मस्तानीवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायला हवी


मस्तानीबाईंच्यावर महाराष्ट्राने मोठा अन्याय केला आहे. बाजीरावांनी मराठेशाहीचे पाय हिंदुस्थानात रोवले. थोरले छत्रपती व संताजी-धनाजी यांच्यानंतर, राऊ हे मराठेशाहीचे न भविष्यती असे बलाढ्य नेते ठरले. राऊ १७३० च्या सुमारास, मराठी सैन्यासह हिंदुस्थानात होते - त्या काळी नर्मदेच्या उत्तरेकडच्या प्रदेशाला हिंदुस्थान म्हणत. त्या सुमारास रोहिलखंडाच्या महमद बंगश याने बुंदेलखंडावर आक्रमण केले. बुंदेल राजे महाराज छत्रसाल आक्रमणाने त्रस्त झाले. त्यांनी राऊंना आपल्या भाषेत दोन चरणांत आपली स्थिती लिहून कळवली, त्याचा मथितार्थ -

जो गती गजेंद्र की, सोही गत पावत आज
बाजी जात बुंदेल की, राखो बाजी लाज ।।

सुसरीच्या तोंडात पाय अडकलेल्या लक्ष्मीच्या गजेंद्र-हत्तीची जी गत, त्या अवस्थेत मी आहे.

अशा प्रकारचा छत्रसाल यांचा याचनास्पद निरोप येताच, राऊंनी महाराज छत्रसाल बुंदेल्यांना त्यांच्यावर झालेल्या आक्रमणासमयी प्रत्यक्ष जाऊन मदत केली आणि बंगशला पळवून लावले.

छत्रसाल बुंदेले यांनी ‘प्रणामी पंथ’ स्वीकारला होता, त्यानुसार त्यांनी ज्या राजाचा पराभव केला तेथील राजकन्येशी विवाह करणे हा नियम होता. एकदा त्यांनी एका नवाबाचा पाडाव केला व त्याच्या मुलीशी लग्न केले. त्या विवाहापासून त्यांना देखणी व रूपवान मुलगी झाली. बाजीरावांच्या मदतीचा मोबदला म्हणून बुंदेल्यांनी आपली मुलगी सावित्री – लाडाने, मस्तानी - ही बाजीरावांना पत्नी म्हणून दिली. मस्तानीच्या आई नवाबाच्या कन्या होत्या. त्या काळीच नव्हे तर कदाचित आजसुद्धा समाजरचनेप्रमाणे ती खूपच खळबळजनक अशी घटना होती व पुण्यात त्यास मान्यता मिळणे अशक्य होते.

मस्तानी पुण्यात आल्यावर बाजीरावांच्या सांगण्यावरून जर त्या जन्माष्टमी अथवा गणपतीला शनवारवाड्यात नाचल्या असल्यास, त्यात गैर काय झाले? परंतु त्यांना नाचणारी नाची ठरवले गेले व त्यांची बदनामी केली गेली.

खरे तर, देवासमोर नाच व गाणे करणे हा उत्तर हिंदुस्थानातल्या संस्कृतीचा एक भाग असतो. संत मीराबाईंच्या बाबतीत ‘पग घुंगरू बांध मीरा नाचे रे’ हे प्रसिद्धच आहे. दुर्दैवाने, मीरेलाही त्रास झाला. पण मस्तानी यांनी त्यांच्याच नव-याने बांधलेल्या शनिवारवाड्यामधे, नव-याच्याच परवानगीने, पेशव्यांचे कुलदैवत असलेल्या गणपतीसमोर नृत्य केले, यात काय चुकले?

मस्तानी नाच-गाण्यात तरबेज असणारच, कारण तो त्यांना मिळालेला उत्तर भारतीय राजपूत घराचा वारसा होय. उत्तर भारतात लग्नांत स्त्रियांचे संगीत हा नाच व गाण्यांचा कार्यक्रम असतो. होळी व जन्माष्टमी हे सण भारतीय गीत व नृत्याने साजरे करतात. गाणे व नृत्य ही त्यांच्यासाठी एक कला नि त्यांच्या आयुष्याचा एक सांस्कृतिक घटक आहे. कदाचित सांस्कृतिक भिन्नतेमुळे मस्तानीविरोधक लोकांनी त्यांना नाची ठरवले असण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरुद्ध खोटे पुरावे पण उभे केले असण्याची शक्यता आहे.

उज्जैनच्या विक्रम विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कवठेकर यांनी बाजीराव-मस्तांनी यांच्यावर ३७२ पानी संस्कृत काव्य केले आहे. त्यात ते मस्तानीचा राजकन्या म्हणून उल्लेख करतात, कारण छत्रसाल बुंदेल्यांना दोन मुलगे व सावित्री ही एक मुलगी, यांच्यासाठी त्यांनी बुंदेलखंडाचे तीन भाग केले – दोन आपल्या मुलांसाठी व एक मस्तानीसाठी. मस्तानीचा भाग बाजीरावांना मिळाला. अशा प्रकारे बुंदेलखंडातील झाशीचा विस्तार मराठ्यांकडे आला. छत्रसालांना इतर काही अनौरस मुले होती. त्यांना बुंदेलखंडाचा वाटा मिळाला नाही. नाचणा-या स्त्रीसाठी आपल्या राज्याचा एक तृत्तीयांश भाग बाजीरावासारख्या ति-हाइताला देणे होणार नाही. त्या व्यतिरिक्त मस्तानी यांच्यावर जे लिखाण प्रसिद्ध आहे, उदाहरणार्थ Deccan Letters, त्यानुसार त्या घोडेस्वारीत निपुण होत्या. बाजीरावाच्या घोड्याला घोडा ठेवून त्या घोडदौड करत – stirup to stirrup. बाजीरावांच्या रिकिबीला रिकिब लावून त्या घोडा पळवत. तलवारबाजीत व भालेफेकीत त्या कोणत्याही मराठी शिलेदाराहून कमी नव्हत्या. असली कामे सोळा-सतरा वर्षांची नर्तकी करू शकणार नाही. ह्या कृती राजकन्येच्या निदर्शक आहेत. त्यांना बालवयातच हे धडे मिळाले असले पाहिजेत.

मस्तानी यांना मराठा पद्धतीनुसार आपल्या मुलाचे नाव कृष्णराव ठेवायचे होते, पण पुण्यात त्याला विरोध झाला, तेव्हा त्यांनी आपल्या वडलांच्या राजपूत प्रणालीप्रमाणे मुलाचे नाव कृष्णसिंह ठेवावे असे सूचित केले. त्यालापण विरोध झाला. तेव्हा नाईलाजास्तव मुलाचे नाव समशेरबहाद्दूर ठेवण्यात आले.

एका माहितीप्रमाणे, पानपतच्या तिस-या युद्धात जखमी झालेले समशेर बहाद्दूर परतताना भरतपूरजवळ दिग येथे मृत्यू पावले (१७६१). त्यावेळी त्यांचे चिरंजीव अली बहादूर हे पुण्यात होते. त्यांना कारभा-यांनी बुदेलखंडात पाठवले. त्यांनी बुदेलखंडाचा मोठा भाग जिंकून आपल्या आधिपत्याखाली आणला. त्यांचे नातू दुसरे अली बहादूर हे १८५७ च्या युद्धसमयी एकवीस-बावीस वर्षांचे होते व बांद्याचे नवाब म्हणून ज्ञात होते. झाशीच्या राणींनी त्याला राखी पाठवली व मदतीस बोलावले आणि ते आलेसुद्धा. युद्धात पारडे पालटले व झाशीच्या सैन्याची पीछेहाट झाली. तात्या टोपे गुजरातेत गेले. दुसरे अली बहादूर यांना इंदूरजवळ महू येथे अटक झाली व कंपनी सरकारने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. इंदूरच्या होळकरांनी मध्यस्थी करून व त्यांचा पुन्हा कदापी कंपनी सरकारला त्रास होणार नाही याची खात्री दिल्यावर त्यांना इंदूर येथे नजरकैदेत ठेवले होते. ती इमारत ‘बांदा कोठी’ म्हणून ओळखली जाते. त्यांचे वंशज आजसुद्धा तेथे राहतात. आजचे चाळीशीतले बांद्याचे नवाब, त्यांचे भाऊ व एक बहीण आपापल्या परिवारासह तेथे एकत्र राहतात. तेथेच ते १८५७ च्या स्मृत्यर्थ ‘स्वातंत्र्यसैनिक’ नामक एक लहान शाळा चालवतात. त्यातून उत्पन्न बेताचेच व आर्थिक परिस्थिती बिकट आहे.

एक विनंती अशी....

बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या वंशजांच्या, मुलाबाळांच्या शिक्षणाकरता जर कोणाला आर्थिक मदत देण्याची इच्छा असेल तर त्यांनी प्रस्तुत लेखक सर्जेराव यांच्याशी संपर्क साधावा. pratisar@aol.com वंशजांना शाळेत शिकणारे तीन मुलगे व दोन मुली आहेत. हे बाजीराव पेशव्यांचेच नातलग आहेत, पण आज त्यांची माहिती महाराष्ट्रात फारशी कुणाला नसावी.

सर्जेराव घारगे-देशमुख
निवृत्त इंजिनीयर
वेस्ट काल्डेवेल शहर, न्यू जर्सी राज्य
अमेरिका
pratisar@aol.com

डॉ. अनिलकुमार भाटे
निवृत्त प्राध्यापक
विद्युत अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, माहिती तंत्रविज्ञान आणि मॅनेजमेंट
एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य,
अमेरिका
anilbhatel@hotmail.com

 

न्यू जर्सीचे डॉ. प्रकाश व अलका लोथे वैद्यकीय परिषदेसाठी ऑस्ट्रेलियाला गेले होते. त्यावेळी त्यांनी पुढे न्यूझीलंडचा दौरा करायचे ठरवले. त्या दौ-यात फिन्सलंड या शहरी त्यांना सरदारजीचे एक रेस्टॉरंट दिसले. स्वाभाविकच तेथे जाऊन खानपान केले. त्यावेळी रेस्टॉरंटमध्ये त्यांना जी काही पेंटिंग दिसली त्यामध्ये बाजीराव मस्तानी यांचे एक चित्र होते. डॉ. लोथे यांनी मालकास हे चित्र कोणाचे आहे, हे ठीऊक आहे का? असे विचारले. मालकाला ते ठाऊक नव्हते, डॉ. लोथे यांनी सरदार मालकाला बाजीराव-मस्तानीची गोष्ट सांगीतली तेव्हा तोही रोमहर्षित झाला. त्याने डॉ. लोथे यांना अशी विनंती केली, की ही गोष्ट तुम्ही मला थोडक्यात लिहून द्या. मालकाने डॉ. लोथे यांची गोष्ट टाईप करून घेतली व त्या पेंटिंग शेजारी चिटकवून टाकली. डॉ. लोथे याच्या मनात आले, की काय ही बाजीराव-मस्तानीची कहाणी आहे! ती ऐकावी त्याला वेड लावते.

(डॉ. लोथे यांनी कथन केलेला प्रसंग.)

लेखी अभिप्राय

अप्रतिम! मस्तानीचा उल्लेख सावित्री असाच व्हायला हवा. सत्तेसाठी एखाद्या पराक्रमी स्त्रीला नर्तिका ठरवण चुक आहे. धन्यवाद

स्वप्नजा सुभाष 13/03/2016

अभिनंदन. सुंदर उपक्रम.

रवींद्र पुंजार…26/04/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.