पंढरीचे बदलते स्वरूप (Pandharpur)
माझा जन्म पंढरपूरचा. आम्ही पेशव्यांचे पुराणिक. त्यांनीच आम्हाला पंढरपूर गावात नदीकाठी घोंगडे गल्लीत पन्नास खणी वाडा व नदीपलीकडे शंभर एकर जमीन दिली. माझी आई ही श्री रुक्मिणीदेवीच्या सेवाधारी उत्पात समाजातील.
मूळ पंढरपूर गाव हे चंद्रभागेच्या काठावर हरिदास, महाद्वार आणि कुंभार अशा तीन वेशींत वसलेले होते. विठ्ठल मंदिरासभोवतीचा प्रदक्षिणा रोड ही पंढरपूर गावाची सरहद्द! पंढरपूर गाव हे आदिलशाहीत असल्याने, विजापूरच्या दिशेचा नदीकाठचा भाग आधी विकसित झाला. दत्त घाट, महाद्वार घाट ते कालिका मंदिर हा रस्ता ‘विजापूर रस्ता’ म्हणून प्रसिद्ध होता. तेथेच गावचा बाजार भरत असे. त्या रस्त्यावर अहिल्याबाई होळकर, सरदार खाजगीवाले, शिंदे सरकार, जमखंडीकर, पटवर्धन राजे आदींचे वाडे आहेत. अहिल्याबाई होळकर यांचा वाडा बांधून झाला, तेव्हा तो ‘पाहण्यास या’ म्हणून इंदूरला निरोप धाडला गेला. अहिल्याबाई युद्धाच्या मोहिमेवर असल्याकारणाने, त्यावेळी त्या स्वतः येऊ शकल्या नाहीत. परंतु त्यांनी त्यांच्या संस्थानातील एक गजराज पंढरपूरला पाठवला. माहुताने त्या गजराजाला वाड्याच्या माळवदावर (गच्चीवर) फिरवून बांधकाम मजबूत असल्याची खात्री करून घेतली आणि तसा निरोप अहिल्याबाई यांना पाठवला.