, शाळा आणि शिक्षणसंस्था, दवाखाने आणि आरोग्यसेवा, पर्यटकांसाठी निवासस्थाने, तारांकित हॉटेल्स, स्पेशल बससेवा यांत गुंतवले जाते. शहरी श्रीमंत भाविकांसाठी हेलिकॉप्टरसेवा, प्रसिद्धिसेवा आणि कधी पर्यावरणसेवा सुरू होते. धार्मिक चित्रपट निघतात. मग भावभक्तीला तर नुसता पूर येतो. देशविदेशातून भक्तांचा आणि परदेशी चलनाचा धबधबा सुरू होतो. गावाचा नावलौकिक वाढतो.

‘देऊळ’ची अगाध लीला


‘देऊळ’ हा मराठी चित्रपट पाहत असताना ‘पिपली लाईव्ह ’ या हिंदी चित्रपटाची आठवण वारंवार होत होती, याचे कारण दोन्ही ठिकाणी आजच्या परिस्थितीतील विसंगतींचा हास्यकारक पद्धतीने शोध घेतला आहे. चित्रपटात प्रत्येक जागी हसताना हसावे की रडावे असा प्रश्न मनात निर्माण होत होता. ते उत्तम ब्लॅक कॉमेडीचे लक्षण आहे. ‘देऊळ’ पाहताना गदगदा हसू आले, तरी थिएटरबाहेर पडताना प्रेक्षक अंतर्मुख झालेला असतो. कोणत्याही चांगल्या कलाकृतीचा परिणाम हाच असतो.

 

‘देऊळ’ पाहताना त्याचे दोन विशेष जाणवतात- गिरीश पांडुरंग कुळकर्णी यांचे लेखन आणि सुधाकर रेड्डी यांनी कॅमेर्‍यामधून केलेले काम. येथे मी दिग्दर्शक उमेश कुळकर्णी याचे नाव घेतलेले नाही. हेदेखील विसंगतच ठरते, की चित्रपट बघितल्यानंतर दिग्दर्शकाची कामगिरी नजरेत न भरणे! परंतु गिरीश कुळकर्णी यांनी चित्रपट चटपटीतपणे, परिस्थितीवर नेमके भाष्य करत लिहिला असल्याने तो प्रेक्षकाला खेचून नेतो.