कवितेचे कुसुमाकर (Kusumakar)
मराठीत नियतकालिके अनेक प्रकाशित होत असतात. काही नियतकालिके काळाच्या ओघात बंद पडली; काही नवी सुरू होतात, तरी हाताच्या बोटांवर मोजता येणारी ठरावीक नियतकालिके संपादक-मालक यांच्या चिकाटीच्या प्रयत्नांनी सुरू आहेत. त्यांचीही अवस्था फार काही ठीक नाही. ती सर्व नियतकालिके सहसा साहित्याशी संबंधित अशा व्यक्तींनी किंवा संस्थांनी सुरू केलेली आहेत. त्यातीलच ‘कुसुमाकर’ हे मासिक. त्याने त्याचे वेगळेपण जपले आहे. ‘कुसुमाकर’ म्हणजे भ्रमर, फुलांच्या भोवती सतत फिरणारा, परागकण आणि मध गोळा करणारा. मात्र हा ‘कुसुमाकर’ थोडा वेगळा आहे. कवितेत रमणाऱ्या एका मुसाफिराने सुरू केलेले ते लहानसे मासिक आहे. त्या मुसाफिराचे नाव आहे श्याम पेंढारी.
पेंढारी यांनी त्यांचे ‘कुसुमाकर’ कवितेच्या ओढीने सुरू केले. ते त्याच निष्ठेने ते मासिक गेली एकोणीस वर्षें प्रसिद्ध करत आहेत. ते ‘कुसुमाकर’मध्ये केवळ कविता नाही तर विविधांगी साहित्य प्रसिद्ध करतात. त्यांनी ‘कुसुमाकर’चे सात-आठ दिवाळी अंक प्रकाशित केले. आता दिवाळी अंक, जाहिरातींअभावी प्रकाशित करता येत नाही. म्हणून ते दोन महिन्यांचा जोड अंक (ऑक्टोबर-नोव्हेंबर 2018) दिवाळी विशेषांक या नावाने प्रकाशित करतात. ते म्हणाले, की ‘दुधाची तहान ताकावर!’