मराठी न्यूनगंडांतर अर्थात रडीचा डाव


मराठी न्यूनगंडांतर अर्थात रडीचा डाव

- ज्ञानदा देशपांडे

मराठी मन दुखावलेलं आहे. 'माझा न्याय्य हक्क मला न देता तुम्ही मला तंगवताय' असं वाटून ते चिडकंदेखील झालंय किंवा 'तुम्ही सारे कट करून मला गंडवताय' असं वाटून ठसठसतं दुखरं बनलंय. या सा-यासकट, मला मराठी मन नेहमी न्यूनगंडानं ग्रासलेलं दिसतं. 'जगात जे काही 'बेश्टं' आहे त्यापेक्षा मी पावछटाक कमी आहे' असा भाव मराठी माणसाच्या चेहे-यावर कायम दिसतो. जणू तो न्यूनगंड झाकून टाकायला मराठी माणूस आक्रमक आणि चिडका बिब्बा असल्यासारखा वसवसत असतो.

उदाहरणादाखल म्हणजे, इंग्रजी पत्रकारितेत प्रणव रॉय जर 'बेश्ट' असेल किंवा एन. राम- तर राजदीप कसा पावछटाक कमी वाटतो- तसं हे मराठी न्यूनगंडाचं दुखरं गळू आहे.

मराठी माणसाची चार प्रेमं बघितली तरी, उदाहरणार्थ, लताप्रेम, सचिनप्रेम, राजप्रेम आणि खरे मूळचे साहेबप्रेम; तर न्यूनगंडाच्या दुख-या निरगाठीचं राजकारण आपल्याला कळू शकतं. 'पावछटाक' कमी असण्याच्या वास्तवाचा तो प्रतिक्रियात्मक कडवा आविष्कार असतो. लताबाई - कारण ती जगातल्या कुठल्याही स्वर्गीय आवाजापेक्षा कमी नाही; किंबहुना काकणभर सरसच आहे. परमेश्वरानं बाईंच्या डोक्यावर हात ठेवलाय. मग लताप्रेम हा आमचा 'डिफायनिंग पॉईंट' आहे. सचिनप्रेम याच जातकुळीचं. या दोन 'भारतरत्न' मटेरिअल्सनंतरची मराठी माणसाची जी दोन प्रेमं आहेत, (राज) साहेब आणि मूळचे साहेब यांची; ती इतर प्रत्येक क्षेत्रातल्या ठसठसत्या डावललेपणाची भरपाई आहे. लताबाई आणि सचिन हे एकांडे शिलेदार आहेत. अनभिषिक्त साहेब आणि ओरिजिनल साहेब  हे न्यूनगंडानं ग्रासलेल्या मराठी समाजाचे नेते आहेत. त्याच समाजासारखे दोघंही चिडके, दुखावलेले, हट्टी, प्रेमळ, सटॅक - मराठी माणसासारखेच प्रतिक्रियेत तिखट. दरक्षेत्रात 'आपण कुठेतरी कमी आहोत' या भावनेला कसा हात घालायचा, तो कंद कसा मॅनिप्युलेट करायचा, त्याचा राजकीय वापर कसा करायचा, त्या दुखरेपणावर अक्सीर इलाज शोधण्यापेक्षा त्याला दुखरं ठेवूनच अरेरावी कशी वाढवायची, याची पुरती गणितं या दोन्ही साहेबांना ठाऊक आहेत.

मराठी न्यूनगंडाचा राजकीय आविष्कार जसा 'सेना-प्रेमा'त होतो तसा तो इतरही अनेक ठिकाणी होताना दिसतो (पवारांनी मोठा केलेला मराठा महासंघ म्हणजे तरी काय आहे?). पण मग या न्यूनगंडाची ठसठस मागे तरी कुठपर्यंत जाते? त्या इतिहासाकडे बघण्याचा हा एक प्रयत्न.

पेशवाईची सत्ता १८१८ ला संपली. मग साहेबाचं कंपनी सरकार सत्तेत आलं. 'अधिकाधिक साहेबाळणं' हे सत्तेच्या जवळ जाण्याचं साधन झालं. बंगालमध्ये ही प्रक्रिया शंभरएक वर्षं अगोदर सुरू झाली होती. 'साहेबाळणं' प्रक्रियेचा बंगाली पुरूषांच्या प्रतिमेवर प्रचंड मोठा प्रभाव पडला. बंगाली बायकांच्या मदतीला बेण्टिकसारखे परकीय पुरूष आल्यानं बंगाली पुरूष हा पुरेसा 'पुरूषी' नाही असा त्याचा तेजोभंग इंग्रजांनी केला. बंगालच्या राजकारणावर, नंतरच्या सशस्त्र क्रांतीच्या स्वप्नांवर प्रतिमेचा हा प्रतिकार करण्याची निकड दिसून येते. महाराष्ट्रात मात्र 'साहेबाळण्या'ची ही प्रक्रिया काहीशी वेगळी होती. 'मर्द मराठयां'ना ब्रिटिश सत्तेच्या समोर झालेला पराभव जिव्हारी लागला. आणि म्हणून मर्द मराठयांच्या मनात 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला रेझिस्टन्स, प्रतिकाराची भावना कायम तेवती राहिली. मराठे आणि मुघल हे ब्रिटिशपूर्व सत्ताधारी! या दोघांचंही ब्रिटिशांशी नातं गुंतागुंतीचं आहे. पडतं घेऊन ब्रिटिशांसोबत सहकार्यानं वागणा-या इथल्या वैश्य वर्गापेक्षा या दोघांचं नातं प्रतिकारानं, लढयानं बनलेलं  आहे. अरे ला कारे? म्हणू शकणा-या 'मर्द'पणावरचा ब्रिटिश हल्ला म्हणूनच मराठी मनाला सहन झाला नाही. बंगाली पुरूषी प्रतिमेचा तेजोभंग ब्रिटिश काही प्रमाणात यशस्वीपणे करू शकले. मराठी माणसानं मात्र त्यांना प्रतिकार केला. त्यामुळे इंग्रजी भाषा, इंग्रजी वेषभूषा, इंग्रजी सत्ता यांच्याशी मराठी माणसाचं नातं विरोधाचं राहिलं. ज्याप्रमाणे उत्तरेतले नेहरूंसारखे नेते 'इंग्रजाळले' त्या तुलनेत मराठी नेतृत्व इंग्रजाळलं नाही. टिळक, फुले-शाहू यांनी देशी वाणात साहेबी गुणांना मिसळून टाकलं. हा सारा काळ हा दोन संस्कृतींच्या संघर्षाचा आणि सहजीवनाचा काळ होता. डाव्या नजरेनं आतापर्यंत या काळाला केवळ 'शोषणा'च्या एकांगी नजरेनं जोखलं. मात्र शोषणासोबत हा काळ अनेक नवीन मूल्यांच्या जन्माचा, दोन संस्कृतींच्या तुलनेचा, यातून आपण काय निवडायचं-काय नाकारायचं हे ठरवण्याचा, औचित्याचे प्रश्न उभे करणारा काळ होता. या काळात ज्या 'मर्द' मराठयांनी (इथं मराठा हा शब्द जातिवाचक घेतलेला नाही. 'मराठी माणसांनी' या अर्थानं मराठयांनी या शब्दाची योजना केली आहे.) 'साहेब शरणता' डावलण्याचा पुरूषार्थ केलेला दिसतो. मात्र हे गणित गांधीबाबांच्या आगमनानंतर ढासळलं. टिळकोत्तर गांधींच्या राजकारणाच्या उदयात मराठी न्यूनगंडाची काही बीजं दिसून येतात. या सगळया काळाचं विवेचन डॉ. सदानंद मोरे यांनी त्यांच्या 'लोकमान्य ते महात्मा' या ग्रंथात केलंय. गांधींच्या तालमीत तयार झालेले शंकरराव देवांसारखे नेते 'मराठी' राहिले नाहीत.

डॉ. केतकरांनी भाषिक राज्यासाठी धरलेला आग्रह, सावरकरांची भाषाशुध्दीची चळवळ या दोन्ही गोष्टी या 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला दिलेली तिखट उत्तरं म्हणून तपासाव्या लागतील. त्याचबरोबर नाना पाटलांचं 'पत्री सरकारही.' 'राष्ट्र' नावाची एक महाकाय नवी संकल्पना उदयाला येताना, 'लोकशाही' नावाचं 'एक माणूस - एक मत' असं नवं राजकीय मूल्य रुजत असताना 'साहेबोत्तर' पिढीमध्ये राष्ट्रीयत्वासाठी मराठीपण नाकरण्याकडे कल राहिला.

स्वातंत्र्योत्तर भारतात जे 'मराठी' विचारवंत झाले ते 'मराठी' नव्हते. ते राष्ट्रीय विचारवंत होते. त्यांच्या मते फक्त मराठीचा विचार म्हणजे संकुचित विचार. या उलट लोकशाहीवादी राष्ट्रीयत्वाचा विचार करणा-या नव्या राजकीय नेत्यांची फळी स्वातंत्र्योत्तर भारतात दिसते. हे नेते जन्मानं मराठी आणि विचारानं राष्ट्रीय होते. या सा-या काळात विनोबांनी 'महाराष्ट्र धर्मा'चा थोडासा विचार केलेला दिसतो. मात्र काका कालेलकर ते ना.ग. गोरे, एस.एम., मधू लिमयांपर्यंत व्हाया पटवर्धनबंधू पोस्ट-गांधी मराठी नेतृत्व हे राष्ट्रीय नेतृत्व होतं. कम्युनिस्टांमधले डांगे-रणदिवे हे 'मराठी' नव्हेत तर राष्ट्रीय नेते होते. नवीन राष्ट्रवादाच्या कल्पनेचा अनुषंग म्हणूनच त्या सर्वांनी एकत्र येऊन 'संयुक्त महाराष्ट्राची चळवळ' केली. ही चळवळ 'महाराष्ट्र' वेगळा हवा यासाठी नव्हती तर भारत देशाचा तो एक सकस भाग व्हावा म्हणून आणि मुंबईवरच्या मराठी शिक्क्यासाठी तो लढा होता. म्हणून संयुक्त महाराष्ट्राकडे 'अस्मिते'चा लढा असं बघता येत नाही, तर राष्ट्र संकल्पनेला अधिक लोकाभिमुख करणारी ती चळवळ होती. सांस्कृतिक राजकारणाचा एक भाग असा की औद्योगिकीकरण, शहरीकरण या सर्व साहेबी काळापासून सुरू झालेल्या प्रक्रियांनी साठच्या दशकात अधिक वेग घेतला. आणि 'साहेबाळण्या'च्या प्रक्रियेला प्रतिकार करणारा 'मराठी माणूस' स्वातंत्र्योत्तर आधुनिकतेत काहीसा मागे फेकला गेला. मराठी माणूस राहिला मुंबईचा कामगार आणि इंग्रजी शिकलेले दाक्षिणात्य मुंबईत नोक-या पटकावते झाले. याच काळात माटुंग्याचं 'मांटुंगम' झालं. शहरीकरणाच्या प्रक्रियेत राजकारण पालटलं आणि 'माझ्या भूमीत मी डौलानं माझ्या जातीय अहंकारासकट उभा राहीन' असं मानणा-या मराठी माणसाचा अहंकार ठेचला जाऊ लागला.

नवीन वैश्य गणितात मराठयांच्या क्षात्र तेजाची किंमत उरली नाही. म्हणून मुंबई महाराष्ट्रात आली, मात्र वैश्य वृत्ती जोपासणा-या गुजराथी-मारवाडी-सिंधी-पंजाब्यांनी ती काबीज केली. मराठी न्युनगंडाचं दुसरं दुखरं कारण मला या साठीच्या दशकातल्या 'वैश्य' मुंबईत दडलेलं दिसतं.

अजूनही मुंबईत नवे उद्योग येताना मुंबईतले मराठी नेते कॉण्ट्रॅक्टस मागतात. इथलं सिक्युरिटीचं कॉण्ट्रॅक्ट आम्हाला द्या, इथं माझी मुलं कामाला लागतील. इथली युनियन आमची असेल. मात्र या मुंबईत नवे व्यवसाय सुरू करणारी मराठी माणसं कमी आहेत. या 'वैश्य' गणितात 'क्षात्र' क्षात्र 'तेजानं कंत्राटं आणि गुरगुर करून मिळवलेला उक्ता  माज या पलीकडे काही साध्य केलेलं नाही. दुसरीकडे वाङ्मयीन जगात पुरेसा परिपुष्ट नसलेला नेमाडयांचा देशीवाद याच वैश्य राजकारणात उगवताना दिसतो. क्षात्र तेजाची पीछेहाट दिसून येते. मुंबईला महाराष्ट्रात आणण्यात 'संयुक्त महाराष्ट्रा'ची चळवळ यशस्वी झाली खरी, पण 'मराठी' माणूस मुंबईच्या जिओपॉलिटकल अर्थकारणातून बाहेर गेला.

मध्ययुगीन काळापासून मराठयांचं एक लक्षण सांगितलंय- ' दिध्ढले, गहिल्ले, कलहशीले'... हे कलहशीलत्व मात्र मराठी मनानं मनापासून जोपासलं. डावी चळवळ ते व्हाया शरद जोशी, मेधा पाटकर हे कलहशीलत्व मराठी माणसानं नीट संपन्न केलं आहे. त्याच्या दुख-या, ठसठसत्या अहंकाराला शोभेल अशा एकांडेपणानं. या एकांडया शिलेदारांना सामाजिक नेतृत्व लाभलेलं नाही. शरद जोशी-मेधा पाटकरांना काही काळ मायनॉरिटीचा पाठिंबा लाभला. त्यांचे साहेब झाले नाहीत. या सा-या प्रकाशात मला दिसतात महाराष्ट्रातले तीन साहेब- पवारसाहेब, जे दिल्लीच्या राजकारणात पावछटाक कमी पडले, मूळचे खरे साहेब- ज्यांनी डरकाळया फोडून मुंबई गाजवली आणि हे नवे येणारे अनभिषिक्त 'राज'साहेब. या तीन साहेबांनी महाराष्ट्रात नवा 'साहेबाळलेला वर्ग' निर्माण केला आहे.

वैश्य गणितातली दुसरी बाजू 'चिपा'त मिळणा-या कामगारांची होती. त्या मराठी कामगार वर्गालाच आता उत्तर भारतीयांबरोबर फाईट द्यावी लागते आहे . आमचं दुखणारं गळू अगदी टेकीला आलंय. तुम्ही जातीनं कुणीही असा- नुकताच हॅपी बर्थ डे झालेले 'राजसाहेब' मराठी माणसाला जातीपलीकडे जाऊन आवडतात.

'भाषाशुध्दी' आणि 'पाटया बदला'ची घोषणा त्यांच्या कामी आली. सावरकर खरे 'हिंदू हृदयसम्राट' तर राजसाहेब 'मराठी हृदयसम्राट झाले आहेत !'

आम्ही आधुनिकतेच्या क्रिकेटमध्ये कबड्डी खेळत मागे पडलो. आता, ग्लोबल बास्केटबॉलमध्ये आमचा टिकाव लागणार आहे का? आम्ही आता हा नवा गेम आपलासा करणार की अस्मितेच्या राजकारणाचा डाव खेळणार? वेगवेगळया सांस्कृतिक राजकारणाचं हे मैदान आहे. पंजाब्यांनी आपल्या न्यूनगंडावर स्वत:मधल्या जोमानं, रगीनं मात केली आणि गुजराथ्यांनी आपल्या पैशानं त्यावर मात केली. आम्ही निदान अकलेच्या जोरावर या न्यूनगंडापलीकडची छलांग मारायला रेडी आहोत का? की पुन्हा 'पाटया बदला'चा गेम खेळून आम्ही रडीचा डाव करणार आहोत? 'हॅपी बर्थ डे' झालेले साहेब तो डाव खेळतायत... आपण तोच डाव पुढे रेटणार का? हा प्रश्न आहे.

- ज्ञानदा देशपांडे

भ्रमणध्वनी : 9320233467

 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.