मुलांच्या भाषेचा आदर करुया!


     मूल समाजात वाढते. त्याचे पालन-पोषण-संगोपन आजुबाजूचे लोक करतात. मूल जगण्याची गरज म्हणून भाषा शिकते. मुलाची भाषाक्षमता भोवतालच्या भाषेमुळे कार्यान्वित होत असते. मूल ज्या सहजतेने कुटुंबात भाषा शिकते, ती वापरते, त्यात व्यवहार करते; तितक्या नैसर्गिक पद्धतीने, सहजतेने मूल शाळेमध्येही भाषा शिकले पाहिजे.

     मुले वर्गांतून इतक्या सहज पद्धतीने भाषा शिकतात का? तर अर्थातच याचे उत्तर नाही असे येते. ते का? तर त्याचे उत्तर असे, की प्रमाणभाषेत शिकण्याचा आणि शिकवण्याचा अतिरेकी आग्रह!

     भाषाग्रहणाची जशी जैविक व मानसिक बाजू असते तशीच ती सामाजिकही असते. भाषाशास्त्रज्ञ मायकेल हैलिडेंचे म्हणणे असे आहे, की सामाजिक गरज नसती तर मानवाने भाषाशिक्षणाचा प्रयत्नच केला नसता. मूल आपले काम साधून घेण्याच्या गरजेतून परिसरात बोलल्या जाणार्‍या भाषेत व्यवहार करत शिकत जाते. मुलाला कोणाशी कसे बोलायचे, कोणाला बरोबरीने वागवायचे, कोणाशी आदरार्थी बोलायचे यांचे ज्ञान अनुभवातून मिळत असते. मूल आज्ञा करताना कसे, भीती दाखवताना कसे, हट्ट धरताना कसे, लाडीगोडी लावताना कसे बोलायचे हे सर्व उत्स्फूर्तपणे शिकत असते. मुलाची भाषिक प्रगती ऐकण्याबोलण्यातून व आंतरक्रियांमधून होत असते.

     देशात अनेक प्रकारच्या विविधता आहेत. भाषेच्या बाबतीतही तसेच चित्र दिसते. तिला कधी सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ असतात, तर कधी ऐतिहासिक, भौगोलिक कारणे असतात. भाषा ही परंपरेने एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे दिली जाते. भाषा कशी वापरायची याचे रीतीरिवाजदेखील समाजाकडून मिळत असतात. जर का भाषा हे अभिव्यक्तीचे, संवादाचे माध्यम असेल आणि प्रत्येक मूल स्वत:च्या भाषेत नैसर्गिक रीतीने ती अभिव्यक्ती जोरकसपणाने करू शकत असेल, तर मग आपण प्रमाणभाषेचा अवास्तव आग्रह कशासाठी धरत आहोत? मुले आपली बोली (घरची भाषा) शाळेत घेऊन येतात, पण त्यांना शिक्षण घ्यायचे असते ते प्रमाणभाषेत! मूल पहिल्या इयत्तेत येईपर्यंत कौटुंबिक वातावरणात वाढत असते. त्याचे व्यवहार त्याच्या घरच्या भाषेत व्यवस्थितपणे सुरू असतात. म्हणजे भूक लागली, की त्याने मागितल्यावर त्याला जेवण मिळते. मुलाचे सगळे असे तिकडे सुरू असते. त्याचे भाषेवाचून काहीच अडत नाही. पण त्याच्या मानगुटीवर प्रमाणभाषेचे भूत शाळेत पाय ठेवल्यापासून बसते. आधीच शाळा, खोल्या, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळेतली मुले, हे सारे त्या मुलाच्या दृष्टीने नवे, वेगळे जग असते. दिवसभर मोकळ्या वातावरणात मस्त हुंदडणार्‍या मुलाला हे जग समजून घेणे जड जाते. त्याचे स्वत:च्या भाषेतून साकारणारे विश्व आणि शाळेत जे सुरू असते ते; त्यांचा सांधा प्रमाणभाषेच्या अडथळ्यामुळे जुळत नाही. भाषाशिक्षणाचे मुळात काम आहे ते मुलाची घरची भाषा आणि प्रमाणभाषा यांच्यामध्ये पूल बांधण्याचे. आपल्याकडे प्रमाणभाषा शिकवली जाते, ती बोलीभाषेला पर्याय म्हणून किंवा तिची जागा घेण्याच्या हेतूने; तीदेखील एका सुरात, एका लयीत, एका तालात, अत्यंत रुक्ष पद्धतीने. त्याचा मुलाला मोठाच शॉक बसतो.

     ग्रामीण, दलित, आदिवासी मुलांसाठी त्याची तीव्रता अधिक असते. आणि मुख्य म्हणजे तो बिचार्‍या मुलांना शिक्षणाच्या उंबरठ्यावरून पाऊल आत टाकतानाच सहन करावा लागतो!

     1990 च्या एका पाहणीनुसार, जगात पाच हजारपेक्षा जास्त भाषा ‘बोलल्या’ जातात. जगभरात एकशेसाठ देश आहेत आणि त्यात सातशेपेक्षा जास्त भिन्न सांस्कृतिक समुह आहेत. भारतासारख्या  देशात तर मोठ्या प्रमाणावर बहुभाषिकता आढळून येते. 1961 च्या पाहणीनुसार भारतात 1652 भाषा नोंदल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर केवळ आदिवासींमध्ये चौर्‍याहत्तर प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. दर दहा मैलांवर भाषा बदलते असे केवळ म्हटले जाते. पण लक्षात कोण घेतो? आणि हो, या भाषांना बोली असे हटकून संबोधले जाते. त्यामागेही भाषेचे राजकारण असते. कारण भाषा ही एक सत्ता असते. प्रमाणभाषा आणि बोलीभाषा असा भेदाभेद मुद्दामहून केला जातो. प्रमाणभाषा म्हणून मानलेली मराठी ही प्रमाणभाषा नसून प्रत्यक्षात बोलीच आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रात नेतृत्व करणार्‍या आणि एकोणिसाव्या शतकापासून शिक्षणात पुढारलेल्या आणि सांस्कृतिक प्रतिष्ठा असणार्‍या पुणे व मुंबई येथील विशिष्ट वर्गाची भाषा हळुहळू प्रमाण- मराठी बनली. त्यातून ब्राह्मणी आणि ब्राह्मणेतर असा भेद मराठी भाषेत दिसून येतो. शिक्षणाची मक्तेदारी ब्राह्मणांकडे प्राचीन काळापासून असल्यामुळे आणि त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक वर्चस्वामुळे ब्राह्मणी बोली ही मराठी प्रमाणभाषा बनली. ती शिक्षणातील माध्यम आणि साहित्यातील वापर यांमुळे स्थिरावली. वास्तविक प्रमाणभाषा ही पूर्णपणे कृत्रिम असते. ती मुद्दाम शिकावी लागते. मराठीचे जे वेगवेगळे प्रकार बोलले जातात, त्यांना वेगवेगळे पैलू आहेत. शैलीचा नैसर्गिक विशेष आहे. परंतु त्या भाषा नव्हेत तर बोली आहेत, अशी हेटाळणी केली जाते. बोलीभाषा ह्या अशुद्ध; त्या केवळ गांवढळ, अडाणी लोकांनी बोलायच्या असतात अशी प्रस्थापित व्यवस्थेच्या मनात अढी दिसते.

     दलित, ग्रामीण, आदिवासी मुले वास्तव जीवनातील भाषाविविधतेचा विचार न करता त्यांच्या माथी प्रमाणभाषा मारली गेल्यामुळे शिक्षणात मागे पडताना दिसतात. हे सारे भाषाविषयक दुराग्रहामुळे घडत आहे. भाषाविज्ञानाचे अभ्यासक सांगतात की भाषा शुद्ध आणि भाषा अशुद्ध असे काही नसते. त्याचे कारण म्हणजे व्याकरणिक संकल्पना या भाषेच्या आधी नसतात, त्या मागून भाषेवर लादल्या जातात. शिक्षण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, 2005 नुसार मुलांच्या जीवनाशी जोडताना त्याचे संदर्भीकरण करण्याची तातडीची गरज आहे. पाठ्यपुस्तकांचे अध्यापन म्हणजे भाषेचे आणि व्याकरणाचे अध्यापन हा भाषाशिक्षणातील अडसर आहे. या पारंपरिक गैरसमजुतीला छेद दिला गेला पाहिजे.

     मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा आग्रह रास्तपणे धरला जातो. परंतु त्यासाठी व्याख्या स्पष्ट केली पाहिजे. मूल त्याच्या ग्रहणकाळात आत्मसात करते ती मातृभाषा मानली तर ती बहुधा बोलीच्या स्वरूपात असते. व्यवस्थेने तांत्रिक गोष्टींचा बाऊ करून बोलीमध्ये किंवा त्याच्या भाषेच्या प्रकारात (काही इयत्तांपर्यत का होईना) शिक्षण देण्याचे सोयीस्कर रीत्या नाकारले आहे. हा व्यापक राजकारणाचा भाग असला पाहिजे. परंतु किमान शिक्षणाची सुरुवात करताना तरी बोली आणि प्रमाणभाषा अशा दोन्हींचाही अवलंब केल्यास त्यात विद्यार्थी आणि शिक्षक, दोघांचेही हित आहे. त्यातून मुलांचे शिक्षण आनंददायी होईल. भाषा जोडणारी असावी, शिक्षणापासून तोडणारी नको. मुलाच्या भाषेचा आदर केल्यास शिक्षण त्याच्या जीवनाशी जोडले जाईल, त्याच्या अनुभवविश्वाशी नाते सांगू लागेल. सभोवताली सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, भौगोलिक विविधता असलेले मूल प्रमाणभाषेच्या आग्रहामुळे न्यूनगंडाने पछाडलेले दिसते; एका दडपणाखाली राहते.

बहिरवाडी शाळेतील काही प्रयत्न

     आम्ही शिक्षकांनी अकोले (जि. अहमदनगर) तालुक्यातील बहिरवाडी या आदिवासीबहुल खेडेगावातल्या प्राथमिक शाळेत मुलांच्या भाषेचे वेगवेगळे प्रकार शिकून घेतले. शाळेत आल्यानंतर मुलांशी त्यांच्या भाषेत बोलू लागलो. त्यातून मुलांच्या मनातील शिक्षकांविषयी, शाळेविषयी भीती कमी झाली व त्यांना आपलेपणा वाटू लागला. त्यांना त्यांच्या भाषेत नैसर्गिकपणे व्यक्त होता यावे यासाठी ‘आमची बाराखडी’ या वार्षिक हस्तलिखितामध्ये एक ‘थीम’ निवडून मुलांना त्यांच्या अनुभवविश्वातल्या विषयांवर लिहिते करत गेलो. त्यासाठी प्रमाणभाषेचा आग्रह नव्हता. मुलांना ‘तुमच्या भाषेत, शब्दांत व्यक्त व्हा’ असे आवाहन केले जाते. आदिवासी समाजातील मुले ठाकरी भाषेत, भटक्या–विमुक्त जमातींतील मुले वडारी भाषेत, मराठा मुले त्यांच्या ग्रामीण ढंगातल्या बोलीत लिहिती झाली. त्यांना मोठी माणसे, आई-वडील, नातेवाईक यांची मदत घेण्याची मुभा असते. या प्रयोगास आश्चर्यकारक प्रतिसाद मिळाला. दुसरी ते पाचवीची जी मुले, त्यांना एखाद्या विषयावर प्रमाणभाषेत निबंध लिहायला सांगितल्यावर त्यांचे भांडवल पाच-दहा वाक्यांत संपते, त्या मुलांनी त्यांच्या भाषेत त्यांच्या आवडीच्या विषयांवर लिहायला सांगितल्यावर भरभरून लिहिले. ‘माझे विश्व’ यावर कोणी आपल्या बहिणीच्या लग्नाविषयी लिहिताना कुटुंबाची आर्थिक स्थिती वर्णन केली, कोणी सांस्कृतिक परंपरांच्या नोंदी घेतल्या होत्या, तर कोणी गावपरिसराचे निराळेपण अधोरेखित केले होते. ‘सांग मा पाखरा मारीत न्हाई, झाडा तोडीत न्हाई’ असे लिहिणार्‍या सागर खडके या आदिवासी मुलातील बदल त्याला पर्यावरणाबाबत आलेले भान सांगून गेला.

     मुलांनी शिवाराशी असलेले भावनिक नाते ‘माझे शिवार’ या विषयावरील दुसर्‍या वार्षिकांकात शब्दबद्ध केले. प्रत्येक मुलाच्या भावविश्वात शिवाराला विशेष स्थान असले तरी लेखनाचा विषय म्हणून मुलांनी शिवाराकडे कधी पाहिले नव्हते. शिवार हा विषय मुलांनीच चर्चेतून निवडला. शिवारावर लिहायचे म्हटल्यावर विद्यार्थ्यांनी नेहमीच्या परिचयाच्या गोष्टीकडे निराळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. त्यांचे गावशिवाराबद्दल कुतूहल जागे झाले. शिक्षकांनी मुलांसमवेत शिवारफेरी मारली. त्यानंतर कोणी शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या मुलाखती घेतल्या. कोणी कृषी सेवा केंद्रचालकाशी संवाद साधला. कोणी तलाठ्याच्या दप्तरातून नोंदींची जंत्री जमवली. कोणी आपल्या शेतकरी बापाविषयीच्या भावनांना शब्दरूप दिले. त्याला भेडसावणार्‍या समस्यांना हात घालण्याचा जोरकस प्रयत्नही केला. एकूणच, यातून परिचयाच्या शिवाराकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मुलांना मिळाला. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि स्वातंत्र्य देणे या गोष्टी महत्त्वाच्या होत्या, त्या शिक्षकांनी केल्या.

     मुलांची त्यांच्या भाषेतील तोंडी उत्तरे वर्गातही स्वीकारली जातात. मुलांनी लिहिलेले उत्तर बरोबर असेल तर व्याकरणाचा काटेकोरपणा बाजूला ठेवून उत्तर स्वीकारले जाते. उदाहरणार्थ – इयत्ता दुसरीच्या वर्गात सामर्थ्य या शब्दाऐवजी ‘सामरथ्य’ किंवा प्रसंगऐवजी ‘परसंग’ असे शब्द सुरुवातीला स्वीकारून, पुढे त्यांना तो शब्द बिनचूक कसा लिहावा हे सांगितले जाते. परंतु मुलांसमोर त्यावर चुकीची फुली मारून मुलांना नाउमेद करणे टाळले जाते.

     आदिवासी मुले शाळा बुडवायची, त्याची कारणे शोधत गेलो. ती खूपच वेगवेगळी होती. पालक मुले आजारी पडल्यावर त्यांना अंगारा-धुपारा करत दवाखान्यात नेत नसत. आम्ही शिक्षकांनी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, आरोग्य सेवक-सेविका यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. आरोग्य कर्मचारी दर दोन-तीन दिवसांतून शाळेत येतात. आजारी मुलांवर उपचार करतात. मुले किरकोळ आजारपणाच्या नावाखाली शाळा बुडवत नाहीत.

     आदिवासी मुले लाजरीबुजरी असतात; अडचणी पटकन सांगत नाहीत. आम्ही मुलांच्या भावविश्वात शिरण्याचा प्रयत्न करत गेलो. त्यातून अडचणी समोर आल्या. मुले पेन्सील, पेन, वही नसल्यामुळे शाळेत यायला घाबरत. हे साहित्य दानशूर व्यक्तींच्या मदतीने शाळेत उपलब्ध करुन दिले. मुलांना गणवेशदेखील दिले. मुले आनंदाने शाळेत येतात.

     आदिवासी मुलांच्या भावविश्वात निसर्गाला विशेष स्थान असते, मुलांचे झाडे, वेली, फुले, पक्षी यांबाबत निरीक्षण सूक्ष्म असते. आम्ही मुलांना परिसरभेटीसाठी जंगलात घेऊन जातो. स्थानिक माहितगार माणसांच्या मदतीने आधी मुलांना माहिती देत असू. नंतर आदिवासी समाजातील मुलेच बोलती झाली. लाजरेपणा-बुजरेपणा सोडून माहिती सांगायला पुढे येऊ लागली. भले ती पाठांतरात किंवा वर्गातल्या इतर गोष्टींत मागे होती, परंतु या परिसरभेटीदरम्यान इतर मुलांना माहिती सांगत. पक्ष्यांची-डोंगराची नावे, झाडे-वेली, त्यांचे औषधी गुणधर्म- वापर हे सांगताना आणि माकडासारखी झाडावर चढून फ़ळे काढताना, कंदमुळे खोदून काढताना शाळेतील ‘हुश्शार’ मुलेही त्यांच्या मागे फिरू लागली. त्यातून त्यांना आत्मविश्वास मिळाला. आपल्या माहितीला, भाषेला प्रतिष्ठा आहे हे त्यांना सुखावणारे आणि आश्वासक वाटले असावे. त्यामुळे त्यांना शिक्षणात रस वाटू लागला, गोडी वाढली. वरचेवर शाळा बुडवणारी मुले उत्साहाने शाळेत येऊ लागली.

     पुरुषी वर्चस्वाच्या समाजाचे प्रतिबिंब भाषेतही पडल्याचे दिसते. राष्ट्रपुरुष, समाजपुरुष, राष्ट्रपिता यांसारखे शब्द पुरुषप्रधानता अधोरेखित करतात. राष्ट्रपतीसारखा शब्द तर पुरुषवाचक आहेच; परंतु एखादी स्त्री राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यानंतरही त्यात कोणताही बदल न करता तो शब्द तसाच वापरला जातो. गुरुजी, डॉक्टर, शास्त्रज्ञ, दुकानदार, वकील हे आणखी काही पुरुषवर्चस्ववाचक शब्द सांगता येतील. माणसाची वृत्ती त्याच्या भाषेत प्रतिबिंबित होते याची ही वानगीदाखल काही उदाहरणे दिली. अजूनही काही सांगता येतील. पुरुषी वर्चस्व असलेली भाषा अशी इंग्रजी भाषेवर जोरदार टीका झाल्याने अलिकडच्या काळात इंग्रजीत काही बदल करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ – लग्नावरून स्त्रीला Mrs. (विवाहित)  आणि Miss (अविवाहित) असे शब्द वापरण्याऐवजी Ms (श्रीमती) असा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. असे प्रयत्न मराठी भाषेत झाल्यास लिंगसमभावाच्या चळवळीस त्याची चांगली मदत होऊ शकेल. मग आपल्या पाठ्यपुस्तकांतील प्रतिज्ञेमधील ‘सारे भारतीय माझे बांधव’ असे पुरुषवाचक उल्लेख वगळण्यापासून आशयापर्यंत सुधारणेला मोठा वाव आहे.

भाऊसाहेब चासकर- भ्रमणध्वनी : 9881152455, इमेल : bhauchaskar@gmail.com
{jcomments on}

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.