कोजागरी पौर्णिमा


‘को जागर्ति?’ असे देवीने विचारले. शिवाजी महाराजां नी तिला ‘मी जागा आहे आणि मी स्वराज्य व सुराज्य निर्माण करीन’ असे वचन दिले. ते त्या वचनाला जागले अशी कथा प्रचलीत आहे. ‘को जागर्ति?’ ही मुळात एक कविकल्पना; त्यामुळे ती वेगवेगळ्या महापुरुषांच्या संदर्भात योजून पुराणकथा रचल्या जातात त्यांतलीच ही एक. आख्यायिकांनुसार, उत्तररात्री साक्षात लक्ष्मी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' असे म्हणतात.

आश्विन पौर्णिमा हा प्राचीन काळात कौमुदी महोत्सव मानला जाई. वात्स्यायना ने ह्याला ‘कौमुदी जागर’ असे म्हटले आहे; तर 'वामनपुराणा 'त ह्याला ‘दीपदानजागर’ असे म्हटले गेले आहे. पण एकंदरीत, आरंभकाळात, या दिवशी सा-या नगरामध्ये उत्साहाचे वातावरण असे. नगर स्वच्छ करून, घरे सुशोभित करण्यात येत. रात्री लोक सुंदर वस्त्रे-आभूषणांनी नटून शहरात हिंडत. रात्री दीपाराधना करत. नृत्यगीतांच्या मैफिली चालत, रात्रभर जागरण होई.

कोजागरी पौर्णिमा हा पावसाळ्यानंतर येणारा, आकाश निरभ्र असण्याचा पहिला दिवस. कोजागिरी पौर्णिमेस ‘कौमुदी पौर्णिमा’ किंवा ‘शरत्‍पौर्णिमा’ असेही म्‍हटले जाते. तसेच या दिवशी पाळावयाच्‍या व्रतास ‘कोजागरव्रत’ असे म्‍हणतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी, पूजेनंतर देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते आप्तेष्टांसह स्वत:ही सेवन करावेत, असा ह्या व्रताचा विधी सांगितला आहे. रात्री चंद्रपूजा करून त्याला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी द्यूत खेळावे असेही सांगितले आहे. या रात्री लक्ष्मी 'को जागर्ति' (कोण जागा आहे?) असे विचारत घरोघरी फिरते आणि जो जागा असेल, त्याला धनधान्य देऊन समृध्द करते. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इत्यादी ठिकाणी असंख्य दीप लावावेत. हा दिवस व ही रात्र प्रामुख्याने श्रीलक्ष्मीच्या आराधनेची असते. सनत्कुमार संहितेत ह्या व्रताची कथा दिली आहे.

वर्षाऋतू संपून आकाश निरभ्र होते आणि पावसाळ्यानंतरची ही पहिली पौर्णिमा चांदणे घेऊन येते. पूर्वी कष्ट करून, शेते पिकवून कोठारे धान्याने भरलेली असत आणि मने आनंदाने. तो आनंद आणि निसर्गाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायला हा उत्सव आणि हे व्रतही सुरू झाले असावेत. देव-देवता ह्या मानवनिर्मित संकल्पना. लक्ष्मी ही देवता आशीर्वाद देणारी आणि 'जागृत राहा, असेच कष्ट करा आणि समृध्दी निर्माण करा' असा इशारा देणारी. लोकही त्यावर पूर्ण श्रध्दा ठेवून प्रामाणिक कष्ट करत असावेत!

कोजागरी पौर्णिमा व्रत बनले आणि त्यात उपोषण, पूजन आणि जागरण ह्या तिन्ही अंगांना सारखेच महत्त्व आले. रात्री मंदिरे, घरे, उद्यान, रस्ते इत्यादी ठिकाणी दिवे लावत. रात्री जितके दिवे लावावे तितके कल्प मानवाला सूर्यलोकात प्रतिष्ठा मिळते असे धर्मशास्त्र सांगते. लक्ष्मी आणि इंद्र ह्यांची पूजा होई. चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवून रात्री जागरण करत आणि फाशांनी द्यूत खेळत. मध्यरात्री, लक्ष्मी चंद्रमंडळातून भूतलावर उतरते व ‘को जागर्ति?’ असे विचारते. जो जागृत असेल त्याला ती धनधान्य देते अशी कथा आहे. अश्विन पौर्णिमा ही बौध्द धर्मात 'प्राबराणा पौर्णिमा' म्हणूनही साजरी केली जाते. राजस्‍थानमध्‍ये या दिवशी स्त्रियांनी शुभ्र वस्‍त्रे धारण करून चांदीचे अलंकार घालण्‍याची प्रथा आहे.

कोजागरी पौर्णिमा आजही साजरी होते, पण हे Celebration जमेल तेव्हा पाहिजे तिथे आणि कृत्रिम झगमगाटात होते. आजकाल या उत्‍सवाला मोठ्या प्रमाणात सार्वजनिक स्‍वरूप प्राप्‍त झाले आहे. अनेक ठिकाणी कोजागिरीनिमित्‍त गरबा नृत्‍यासारख्‍या विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पर्यटन संस्था Celebrities ना घेऊन पर्यटनाला जातात.

वातावरण बदलले, पाऊस रुसला म्हणून कृत्रिम पाऊसदेखील पाडला जातो. अशा वातावरणात कोजागिरीच्या चांदण्याला महत्त्व राहिलेले नाही, निसर्गाबद्दल कृतज्ञता उरलेली नाही. पण कोजागरी हे आधुनिक काळात Celebration चे निमित्त जरूर आहे.

- ज्योती शेट्ये

Last Updated On 23rd Oct 2018

लेखी अभिप्राय

chan mahiti dili ahe.

ramesh patil18/10/2013

Jyoti Tai,

Danyawad, AApan dileli Mahiti Kupac Chha aahe.
Man prasann zale.

Mrs. Seema Sud…18/10/2013

माहिती संग्राह्य आहे.

अशोक खरात जालना07/10/2014

vary good

sanjay R B.25/10/2015

Nice

Amol shelke26/10/2015

धन्यवाद खूप छान माहिती आहे

विदया गावडे14/10/2016

Khup chan

अज्ञात14/10/2016

आपण दिलेली "कोजागिरी पौर्णिमा"विशेष माहिती जणू समाज प्रबोधनपर आहे.असे मनापासून वाटते.त्याबद्दल खूप खूप आभार.

प्रेमनाथ नथुरा…15/10/2016

खुप सुंदर माहिती आहे.संग्रही ठेवावी अशी !!

Shilpa Nigudkar20/10/2018

Nice

Jeevan23/10/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.