दापोलीतील सर्पसृष्टी (Serpents in Dapoli)

0
185

मी ‘संध्याकाळी सातच्या आत घरात’ हे पथ्य पाळू लागलो. ते प्रामुख्याने आसपासच्या परिसरात, अगदी आमच्या ‘अवंतिका’ सोसायटीच्या आवारातही सापांचे अस्तित्व होते व आहे म्हणून ! सर्पहत्या कोकणात खूप होत असत. त्याला दापोली तालुकासुद्धा अपवाद नाही. कारण सापांबद्दलची भीती व गैरसमजही कोकणी माणसांच्या मनात लहानपणापासून भरवले जातात. एखाद्या सापाचे नाव ‘नानेटी’ असे दापोली तालुक्यात घेतले जाते, पण झाडावरही आढळणारा हा साप खरेतर ‘हरणटोळ’ (व्हिपस्नेक) असतो. फार तर चाबूकसाप म्हणू. हरणटोळ हा माणसाच्या टाळूवर हल्ला करतो असा गैरसमज आहे. तो टाळलेला बरा !

अजगर बिनविषारी आहे हेसुद्धा माझ्या दापोलीच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना माहीतच नव्हते. खरे तर, घनदाट झाडी आहे, अशा परिसरात (उदाहरणार्थ सारंग, कळंबटकडील परिसर) अजगरांचे अस्तित्व असल्याचे माझे विद्यार्थीच सांगतात. अर्थात दापोलीलगतच्या गावातही अजगर निघू/दिसू शकतो. दापोलीतील निष्णात ‘सर्पमित्र’ मग ते सुरेश खानविलकर असतील किंवा जालगावातील किरण करमरकर असतील, त्यांनी अनेकदा मनुष्यवस्तीत, वाडीत, घरातही येणाऱ्या सर्पाला नीट हाताळून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. व्यावसायिक व्यापारी अरविंद देशमुख ह्यांनी तर दापोली तालुक्यात प्रात्यक्षिकांसह पूर्वी सर्पसृष्टीबद्दल प्रबोधनही केले होते. मंत्रशक्तीने जहरी सापाचे विष ‘उतरवता’ येत नाही अशा प्रकारचे शास्त्रीय सत्यही देशमुख मंडळी वेळोवेळी लोकांना सांगत आली. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’तर्फेही सर्पप्रदर्शन व सर्पविषयक ज्ञानजिज्ञासेचा कार्यक्रम यशस्वी झाला होता हे अनीश पटवर्धन यांनी सक्रिय कार्यकर्ते व आयोजक म्हणून सांगितले.

दापोली हा डोंगराळ व वनसृष्टीने बहरलेला तालुका असल्याने तेथील रहिवाशांना सर्पसृष्टीचा सहवास व भीतीही सतत राहिलेली आहे. भारताची जीवनशैली निसर्गानुकूल असली तरी वनस्पती व प्राणी सृष्टीविषयी भारतीय लोकांमध्ये खास प्रेम, आस्था दिसून आली नव्हती. ती पर्यावरणीय जाणीव आधुनिक काळात आली व पसरत गेली. तशी ती दापोलीतही तीन दशकांपूर्वी सारंग ओक यांच्या निमित्ताने आली. ते पुण्याचे सॉफ्टवेअर इंजिनीयर; व्यवसायानिमित्ताने आले आणि दशक-दोन दशके, दापोलीच्या जीवनाशी एकरूप झाले. त्यांनी तेथे सरपटणारे प्राणी वनसृष्टीत पुन्हा सोडण्याची गरज पटवून दिली आणि बघता बघता त्यांची सर्पमित्रांची ‘टीम’ येथे जमली. त्यात किरण करमरकर, सुरेश खानविलकर, ज्ञानेश्वर म्हात्रे आणि अरविंद व अनुप देशमुख हे पितापुत्र अशी पाच-सात मंडळी उत्तम तयार झाली.

सारंग ओक पुण्याला परत गेले. पण त्यांनी दिलेला वसा दापोलीकरांनी टाकला नाही. अरविंद देशमुख आता वयाप्रमाणे धावपळ करत नाहीत आणि त्यांचा मुलगा अनुप दुकानात ‘बिझी’ असतो, पण गरजेप्रमाणे ‘इमर्जन्सी कॉल’ घेऊन कोणत्याही ठिकाणाचे साप व इतर प्राणी पकडून त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडतात.

मी आमच्या परिसरात नागांची (दोन्ही नर) स्पर्धात्मक झुंज पाहिली होती. तो नर-मादीचा प्रणय आहे असा गैरसमजही असू शकतो. मात्र जसजशा नव्या इमारती उभ्या राहिल्या व वस्ती वाढली, गवतरान तोडले गेले, तसतसे सर्प कमी झाले. जे आमच्या वडाचा कोंड-लालबाग परिसरात घडले, तेच दापोली शहरातील इतर विभागात कमी-जास्त प्रमाणात घडले असे म्हणण्यास जागा आहे.

मी गेल्या पंचवीस वर्षांत घोणस, रस्त्यावर (दापोली-दाभोळ मार्ग) येऊन बसलेले फुरसे, मण्यार (याला ‘कांडर’ असे दापोली तालुक्यात म्हणतात.) हे विषारी साप खूपदा पाहिले. मात्र कोणताही सर्प घरात आल्याचे, मी तळमजल्यावर राहूनही उदाहरण नाही. बेडूक किंवा उंदीर मात्र घरात येतो व त्याच्या मागे सर्प येईल अशी भीती वाटते.

धामण (रॅटस्नेक) हा बिनविषारी सर्प रस्तोरस्ती दिसू शकतो. कोणत्याच सापाला ऐकू येत नसल्यामुळे धामणीच्या देखणेपणाची स्तुती करून तरी काय उपयोग?

मला सारंग गावापाशी ‘किंग कोब्रा’ अर्थात नागराज दिसतो असे कळले, तेव्हा मी व सहकारी तिकडे गेलो. पण पाचोळ्याची घरट्यासारखी रचना करणारी व तेथे अंडी घालणारी भुजंग मादी किंवा नरसुद्धा आम्हाला सापडला नाही. किंगकोब्रा म्हणजे ‘डोम्या नाग’ रत्नागिरी जिल्ह्यात कोठेही नाही !

मला अगदी छोटा ‘ब्लाइंड स्नेक’ (वाळा साप) बागेतील मातीत एका युवकाने दाखवला होता. तो किडामुंगी खाण्यास खोलातून भूपृष्ठावर आला असावा. त्याचे डोळे फार लहान आहेत. तो आम्हाला पावसाळ्यात आढळला. गांडुळासारखा होता. प्राध्यापक ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या ‘सापांची अद्भुत दुनिया’ या पुस्तकात अशी नोंद आहे, की या सर्पजातीत नर नसतात. नराच्या मीलनाशिवाय वाळा माद्या अंडी देऊ शकतात.

विरोळा किंवा दिवड हा बिनविषारी पाणसाप तर पावसाच्या साचलेल्या पाण्यातही आढळतो. त्याला तळे, नदी यांचे गोडे पाणी मानवते हे उघड आहे. पोहण्यास उतरणारी शाळकरी मुलेही त्याच्या अस्तित्वाची सवय करून घेतात. दिवडाला बेडूक-मासेही खाण्यास आवडतात. तो अल्पसंतुष्ट आहे असे म्हणू. सोसायटीलगतच्या गटारात, डबक्यातही मला त्याची चपळ हालचाल दिसत असे.

गवत्या (ग्रासस्नेक), नानेटी, मांडूळं अशा सापांनी मला दर्शन दिले नसले तरी त्यांचे तालुक्यातील अस्तित्व गृहीत धरावयास काहीच हरकत नाही.

          घोणस ‘शीळ’ घालतो, त्यामुळे पक्षीही फसतो व गवतात उतरतो असे मी इकडे कोकणात आल्यावरच ऐकले. मी घोणसाची शिट्टी ऐकली आहे. संध्याकाळी, शांतवेळी ती गवतातून ऐकू येते, असे एक स्थानिक वाहनचालक मला म्हणाला होता. तथ्य असे असावे की तो त्या सापाचा दीर्घ फूत्कार असेल !

‘राखणदार’ साप ही कल्पना कोकणातही आहे. गुप्त धनाची किंवा विशिष्ट जागेची राखण करणारा तो असतो म्हणे, पण त्यात शास्त्रीय तथ्य नाही.

          शेपटी थरथरवतो म्हणून ज्याला थरथऱ्या म्हणतात, त्याचे खरे नाव कॅटस्नेक (मांजऱ्या) असे आहे. त्याची आवडती जागा झाडावर असते. तो मला दाभोळजवळ झुडपांपाशी दिसला होता.

उडता सोनसर्प, ‘रजतबंसी’ यांच्यासारखे सर्प येथे दिसण्याची शक्यता नाही, असे मला वाटते. सर्प निसर्गातील समतोल राखतात. फुरसे या विषारी सापाचे (हिंदी नाव ‘जलेबी’) आवडते खाद्य म्हणजे विंचू. तेव्हा विंचवांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी फुरसे निसर्गाच्या प्रांगणात टिकले पाहिजेत.

          मासेमारी करणाऱ्यांच्या जाळ्यात महाविषारी पण विविधरंगी सपुरुसाप येतातच. मात्र, ते खतरनाक असल्याचे बहुतेकांना ठाऊक आहे.

बांधतिवरे परिसरातील एका वृद्ध कामकरणीला तिच्या घराच्या पडवीत पहाटे नाग डसला. त्यांच्याकडे वीज नाही. ती आजीबाय माझ्याकडे घरकाम करत असे. मी तिला आधीच बजावले होते, की अशावेळी लवकरात लवकर दापोलीच्या सरकारी दवाख्यान्यात दाखल व्हायचे. तसे तिने केले. विषाचा परिणाम जाणवू लागला होता. पण शास्त्रीय उपचार घेतल्यामुळे ती वाचली. ही लोकजागृती महत्त्वाची आहे !

किरण करमरकर हे सर्पमित्र मोहिमेत सध्या सगळ्यात सक्रिय आहेत. त्यांचा लाँड्री व्यवसाय आहे. त्याला जोडून जमिनीशी निगडित व्यवहारांत ते लोकांना मदत करतात. त्यांनी सांगितले, की एके काळी, वीस वर्षांपूर्वी ‘दिसला साप की ठोक त्याला’ असा खाक्या होता, तो आता बराच बदलला आहे. लोक सर्प दिसला, की ‘सर्पमित्रां’ना फोन करतात व सरपटणाऱ्या प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक घरात जाण्यास मदत करतात.

किरण करमरकर यांनी एक किस्सा सांगितला. ते ‘कॉल’ आला म्हणून दापोलीजवळच्या एका गावात बाईकवरून घरी आलेला साप धरून रानात सोडण्याच्या इराद्याने गेले. ती विषारी मण्यार होती. जेथे तो साप आला होता, त्या घरच्या गृहिणीने जे पोते मण्यार आत टाकून नेण्यासाठी दिले ते खालून फाटलेले होते ! मण्यार आत टाकताच खालून निसटून पायापाशी आली. सर्पमित्र थोडक्यात बचावला ! ‘प्रकट’ झालेला नाग हा प्रत्यक्षात पकडून आणलेला आहे असे दापोली ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने सिद्ध केले. मात्र मनुष्यवस्ती व बांधकाम वाढल्याने सर्पजातीच्या प्राण्यांची संख्या जवळ जवळ पन्नास टक्क्यांनी कमी झाली आहे. मण्यार हा भारतातील सर्वात जास्त चार विषारी सापांत गणला जातो. तो पूर्वी सर्रास दिसायचा. मला गेल्या दोन वर्षांत तो पकडण्यासाठी ‘कॉल’ आलेला नाही. माझा तरुण साथीदार माझ्या कामात साताठ वर्षांपूर्वी सामील झाला. त्याला एवढ्या वर्षांनंतर फुरसे बघण्यास मिळाले !

सर्प पकडून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करण्याकरता वनखात्याकडे नोंदणी करता येते. दापोलीत किरण करमरकर व सुरेश खानविलकर हे दोघे नोंदणीकृत सर्पमित्र आहेत. त्या दोघांच्या ‘टीम’ आहेत आणि त्यांचे ‘टीम’मधील साथीदार त्यांच्या त्यांच्या रस्त्यावरील सर्प पकडण्याचे काम करतात. कोठूनही ‘कॉल’ आला तरी तो संबंधित साथीदाराकडे पोचवला जातो.

‘अॅनाकोंडा’ हा भयपटातील पडद्यावरील महाकाय साप दापोलीतील बच्चे कंपनीमध्येही चांगला लोकप्रिय आहे. मात्र, या शाळकरी विद्यार्थ्यांचे सर्पाबद्दलचे भ्रामक विचार जास्त भयकारी जाणवतात. दापोलीत कोणताही विद्यार्थी सांगेल, की भगत-मांत्रिक सापाचे विष उतरवतो. सर्प बिनविषारी की विषारी हेही त्यांना ठाऊक नसते. सापाच्या मेंदूचा विकास झालेला नसतो. त्यामुळे तो खुन्नस ठेवून बदला घेऊ शकणार नाही. त्याला ‘हाच तो अमका’ असे काही समजत नाही हे वारंवार सांगूनही फार फरक पडत नाही. एक साप मारला, की तसेच आणखी साप तेथे येतात हा आणखी एक गैरसमज. नानेटीसारखा साप समूहाने राहतो असे विषयतज्ज्ञ सांगतात. तसे काही घडत असावे. गंधद्रव्याचा उपयोग करत वासावर सर्प येणेही शक्य असते. गारुड्याचा खेळ गेल्या काही वर्षांत बंदी असल्यामुळे दापोलीत झालेला नाही.

एका तरुणाने एकदा कवड्या साप मला मुद्दाम दाखवण्यास आणला. त्याला मी तो वाकवली गावाजवळ सोडण्यास दिला. प्रशिक्षण झालेले नसताना साप हाताळणे पूर्णपणे चुकीचे ! सारंग ओकसारखे सर्पज्ञानी दापोलीत इतरांनाही ‘ज्ञानी’ बनवत असत.

          दापोली तालुक्यात सापांचे वैविध्य, वैचित्र्य यांपेक्षा अधिक आहे. मला कुकरी खापरखवल्या, धूळनागीण, रुका कांदळवनातील श्वानमुखी पोवळा, चापडा या सर्पांचे दर्शन व्हावे असे फार वाटते. पण ते दापोलीच्या रानगर्द भागात तरी असतील का? असले तर भविष्यात टिकाव धरतील का? या बाबतीत प्रश्नचिन्ह आहे.

सारंग ओक Sarang.2908@gmail.com 7219259149
किरण करमरकर Kkarmarkar7@gmail.com 94223 82578
सुरेश खानविलकर sonikakhanvilkar9@gmail.com 7350420384
अरविंद व अनुप देशमुख sarpmitraanup@gmail.com 8390020660
ज्ञानेश्वर म्हात्रे – 9422382136

माधव गवाणकर 9765336408

———————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here