महाराष्ट्र : भविष्यातील अंधार भेडसावतो!
महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राच्या स्थापनेला 2019 मध्ये साठ वर्षें पूर्ण झाली. त्या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रांतील अभ्यासकांशी चर्चा केली. करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. प्रदीप मोहिते म्हणाले, महाराष्ट्र राज्याची निर्मिती मोठ्या त्यागातून आणि बलिदानातून झाली. काही राज्यकर्त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आखला होता. त्याला त्यावेळी नेते एस एम जोशी, आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख आदींनी विरोध केला आणि मोठा लढा उभा राहिला. त्यातून जे रणकंदन माजले, विचारमंथन झाले, त्यामधून त्या काळात महाराष्ट्रात मोठे प्रबोधन आणि जागृती घडून आली. मोहिते यांनी पुढे बोलताना सांगितले, की त्यासाठी एकशेसहा लोकांना त्यांचा प्राण गमावावा लागला. त्या आंदोलनाला यश आले व मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी सूत्रे हाती घेतली. यशवंतराव चव्हाण हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील नेतृत्व होते.