सोलापूरचे फरारी डॉक्टर कृ.भी. अंत्रोळीकर (Solapur’s freedom fighter Doctor K.B. Antrolikar)

0
261

सोलापूरचे स्वातंत्र्यसैनिक डॉ. कृ.भी. अंत्रोळीकर हे राष्ट्रीय चळवळीकडे विद्यार्थिदशेतच ओढले गेले होते. अंत्रोळीकर यांना गांधीजींची धडपड नेमकी भावली होती. गांधीजींचे सारे प्रयत्न सामान्यातील सामान्य माणूस त्या चळवळीत समाविष्ट करावा यासाठी होती. त्यामुळे अंत्रोळीकर यांनी आयुष्यभर तो मार्ग अनुसरला. तोपर्यंत सोलापूरमधील चळवळ ही प्रामुख्याने उच्च शिक्षितांची होती. त्यामुळे तिला काही मर्यादा होत्या. सोलापूरात मोठ्या प्रमाणावर असणारा कामगार वर्ग हा असंतुष्ट होता, तरी त्या असंतोषाला दिशा नव्हती. अंत्रोळीकर यांनी ती दिशा देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांचे सोलापूरच्या चळवळीमधील महत्त्व अनन्यसाधारण आहे. सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सोलापूरात जे काही आगळेवेगळे स्वरूप व गती आली त्यामागे अंत्रोळीकर यांची बुद्धी होती. साम्राज्यशाहीला शक्य झाले असते तर सोलापूरच्या चार सुपुत्रांबरोबर अंत्रोळीकर यांनाही फासावर चढवले असते. ब्रिटिशांनी अंत्रोळीकर यांना जंग जंग पछाडले, पण डॉक्टर ब्रिटिशांना पुरून उरले.

सोलापूरच्या कापड गिरणी कामगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी 1920 साली संप पुकारला, दीर्घ काळ चाललेले ते आंदोलन चिघळले आणि त्याचा शेवट सरकारने लष्कराला पाचारण करून कामगारांवर गोळीबार करण्यात झाला. त्या गोळीबारात नऊ कामगार ठार झाले. अंत्रोळीकर यांनी असंघटित अशा सोलापूरच्या कापड गिरणी कामगारांना प्रथम संघटित केले, ते मजूर संघाच्या माध्यमातून. अंत्रोळीकर त्या मजूर संघाचे अध्यक्ष बनले. त्यांनी ती एकवटलेली ताकद राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहाला आणून जोडली. ‘गजनफर’ साप्ताहिकाचा संपादक अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हा त्याच मजूर संघाचा सेक्रेटरी ! तो अंत्रोळीकर यांचा कल्याणशिष्य (गुरुला अत्यंत प्रिय असणारा व गुरुवर पराकोटीची श्रद्धा असणाऱ्या शिष्याला कल्याणशिष्य असे विशेषण लावले जाते. समर्थ रामदास स्वामी व त्यांचे शिष्य कल्याणस्वामी (दासबोधाचा लेखक) यावरुन हा शब्द प्रचलित झाला.). फासावर जातानादेखील त्याच्या ओठांवर अंत्रोळीकर यांचेच नाव होते. राष्ट्रीय युवक संघाची सोलापूर शाखा अंत्रोळीकर यांनीच सुरू केली होती. ते त्या युवक संघाचेही अध्यक्ष होते. हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांच्यासारखे अभ्यासू कार्यकर्ते युवक संघातच घडले !

स्वातंत्र्यसैनिकांच्या मेळाव्यात झेंडावंदनप्रसंगी डॉ.कृ. भी.अंत्रोळीकर, त्यांच्या समवेत स्वा. सै.बसवंत, कवी कुंजविहारी, राजाराम बुगरुल, सिद्रामप्पा फुलारी.

अंत्रोळीकर हे गुढीपाडवा, शिमगा, शिवजयंती अगर चौडम्मा देवीचा उत्सव या प्रत्येकाची सांगड राष्ट्रीय चळवळीशी लावत राहिले. गुढीपाडव्याला सोलापूरात घराघरांवर राष्ट्रीय निशाणे फडकत तर कुस्त्यांच्या दंगलीतील विजयी पैलवान बादली फेट्याऐवजी गांधी टोप्या घालून मिरवले जात, ती किमया फक्त सोलापूरात घडली. ती घडवणारे किमयागार होते अंत्रोळीकर ! राष्ट्रीय निशाण आणि गांधी टोपी ही सोलापूरकरांच्या अस्मितेची प्रतीके बनली, ती एवढी की लष्कराला ‘मार्शल लॉ’च्या काळात राष्ट्रीय निशाणे उपटणे व गांधी टोप्या हिसकावणे एवढी दोनच कामे करावी लागली ! नागपूरच्या झेंडा सत्याग्रहाप्रमाणे सोलापूरचा झेंडा सत्याग्रह देशभर गाजला, तर सोलापूरच्या गांधी टोपीची चर्चा इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये झाली.

अंत्रोळीकर यांचे घर

सविनय कायदेभंगाच्या चळवळीत अंत्रोळीकर यांनी साधलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सोलापूरच्या राष्ट्रीय चळवळीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढवला. त्यासाठी त्यांना त्यांच्या पत्नीचा मोठा सहभाग लाभला. इंदिरा अंत्रोळीकर यांनी पहिली महिलांची फेरी हातात राष्ट्रीय निशाण घेत काढली आणि सोलापूरच्या लेकी-सुना मिठाच्या सत्याग्रहात उतरल्या ! येसुबाई केळकर यांनी चौपाडातील जुन्या विठ्ठल मंदिरात झालेल्या महिलांच्या खास सभेत गांधीजींच्या चळवळीविषयीचा निबंध वाचून दाखवला. त्यावरून डॉक्टरांनी महिलांमध्ये केलेली जागृती व त्यांनी दिलेली प्रेरणा कशी होती त्याचा अंदाज येऊ शकेल. इंदिरा अंत्रोळीकर यांना सोलापूरच्या पहिल्या महिला सत्याग्रही होण्याचा मान लाभला.

अंत्रोळीकर यांना वक्तृत्वाची देणगी लाभली होती. ‘मार्शल लॉ’ पूर्वकाळात अक्षरशः असा दिवस सांगता येणार नाही, की ज्या दिवशी डॉक्टरांचे भाषण झाले नाही. डॉक्टरांच्या भाषणाचे विषय स्वदेशी आणि सद्यस्थिती हे प्रामुख्याने असत. त्यांनी ‘नरवीर’ या पत्राची घोषणादेखील केली होती, पण ‘मार्शल लॉ’च्या धामधुमीत तो योग आला नाही.

सरकारने अंत्रोळीकर यांना पोलिस खुनाच्या खटल्यात अडकावण्याचा बराच प्रयत्न सोलापूरच्या चार आरोपींसोबतच केला. मग त्यांना कोर्ट जळिताच्या खटल्यात अडकावले गेले. सरकार त्यांना पकडू शकले नव्हते. तेव्हा त्यांना फरारी म्हणून जाहीर केले. आश्चर्याची बाब म्हणजे फरारी डॉक्टर जाहीर व्याख्याने देत होते ! अखेर, ते स्वत: वेशांतर करून खेडुताच्या वेशात पोलिसांसमोर हजर झाले ! मग अटक, खटला व शिक्षा हे सारे सोपस्कार पार पडले. त्यांना सक्तमजुरीची शिक्षा दहा वर्षे ठोठावली गेली. डॉक्टर गांधी-आयर्विन समेटानंतर सुटले व पुन्हा राष्ट्रकार्याला लागले. सविनय कायदेभंगाच्या चळवळीपूर्वी व त्यानंतर सोलापूरात राष्ट्रीय जाणिवेचा जो एक जोरकस प्रवाह निर्माण झाला त्यामागे त्यांचे मोठे योगदान होते.

(झेंडा सत्याग्रह – सोलापूरात  मार्शल लॉ जारी होताच गांधी टोपी व राष्ट्रीय निशाणाला बंदी घालण्यात आली. सोलापूरात राष्ट्रीय निशाण फडकावणे हा कायद्याने गुन्हा झाला होता, म्हणून महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीने सोलापूरात राष्ट्रीय निशाण फडकवण्यास स्वयंसेवकांच्या तुकड्या पाठवण्यास सुरुवात केली. त्या सत्याग्रहींना लष्कराने अमानुष मारहाण केली. सोलापूरात 28 मे पासून 3 जूनपर्यंत 51 सत्याग्रही आले. पुण्याहून 11 जूनला 121 सत्याग्रही आले, तर बंगळोरहून 120 सत्याग्रही आले. हा सत्याग्रह चर्चेचा विषय झाला व देशभर गाजला. सोलापूरला रोज येणारे सत्याग्रहींचे जत्थे ही लष्कराला एक डोकेदुखीच झाली होती. मार्शल लॉ संपल्यानंतर हा झेंडा सत्याग्रह संपुष्टात आला.)

 अनिरुद्ध बिडवे (0218) 2220430, 9423333912

bidweanirudha@gmail.com

‘अनुप्रभा’, 1873, महेन्द्रनगर करमाळा, (सोलापूर) 413203