जनगणनेत जातींची नोंद


जातीच्या पुढील अभ्यासातून त्यांची त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये कळून येतील आणि मग कदाचित ध्यानात येईल, की या जातींमुळे मानवी जीवनातील केवढी मोठी विविधता सुरेख रीतीने जपली गेली आहे! कोणा राज्यकर्त्याने जातिव्यवस्थेचा जुलमाने बीमोड केला असता तर ही विविधता संपून गेली असती.


जनगणनेत जातींची नोंद

जनगणना करताना व्यक्तीची शिरगणती जातीनिहाय व्हावी असा निर्णय सरकारने केला हे उचितच होय. जाती हे या देशातील वास्तव आहे. जातींमुळे या देशाची समाजरचना अनेक शतके सुव्यवस्थित राहिली. येथे शांतता टिकली. त्यानंतर कोणत्या तरी टप्प्यावर जातींमध्ये श्रेष्ठ-कनिष्ठता आणि स्पृश्यास्पृश्यता बोकाळली. त्यामुळे एकूण समाजरचनेत विकृती आली आणि जाती हा जणू या समाजाला लागलेला शाप आहे असा समज झाला. या ओघात जातींचे काही फायदे आहेत याकडे दुर्लक्ष झाले. कोणतीही रचना प्रस्थापित झाली की त्यामध्ये वाकडेपणा येतो. तसेच जातिनिष्ठ समाजरचनेचे झाले. परंतु जातींमुळे हा समाज जवळजवळ दोन-तीन सहस्रके जिवंत राहिला. त्याने सर्व त-हेचे आघात पचवले!

जातिनिष्ठ समाजरचनेत वर-खालीपणा आल्यावर अन्यायाची बीजे पेरली गेली आणि ज्यांच्यावर तळचे स्थान लादले गेले त्या जातींमधील मंडळींचे शोषण झाले. अस्पृश्यता हा तर मानवतेला लाजवेल असा कलंक निर्माण झाला. अशी जाती-विषमता इतिहासात कोणत्या टप्प्यावर निर्माण झाली हे निर्विवाद सांगता येत नाही. भारतात नोंदलेला इतिहास नसल्यामुळे प्रत्येक अभ्यासक स्वत:च्या पध्दतीप्रमाणे एकेक सिध्दांत मांडतो आणि जातिव्यवस्थेने निर्माण केलेली कलुषितता आग्रहाने प्रतिपादन करत राहतो.

भारतावर विशेषत: गेल्या सहस्रकात बाहेरून हल्ले सुरू झाले. एक ब्रिटिश वगळले तर त्यांपैकी सारे आक्रमक भारतीय समाजात एकरूप होऊन गेले. त्यामुळे जाती हे येथील समाजाचे वैशिष्ट्य मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांमध्येही दिसून येते. त्या आधीही दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी बाहेरून माणसे येऊन येथे स्थिरावली. त्यांना कोणी हल्लेखोर मानत नाही. उदाहरणार्थ, ज्यू व इराणी लोक. भारतातील समाजव्यवस्थेने शांतता व परस्पर सौहार्द या भावना निर्माण केल्या व जपल्या. जातींमध्ये सामाजिक पातळीवर भेदभाव नव्हते. हे खरे की प्रत्येक जातीचा समुह आपल्या कोशात राही, आपले रीतीरिवाज जपे, त्याचा दुस-या जातीबरोबरचा विनिमय टाळण्याकडे कल असे आणि त्यामुळे प्रत्येक जातीचे एक बेट तयार होई. व्यवहारापुरते जाती-जातींमध्ये आदानप्रदान होत असे; बलुतेदारी त्यावरच आधारलेली होती, पण ते तेवढेच. त्यापलीकडे प्रत्येक जातीचा दुस-या जातीशी संबंध नसे.

देशात ब्रिटिशांनी औपचारिक शिक्षण सुरू केले. फुले, आगरकर, आंबेडकर अशा मंडळींच्या प्रयत्नांनी शिक्षण सर्व स्तरांत पसरू लागले. त्यामुळे व्यक्तीला व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले. तशात देश स्वतंत्र झाला. देशात लोकशाही राजवट आली आणि प्रत्येक व्यक्तीला मताधिकार प्राप्त झाला. व्यक्तिवादाचा तो पहिला हुंकार होता.

राजकारण्यांनी मात्र जाती-जातींमधील भिन्नतेचा अचूक फायदा उठवला आणि भेदभावाचे रान पेटवले!

जातिव्यवस्थेची दुष्ट बाजू आणि हितकर बाजू ही, माजी प्रंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी मंडल कमिशनचा अहवाल स्वीकारल्यानंतर प्रकट होत गेली. जातिव्यवस्थेचा दुष्टावा स्पष्ट होईपर्यंत जनमानसावर बिंबवण्यात आला होता, परंतु बदलत्या सामाजिक स्थितीत जात ही माणसांना त्यांची त्यांची ओळख (अस्मिता) देऊ शकते हे त्यानंतर प्रकर्षाने प्रत्ययाला आले. त्यामुळेच, व्ही.पी. सिंग यांच्या मंडल कमिशनबाबतच्या घोषणेनंतर देशात सर्वत्र जाती-जातींचे मेळावे होऊ लागले. ह्या प्रत्येक जातीच्या रूढी, परंपरा होत्या. त्यांनी तो तो समाज बध्द असे. परंतु मंडल कमिशननंतर त्यांना उत्कर्षाची आस लागली. ते ते जाती-गट आर्थिक उन्नतीसाठी एकत्र येऊ लागले. ही नवीन निरोगी सामाजिक प्रक्रिया होती. येथेही परत त्यास राजकीय बाजू होती व आहे. तिचा लाभ संबंधित पुढारी उठवत असतात.

अशा त-हेने आपली जाती-ओळख जपत असताना हे शेकडो जातिसमूह आर्थिक विकासाच्या घडामोडींत एकत्र येत गेले आणि त्यामधून समाज निकोप राहिला. दुहीची जी बीजे दिसली ती पक्षापक्षांच्या राजकीय भूमिकांमुळे.

जनगणनेत जातींची नोंद केल्यामुळे या देशात कोणत्या जातीचे किती लोक आहेत ते स्पष्ट होईल. त्या जातीच्या पुढील अभ्यासातून त्यांची त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये कळून येतील आणि मग कदाचित ध्यानात येईल, की या जातींमुळे मानवी जीवनातील केवढी मोठी विविधता सुरेख रीतीने जपली गेली आहे! कोणा राज्यकर्त्याने जातिव्यवस्थेचा जुलमाने बीमोड केला असता तर ही विविधता संपून गेली असती. मानवी संस्कृतीच्या विकासात यापुढे जाती नष्ट होणारच आहेत. नव्या जागतिक रचनेत जातींना स्थान नाही. अशा वेळी जातींची जनगणनेतील नोंद ही महत्त्वाचीच मानली पाहिजे.

- दिनकर गांगल
dinkarhgangal@yahoo.co.in

भ्रमणध्वनी : 9867118517

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.