ऋतुसंहार


मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात ज्या दुस-या पिढीने चैतन्य आणले त्यात नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे व चित्रकार-कवी शांताराम पवार ही दोन महत्त्वाची नावे. कॉलेजचे तास संपले की ह्या दोन प्राध्यापकांच्या केबिन जाग्या व्हायच्या. तो काळ प्रायोगिक नाटकांचा होता. त्यामुळे त्या दृष्टीने धमाल असायची. आर्टजत्रेसारखे वेगळे उपक्रम म्हणजे तर विद्यार्थ्यांना आव्हानच वाटे! ह्यामधून पवार ह्यांचे एक पीठ तयार झाले. ह्यातूनच त्यांचा मोठा विद्यार्थिगण बनून गेला, जो आजही ‘पवारसरां’कडे आदराने पाहतो. संगीतातील गुरुशिष्यांच्या नात्यासारखे  हे नाते असते.

पवारांनी कलेच्या क्षेत्रात अनेक गोष्टी साधल्या तरी त्यांचे प्रयोगशील व सामाजिक मन सतत सजग राहिले. ते ब-याच वेळा त्यांच्या कवितांमधून व्यक्त होई. परंतु गेल्या वर्षीपासून, त्यांच्या चिंतेच्या व चिंतनाच्या विषयात ‘पर्यावरणा’स प्रमुख स्थान आले. त्यांनी चार महिन्यांपूर्वी, ऑक्टोबरात ‘ऋतुसंहार’ ही कविता लिहिल्यानंतर तर त्यांचा तो  ध्यास बनला. ह्या विषयांवर ‘कॅंपेन’ कशी करता येईल हेच सतत त्यांच्या मनात येई. परंतु तो काळ त्यांच्यासाठी तीव्र दु:खाचा आणि म्हणून ताणाचा आहे. त्यांची पत्नी लिना ही गेले काही महिने कॅन्सरग्रस्त होती. पवार कुटुंबीयांवर हा मोठाच आघात झाला. लिना हीदेखील पवारसरांची विद्यार्थिनी. कलेचे मर्म व महत्त्व जाणणारी. तिने परळला राहात असताना टाटा रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक ह्यांना साहाय्यभूत होतील अशा अनेक गोष्टी केल्या होत्या. त्यांच्यावरच ह्या रोगाने झडप घातली, परंतु त्या नामोहरम झाल्या नाहीत. तशाही अवस्थेत, टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाये करत असताना, त्यांनी कॅन्सर रुग्णांना मदत करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू ठेवले. किंबहुना, त्यांची सॉफ्टवेअर तज्ज्ञ मुलगी, गीताली हिने ते हिरिरीने पुढे नेले. आईच्या शुश्रूषेसाठी तिला नोकरी सोडावी लागली. राहती जागा गोरेगावला, उपचार परळ मुक्कामी! अशी धावपळ करता करता तिने आईच्या व्रताचा पाठपुरावा केला. वेगवेगळ्या धनिकांकडून खाऊ-औषधे ह्यांची जमवाजमव करून, त्यांचे वाटप कॅन्सरग्रस्त मुलांमध्ये केले. तिने आईला जरा बरे वाटताच, अशा त-हेचे तीन मेळावेतरी संघटित केले.  लिना पवार ह्यांना  गेल्या महिन्यात मृत्यू आला.

शांताराम पवार ह्यांनी त्या शोकाकुल अवस्थेत पर्यावरणबिघाडाविरुद्धच्या ‘कँपेन’चा ध्यास आर्ततेने व आवेगाने घेतला. ते समाचाराला येणा-या माणसांशी ह्याच मुद्यावर बोलू लागले. त्यांचा होर्डिंगवाला एक मित्र आला, तर त्यांनी त्याला सोबतची कविता देऊन, शक्य तेथे प्रदर्शित कर असे सुचवले; दुस-याला ह्या कवितेचा आधार घेऊन पथनाट्य लिहिण्यास व करण्यास सांगितले आणि
तिस-याला कवितेची हॅंडबिले तयार करून ती वाटण्याचा कार्यक्रम दिला.

पवारांनी आपल्या दु:खाचे उन्नयन असे साधले आहे.! आम्ही ‘थिंक महाराष्ट्र' प्रकल्पातर्फे  ती कविता येथे सादर करत आहोत. कोपनहेगन येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जागतिक परिषदेनंतर जगभर ह्या विषयाची गंभीरपणे चर्चा होत आहे. आपलाही त्यात सहभाग असायला हवा!

असे हे दोन पिढ्यांचे कलाभान आणि सामाजिक भान. कठिण परिस्थितीत ही जपलेले; नव्हे, संवर्धित केलेले!

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.