महाराष्ट्राचे काव्यतीर्थ - केशवसुत (Keshavsut)


'झंकारीत वीणा इथे प्रगटली ही शालिनी शारदा, नादाने भुलली इथेच रमली ही मानिनी संपदा'

महाराष्ट्राचे काव्यतीर्थ - केशवसुत स्मारक

- सरोज जोशी

नवीन पिढीच्या स्मृतीत, जुन्या पिढीतील कर्तृत्ववान लोकांच्या प्रेरणादायी आठवणी चिरकाल जतन केल्या जाव्यात अशा स्तुत्य हेतूने स्मारके उभारली जातात. कालांतराने, अनेक स्मारकांवर विस्मृतीची धूळ साचली जाते. परंतु मालगुंड येथील केशवसुत स्मारक ह्याला अपवाद आहे. या स्मारकातील कै. गंगाधर गाडगीळ स्मृती दालनासाठी त्यांच्या पत्नी वासंती गाडगीळ ह्यांनी तीन लाख रुपये देणगी दिली आणि राज्याचे वित्त आणि नियोजनमंत्री सुनील तटकरे ह्यांनी स्मारकाच्या विस्तारकामासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. 'झंकारीत वीणा इथे प्रगटली ही शालिनी शारदा, नादाने भुलली इथेच रमली ही मानिनी संपदा' अशी अलौकिक प्रक्रिया ह्या वास्तूत सुरू झाली आहे.

मालगुंड केशवसुत स्मारक विस्तार भवनाचे भूमीपूजन..केशवसुत म्हणजे कृष्णाजी केशव दामले. आधुनिक मराठी कवितेचे जनक! कवी केशवसुत ह्यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी मालगुंड ह्या गावी झाला. मालगुंड शिक्षण संस्थेने प्रसिध्द साहित्यिकांच्या उपस्थितीत १९६६ ला कविवर्यांची जन्मशताब्दी साजरी केली. तेव्हापासून त्यांचे स्मारक मालगुंडला व्हावे अशी संस्थेची, तसेच प्रत्येक साहित्यप्रेमीची इच्छा होती. मात्र त्यासाठी क्रियाशील प्रेरणा मिळत नव्हती.

रत्नागिरी येथे १९९० साली झालेल्या चौसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक ह्यांनी सदर संमेलनात कविवर्य केशवसुत स्मारक उभारण्याचा संकल्प सोडला. त्यांनी मार्च १९९१ मध्ये स्थापन केलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेमार्फत स्मारकाची योजना तयार केली. त्यावेळचे साहित्यप्रेमी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व त्यानंतरचे मुख्यमंत्री शरद पवार ह्यांनी या प्रकल्पाला मुख्यमंत्री निधीतून आर्थिक साहाय्य उपलब्ध करून दिले. ह्याशिवाय इतर साहित्यप्रेमी संस्था/व्यक्ती ह्यांच्याकडून निधी जमवण्यात आला. मालगुंड शिक्षण संस्थेने स्मारकासाठी एक एकर जागा विनामोबदला दिली. यातून केशवसुतांचे भव्य व देखणे स्मारक साकार झाले.

स्मारकाची संकल्पना मुंबईचे स्थापत्यकार अभय कुलकर्णी ह्यांची असून सल्लागार म्हणून अनुभवी स्थापत्यशास्त्रज्ञ फिरोझ रानडे ह्यांनी काम केले. या स्मारक भवनाचे भूमिपूजन मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या हस्ते २६ जानेवारी १९९२ रोजी झाले, तर पायाभरणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३ मार्च १९९२ रोजी करण्यात आली. स्मारकाचे उद्धाटन कविवर्य कुसुमाग्रज ह्यांच्या हस्ते ८ मे १९९४ रोजी झाले. त्यांनी 'केशवसुत स्मारक म्हणजे मराठी कवितेचे तीर्थक्षेत्र आहे' असे म्हणून 'मालगुंड ही मराठी कवितेची राजधानी आहे' असे आपल्या भाषणात गौरवाने म्हटले.

गंगाधर गाडगीळ स्मृतिदानलचे उद्घाटन सुनिल तटकरेस्मारकात दोन मोठी दालने आहेत. त्यांपैकी एक दालन आधुनिक मराठी काव्यसंपदेचे असून त्यामध्ये सन १८८५ ते १९८५ या कालखंडातल्या ठळक, कर्तृत्ववान, नामवंत कवींची रेखाचित्रे, त्यांचा अल्प परिचय आणि त्यांची गाजलेली कविता प्रदर्शित करण्यात आली आहे. दालनाचे उद्धाटन २ जानेवारी १९९९ रोजी बाहत्तराव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत बापट ह्यांच्या हस्ते करण्यात आले. दुस-या दालनात कविवर्य केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आहे. ग्रामीण भागातील 'अ' दर्जा प्राप्त झालेले रत्नागिरी जिल्ह्यातले ते पहिले ग्रंथालय आहे.

स्मारक भवनाच्या पुढे एक छोटेसे केशवसुत स्मृती उद्यान आहे, तर स्मारक भवनाच्या मागील बाजूस खुला रंगमंच असून तेथे विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्यिक कार्यक्रम  होत असतात. साहित्यिकांसाठी अतिथी निवास म्हणून दोन सुसज्ज खोल्या उपलब्ध आहेत.

स्मारक संकुलामध्ये केशवसुतांच्या जन्मघराचे जतन करण्यात आले आहे. या जन्मघराची दुरुस्ती करतानाही घराचा मुळचा कोकणी बाज प्रयत्नाने जपलेला आहे. सदर वास्तूमध्ये केशवसुतकालीन वस्तू संग्रहालय असून, त्यामध्ये लामणदिवा, घंगाळ, माचा, झोपाळा इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.

मालगुंड येथील केशवसुत स्मारकपर्यटन विकासांतार्गत उपलब्ध झालेल्या निधीतून, शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत स्मारक परिसरात जन्मघराचे नूतनीकरण, प्रेक्षागृहाची सुधारणा, पाणीपुरवठा, पायवाट (पाखाडी), केशवसुत काव्यशिल्पे, कारंजे इत्यादी कामे झाली आहेत. तसेच दारासिंग (खासदार, राज्यसभा) ह्यांच्या खासदार निधीतून दहा लक्ष रुपये, रामनाथ मोते (आमदार, विधानपरिषद) ह्यांच्या आमदार निधीतून दहा लक्ष रुपये, तसेच 'क' वर्ग गाव पर्यटन विकासांर्तंगत महाराष्ट्र शासनाकडून १७.१ लक्ष रुपये इतका निधी प्राप्त झाला. त्यातून केशवसुत स्मारक विस्तार भवन (सांस्कृतिक व कम्युनिटी हॉल) बांधण्यात आले.

ग्रंथालयासह स्मारकाची व्यवस्था पाहण्यासाठी पाच कर्मचारी नेमलेले असून संपूर्ण स्मारक प्रकल्पासाठी अनुभवी, जाणकार व्यक्तींची स्थानिक व्यवस्थापन समिती आहे.

को.म.सा.प.सारखी वर्धिष्णू संस्था आणि सर्वांना प्रेमाच्या धाग्याने एकत्र आणणारे कुशल लोकसंग्राहक साहित्यप्रेमी मधू मंगेश कर्णिक ह्या स्मारकाच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. केशवसुत स्मारकात को.म.सा.प.ची संमेलने भरतात. वार्षिक स्नेहमेळावा साजरा होतो. चर्चासत्रे आयोजित केली जातात. कविसंमेलने गाजतात. एकूण साहित्याचा जागर आणि अभिसरण, साहित्यिकांचा वावर या वास्तूत असतो. केशवसुतांचे हे स्मारक नुसते भव्य, देखणे नाही तर श्वेत पद्मासना शारदेचे हे लाडके वसतिस्थान आहे. गणपतीपुळ्याच्या श्री गणपती तीर्थाशेजारी केशवसुतांचे हे काव्यतीर्थ लेखकांना स्फूर्ती आणि प्रेरणा देत असते, महाराष्ट्राची शान वाढवत असते.

- सरोज जोशी

भ्रमणध्वनी : 9833054157

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.