प्रशांत परांजपे : समाजभान जपणारा बहुरूपी

1
94

दापोलीचे प्रशांत परांजपे यांची रूपे अनेक आहेत. ते मुख्य पत्रकार व सार्वजनिक कार्यकर्ते आहेत. त्यांचे अपना स्वीट्स मार्ट जालगाव येथे सव्वीस वर्षे आहे. तेच त्याचे चालक-मालक. चवदार पदार्थ विकणारे, व्यवहारी-व्यावसायिक, व्यापारी परांजपे खरे, की स्वतःच्या खिशातून पैसे काढून सामाजिक उपक्रम राबवणारे कार्यकर्ते परांजपे खरे असा प्रश्न मला कधी कधी पडतो. पण लगेच मनाला पटते, की त्यांची ही दोन्ही रूपे अस्सल आहेत; आणि तशीच, त्यांची वेळोवेळी, गरजेप्रमाणे प्रकटणारी आणखीही काही रूपे आहेत ! प्रशांत यांनी कोणाचे मन राखण्यासाठी काही केले नाही. त्यांनी त्यांच्या मनीचे सत्त्व आणि तत्त्व सतत सांभाळले. तो संस्कार त्यांच्या वडिलांचा- ते अशोक परांजपे. ते अध्यात्म मानणारे सज्जन असे कलाशिक्षक होते. त्यांचे नाव त्यांच्या सरळ स्वभावामुळे ए.जी. हायस्कूल परिवाराच्या कायम लक्षात राहिले आहे. प्रशांत यांच्या आई नीलिमा या उत्तम गृहिणी व बालशिक्षिका. पत्नी अस्मिता आणि दोन कन्या- नूतन व निवेदिता. त्या तिघी त्यांच्या प्रत्येक उपक्रमातील पक्क्या सहकारी आहेत- मग ते उन्हाळी सुट्टीतील वाचन शिबिर असो वा व्यवसाय म्हणून चालवलेले पण सात्त्विकता जपणारे पर्यटन !

छंद व व्यवसाय यांचा अनोखा मेळ परांजपे कुटुंबाने नेहमीच घातला आहे. त्यामुळे ती मंडळी निर्भेळ-निर्मळ आनंदाची धनी झाली ! त्यांनी जातपात, भेदाभेद हद्दपार केले. त्यांचे प्रांगण सर्वांसाठी खुले असते. मात्र त्याच बरोबर, त्यांनी स्वत: हिंदू धर्माचा रास्त, डोळस अभिमान कधी सोडला नाही.

प्रशांत परांजपे पाक्षिक ‘सर्वांगीण निवेदिता’ आणि ऑनलाईन पत्रकारितेतील ‘निवेदिता फास्ट न्यूज’ अशी दोन नियतकालिके चालवतात. त्याशिवाय ते इतर वृत्तपत्रांसाठी वेळोवेळी लेखन करत असतात. त्यांनी प्लास्टिकविरोधी भूमिका नेहमीच घेतली आहे आणि प्रदूषण व अस्वच्छता यांना विरोध केला आहे. वृक्षतोड थांबावी म्हणून मोहिमा आखल्या आहेत. शासनालाही त्यांच्या सहकार्याची, चर्चेची, सल्लामसलतीची गरज वाटते. त्यामुळे अनेक सरकारी योजना/प्रकल्प त्यांच्या सहकार्याने पार पडतात. खासगी स्वयंसेवा हे तर त्यांचे स्वत:चे खास क्षेत्र. ते विरोध करतात-विरोधी भासतात. त्यांची भूमिका विरोधासाठी विरोध अशी नसते. प्रशांत व्याख्याने, लेख, बातम्या अशा माध्यमांतून कोकणासमोर सतत येत राहिले आहेत.

त्यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेची दापोली शाखा जालगावातून चालवली. त्यांनी त्या माध्यमातून विविध उपक्रम-कार्यक्रम यांची अशी बहार आणली, की विनायक बाळ, मिलिंद जोशी, रेखा जेगरकल, मी- माधव गवाणकर असे आम्ही अनेक जण त्याचे सहकारी होऊन गेलो ! ‘कोमसाप’च्या मेळावे-संमेलनांतून त्यांची लोकसंग्रह करणारा उत्साही सद्गृहस्थ ही प्रतिमा जिल्ह्यातील साहित्यिकांना माहीत झाली. पहिले दापोली तालुका साहित्य संमेलन 2006 आणि दापोली तालुका बालसाहित्य संमेलन 2009 यांना प्रशांत यांचे नेतृत्व लाभले होते. त्यांनी (कै) अण्णा शिरगांवकर यांच्यापासून ते रेणू दांडेकर यांच्यापर्यंतच्या दापोलीच्या अनेक प्रसिद्ध व ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांना स्नेहाने जोडून घेतले व त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ प्रशांत यांना झाला. कोमसाप ही संस्था मोठी आहे. त्यात नाना तऱ्हेची माणसे असतात. काही चुका होतात पण संस्थात्मक कार्य थांबता कामा नये. माणसे बदलली तरी संस्था हवीच अशी त्यांची धारणा आहे. ‘कोमसाप’ने नवोदितांना आधार दिला आहे.

प्रशांत यांनी ‘युवा कट्टा’, ‘बोटीवरचे दाभोळ खाडीतले तरंगते काव्यसंमेलन’, पर्यावरणाच्या संदर्भातीत वृक्षांचा वाढदिवस असे काही उपक्रम यशस्वी करून दाखवले आहेत. दापोली येथे अस्मिता प्रकाशन चालवून दापोली तालुक्यातील अनेक साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित करून दिली.

दाभोळचे कवी मनोहर तोडणकर तर मला एकदा म्हणाले होते, परांजपेसारखा कार्यकर्ता परमेश्वरच पाठवतो ! दैनिक ‘सागर’ने परांजपे यांना पूर्वीपासून साथ दिली आहे. त्यामुळे प्रशांत यांची उमेद वाढली हेही खरे. प्रशांत यांच्या उपक्रमांत वैविध्य व उपयुक्तता आहे. त्यांनी ‘मेड इन दापोली प्रदर्शना’त दापोली तालुक्यातील उत्पादकांनी व उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू, पदार्थ मांडले होते. त्यांनी स्वयंसेवी संस्था महासंघ निर्माण करून स्वयंसेवी संस्थांना संघटनात्मक घाट घालून देण्यात पुढाकार घेतला आहे. त्यांचा सहभाग पर्यावरणविषयक संस्थांच्या ‘फेडरेशन’मध्ये आहे. ते कचरा विघटनासारखे महत्त्वाचे विषय घेऊन कोकणासह बारा जिल्ह्यांत कार्यरत आहेत.

प्रशांत परांजपे यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1972 चा. ते पदवीधर झाले. त्यांनी राष्ट्रभक्ती व समाजसेवा यांची प्रेरणा मनाशी बाळगली व ते सोशल वर्कर बनले. ते लघु उद्योजकांची ग्रामोदय इव्हेंट मॅनेजमेंट, व्यापारी संघटना (जालगांव), प्रतीक दापोली, पर्यटन, संवाद केंद्र अशा अनेक संघटना व संस्था यांमध्ये आघाडीवर राहिले आहेत. त्यांनी कृषी पर्यटन, चुंबक चिकित्सा, सरकारी यंत्रणांच्या अकार्यक्षमतेला विरोध अशा तऱ्हतऱ्हेच्या विषयांत सक्रिय आस्था बाळगली आहे.

त्यांना आदर्श पत्रकार, समाजगौरव पुरस्कार, प्रशस्तिपत्रे असे बरेच सन्मान लाभले आहेत. निवेदिता प्रतिष्ठान हे त्यांचे लाडके अपत्य. त्या स्वतःच्या संस्थेतून तर त्यांनी अनेकानेक उपयुक्त उपक्रम घडवले आहेत. सदातत्परता, प्रयत्नवाद, जिद्द, संघाच्या शाखेत असावी तशी शिस्त असे अनेक गुण प्रशांतकडून घेण्यासारखे आहेत. त्यांचे पर्यावरणविषयक ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून नाव आहे. त्यांचे त्या बाबतीतील ऑनलाईन प्रशिक्षणाचे प्रयत्न सुरू असतात. त्यांनी गरीब पण होतकरू विद्यार्थ्यांची बारावीची वर्षभराची फी भरली आहे. त्यांनी भारतरत्न पां.वा. काणे यांचे कायमस्वरूपी स्मारक स्वतःच्या प्रांगणात तयार केले आहे. एकाद्या मोठ्या विद्वानाचे स्मारक या तऱ्हेने खासगी प्रयत्नांतून संकल्पणे ही फार मोठी गोष्ट आहे. स्मारक सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. त्यांचे मुंबई व रत्नागिरी आकाशवाणीवरील कार्यक्रम, भाषणरूपी सुसंवाद, श्रोत्यांच्या परिचयाचे आहेत. सोशल मीडियाच्या जगात परांजपे स्वतः एक माहितीस्रोत व संकेतस्थळस्वामी बनले आहेत. परांजपे त्यांचे गाव-तालुका यांच्याशी एकनिष्ठ, एकरूप होऊन राबत राहिले आहेत. ते बागबागायतीसाठी स्वतः कष्ट घेतात. त्यांना ‘पंख्याखालच्या जॉब’साठी मुंबईकडे जाण्यास धडपडणाऱ्या तरुणांना श्रमसंस्कृती मुद्दाम आणून दाखवावी असे वाटत राहते. त्यांचे स्वत:चे आम्रपाली ग्रामसहवास हे पर्यटनसंकुल (होम स्टे) आहे. पुणेकर, ठाणेकर, मुंबईकर पुनःपुन्हा तिकडे आकर्षित होतात आणि शाकाहारी, सुग्रास, घरगुती भोजनाने संतुष्ट पावतात.

प्रशांत यांनी स्वतः‘सुगंध वसुंधरा रक्षणाचा’ हे पुस्तक लिहिले आहे. सर्व प्रकारच्या कचऱ्यांचे संकलन व विघटन या संदर्भातील प्रात्यक्षिके हा प्रशांत यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. ते दापोली तालुक्यातील ‘इको फ्रेंडली संस्कृती’चे प्रमुख संवर्धक आहेत. त्यांचे त्या बाबतीत प्रयोग अनेक सुरू असतात. त्यामध्ये प्लास्टिक कचऱ्यापासून वीट निर्मिती, मातीचा वापर न करता मचाणावरील भाजीपाला लागवड, पारंपरिक जीवन, निसर्गप्रेम, छायाचित्रे इत्यादीचे दर्शन घडवणारे वस्तुसंग्रहालय, सरस्वती विद्यामंदिर येथील अशोकवन, ‘वणवामुक्त माझे गाव’ संकल्पना, इको फ्रेंडली गुढी, किती आणि काय काय सांगावे !

त्यांचा मोठ्या उपक्रमांत टीमवर्कवर भर असतो. त्यांचे पुरे कुटुंबच त्या टीमचा भाग असते. संघटनकौशल्य हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे, पण तत्त्वांच्या बाबतीत त्यांना तडजोड चालत नाही, म्हणजे पत्रकारिता करताना ते त्यांना जे वाटले, पटले ते लिहितात. बातम्यांमागेही काही दृष्टी असावी लागते. पत्रकारितेत होणारा कथित भ्रष्टाचार तर त्यांच्या गावीही नाही आणि तशा ‘सोवळेपणा’चा त्यांना अभिमानच आहे !

प्रशांत यांनी त्यांच्या वयाचे अर्धशतक पूर्ण केले आहे. पन्नाशीत आयुष्याकडे एकूण तुम्ही कसे पाहता? या माझ्या प्रश्नावर प्रशांत उत्तरले, मी कुटुंबातील कर्ता मुलगा म्हणून, जावई म्हणून माझी कर्तव्ये नीट पार पाडू शकलो. संसारी व कुटुंबवत्सल असणे हे महत्त्वाचे आहे. माझ्या दोन्ही मुली सुविद्य व सुशील आहेत. मी इतरांच्या जीवनात सांस्कृतिक उपक्रमांतून आनंदाची साखरपेरणी केली. साहित्यिक व साहित्यप्रेमी सुखावले. सामाजिक कार्यात टीका तर होणारच. ती मी शांतपणे सोसतो, त्रागा करत नाही. समाजाचे आपण काही देणे लागतो. ते मी देत आलो, इतकेच !

तुमच्यावर प्रभाव कोणाचा असे विचारले तर त्यांनी त्यांना ज्यांचा सहवास लाभला असे साने गुरूजींचे मानसपुत्र प्रकाश मोहाडीकर, मधु कर्णिक, हास्यकवी अशोक नायगावकर, सिंधुताई सपकाळ, जलतज्ज्ञ अशोक भवाळकर, अण्णा हजारे यांच्यापासून डॉ.काणे (दापोलीचे), शैला मंडलीक अशी नावे सांगितली.

ते म्हणाले, की मला टोकाची, अतिरेकी मते आवडत नाहीत. मी समतोल विचार करतो. परांजपे सर्वांनी निसर्गरक्षणासाठी पुढे आले पाहिजे, अशी कळकळीची विनंती आणि आवाहन सतत करतात.

प्रशांत परांजपे 9561142078 pakshiknivedita@gmail.com

माधव गवाणकर 8275249364
———————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. आदर्श जीवनपद्धती अवलंबली आहे! कौतुक करावे तितके कमीच! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here