सतरावे साहित्य संमेलन (Seventeenth Marathi Literary Meet – 1931)

हैदराबाद येथे भरलेल्या सतराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानकोशकार डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर हे होते. केतकर हे मराठी भाषेतील कोशयुगाचे प्रवर्तक होत. त्यांचे आयुष्य ज्ञानाच्या उपासनेतच व्यतित झाले. त्यांनी गोविंदपौत्रया टोपणनावाने कविता लिहिल्या. त्यांनी ब्राह्मणकन्या’, ‘गोंडवनातील प्रियंवदा’, ‘आशावादी’, ‘विचक्षणा’, ‘भटक्या, ‘गावसासू’ आणि ‘परागंदा’ या सात कादंबऱ्या, ज्ञानकोशाचे खंड, स्त्री-सत्ता पराभव हे नाटक, महाराष्ट्राचा इतिहास हे दोन खंड, नि:शस्त्रांचे राजकारण हे राजकीय पुस्तक असे ग्रंथ लिहिले. मात्र केतकर हे ललित लेखक आणि कवी म्हणून मराठी वाङ्मयात ओळखले जात नाहीत.

त्यांना स्वत:च्या देशाबद्दल, स्वत:च्या भाषेबद्दल जाज्वल्य अभिमान होता. त्यांनी त्या भावनेनेच ज्ञानकोशाचे खंड सिद्ध केले. त्यासाठी त्यांनी नागपूरला 1916 साली मराठी ज्ञानकोश मंडळाची स्थापना केली. ज्ञानकोशाचा पहिला खंड 1921 साली प्रसिद्ध झाला. त्यांनी चार-पाच लाख रुपये त्या काळात कोशासाठी खर्च केले, पण एक प्रचंड ज्ञानकोश केतकर यांच्यामुळेच शक्य झाला. त्यांनी विद्यासेवक हे मासिक 1926 साली आणि त्यानंतर लगेचच पुणे समाचारनावाचे दैनिक काढले. तो सर्व पसारा त्यांनी एकट्याने मांडला होता. केतकर पुढे राजकारणात शिरले. त्यांनी स्वयंनिर्णयी संघकाढला. नि:शस्त्रांचे राजकारण हे पुस्तक लिहून त्या संस्थेतर्फे प्रसिद्ध केले.

श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म 2 जुलै 1884 रोजी रायपूर (मध्यप्रदेश-आता छत्तीसगढ) येथे झाला. मॅट्रिकनंतर त्यांनी थोडे दिवस मुंबईच्या विल्सन कॉलेज येथे शिक्षणासाठी नाव घातले, पण ते अर्धवट सोडून ते शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेत गेले आणि त्यांनी त्यांचे शिक्षण तेथेच पूर्ण केले. त्यांनी अमेरिकेतील विद्यापीठात भारतीय जातिसंस्थेचा इतिहास या विषयावर पीएच डी मिळवली. प्रबंधाचे अमेरिकेत कौतुक झाले. लंडनच्या एका प्रकाशकाने तो पुस्तक रूपाने प्रसिद्धही केला.

ते 1911 साली भारतात परत आले. त्यांनी कोलकाता येथे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून वर्षभर नोकरी केली. नंतर भारताच्या भटकंतीत त्यांना मद्रासमध्ये आंध्र विज्ञान सर्वस्वणहा तेलगू ज्ञानकोश पाहण्यास मिळाला व त्यांच्या डोक्यात मराठी भाषेत असा ज्ञानकोश निर्माण करावा अशी कल्पना आली. त्यांनी ज्ञानकोशाचे तेवीस खंड बारा वर्षांत प्रकाशित केले! यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने ‘केतकर ज्ञानकोश डॉट कॉम’ नावाची वेबसाईट 2013 साली प्रसिद्ध केली आहे.  

त्यांनी जर्मनविदुषीबरोबर विवाह केला. त्यांनी व्रात्यस्तोम यज्ञ करून पत्नीस हिंदू करून घेतले. त्या विदुषीचे नाव शीलवती. सेनापती बापट त्या विवाहात पुरोहित होते. केतकरप्रस्तावना खंडाच्या पहिल्या भागात म्हणतात, हिंदुधर्मातील संग्राहता राहिली असती तर महंमद पैगंबर हेही एक अवतार मानले गेले असते व अनेक पंथांप्रमाणे हा एक महंमदी पंथ हिंदुधर्मात राहिला असता.”

साने गुरुजी यांनी ज्ञानकोशासंदर्भात उद्बोधक गोष्ट लिहिली आहे. -“ज्ञानकोशाचे प्रस्तावना खंड बाहेर पडू लागले. त्यांचा महाराष्ट्रात अभ्यास व्हावा अशी डॉक्टरांची इच्छा. त्यांनी त्या भागांची परीक्षा ठेवली. मी पहिल्या भागाच्या परीक्षेसाठी बसलो होतो. निम्मे बक्षीस मला मिळाले.ते घेण्यास मी त्यांच्याकडे गेलो होतो. मी ते बक्षीसज्ञानकोश घेण्यासाठी खर्च करायचे ठरवले.” डॉक्टर मला म्हणाले, तुम्ही ज्ञानकोशाचे महाराष्ट्रात प्रचारक व्हा.’

“मी म्हटले, मी मुखदुर्बळ मनुष्य. कोणाला आग्रहाने सांगणे जमत नाही.’ ते म्हणाले, ‘अमेरिकेत जाण्यापूर्वी मी असाच होतो. परंतु आता संकोच सारा गेला. भीड गेली.’ त्या वेळची त्यांची मुद्रा अजून डोळयांसमोर आहे. तेअपार काम करत. ज्ञानकोशाचे खंड गडयाच्या डोक्यावर देऊन, दादर वगैरे भागात जाऊन ते खपवण्यासाठी खटपट करत. ते नेहमी म्हणायचे, ‘भरपूर पगार घ्या.भरपूर काम करा. आमचे प्राध्यापक कमी पगार घेऊन त्याग दाखवू बघतात. परंतु ज्ञानाच्या सीमा वाढवतील तर शपथ.'”

ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की राज्यकर्त्यांनी लोकांची भाषा विकसित होण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपली भाषा लादण्याचा खटाटोप करू नये. कोणत्याही राजसत्तेला लोकांची भाषा बदलता येणार नाही. लोकभाषेचे स्वरूप सत्ता बदलली असता थोडेसे बदलेल, पण तिचे मूळ स्वरूप नष्ट होणार नाही. केतकर पुणे येथे भरलेल्या दुसऱ्या शारदोपासक संमेलनाचेही (1927) अध्यक्ष होते. केतकर वयाच्या केवळ त्रेपन्नाव्या वर्षी पुण्याच्या ससून इस्पितळात एखाद्या सर्वसामान्य रूग्णाप्रमाणे मरण पावले. त्यांचा मृत्यू 10 एप्रिल 1937 रोजी झाला. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या पत्नीला शंभर रूपये उसने मागण्याची वेळ आली अशी नोंद त्यांच्या चरित्रात आहे.

वामन देशपांडे 91676 86695,अर्कचित्र सुरेश लोटलीकर99200 89488

——————————————————————————————————————–

About Post Author

3 COMMENTS

  1. ब्राह्मणकन्या फार सुरेखत्यांना आणि शीलवती बाईंना प्रणाम��������

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here