महाविद्यालये - हरपले अवकाश आणि सृजनाच्या संधी!
‘स्टाफ-रूम’ नावाचा ‘संवादवर्ग’ महाविद्यालयांमधून हरवत चालल्याची विषण्ण जाणीव ज्येष्ठ प्राध्यापकांमध्ये आहे. स्टाफरूममधील प्राध्यापकांची चैतन्यमय उपस्थिती, गप्पांचे अनौपचारिक (शैक्षणिक) फड, वादविवाद, चर्चा या गोष्टी नवोदित प्राध्यापकांसाठी कार्यशाळा असत. स्टाफरूम, वाचनालय, कँटीन, जिमखाना यांसारख्या अनौपचारिक जागा शिक्षणक्षेत्रात आक्रसत चालल्या आहेत. त्या जागा म्हणजे सिनियर्सच्या ज्ञानाचे-अनुभवाचे आदानप्रदान असे. पण सध्या हातातील पुस्तके जाऊन तेथे आलेल्या मोबाईलशी चाळा करत महाविद्यालयांमधील अरुंद जागांमध्ये होणाऱ्या प्राध्यापकवर्गाच्या जुजबी गप्पा या बहुतांश वेळा निरर्थक विषयांवर सुरू होऊन आर्थिक विषयांवर संपतात.