देवगिरीचे यादव साम्राज्य
यादव घराण्याचा उदय महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाला. कल्याणीचे चालुक्य व चोल यांच्या साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर ते घडून आले. यादववंशीय राज्यकर्ते त्यांना स्वत:ला श्रीकृष्णाचे वंशज समजत. यादव शासक राष्ट्रकूट व चालुक्य यांचे सामंत होते.
त्या वंशाचा संस्थापक दृढप्रहार होता. त्याने व त्याचा पुत्र सेऊणचंद्र (इसवी सन ८८० - ९००) यांनी स्वत:चे वेगळे अस्तित्व राष्ट्रकूट सत्तेतील अराजकाचा फायदा घेऊन निर्माण केले. पाचवा भिल्लम (११७३ - ११९२) याने स्वतंत्र यादव सत्तेची स्थापना केली. त्याने त्याची राजधानी सोमेश्वर चौथा या चालुक्य शासकाचा पराभव करून देवगिरी (दौलताबाद) येथे स्थापन केली. भिल्लमच्या मृत्यूनंतर पहिला जैतुगी व दुसरा सिंघण (सिंघणदेव इसवी सन १२०० – १२४७) सत्तेवर आले. दुसरा सिंघण याच्या काळात यादव सत्ता परमोत्कर्षास पोचली. सिंघणाने उत्तरेस गुजराथचे चालुक्य व माळव्याचे परमार यांच्या विरूद्ध आक्रमणे केली. संगीततज्ज्ञ ‘सारंगदेव’ त्याच्या दरबारी होता. त्याने ‘संगीतरत्नाकर’ हा ग्रंथ लिहिला. सिंघणदेवने त्याच्या ग्रंथावर टीका लिहिली होती. ज्योतिषी चांगदेव हाही त्याच्या आश्रयास होता.