शिक्षण म्हणजे स्वत:च्या क्षमतांची ओळख! (Education means recognizing own Abilities)


shikhsan_khsmatanchi_olakhनानावाडा ही जुना पेशवेकालीन इमारत पुण्यात शनिवार वाड्याला लागून आहे. तेथे ‘नूतन विद्यालय’ नावाची महानगरपालिकेची पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण असणारी शाळा दुसऱ्या मजल्यावर दोन मोठाल्या खोल्यांमध्ये भरते. पहिली ते चौथीचे वर्ग, वीस-बावीस मुले व दोन शिक्षक - संध्या पांढरे आणि सुधीर दाते. दोघेही तळमळीने काम करणारे. तेथील मुले आनंदी, हसरी, गोबऱ्या गालांची अशी आहेत. अभ्यासामधील त्यांची प्रगती बऱ्यापैकी आहे. संध्या पांढरे यांच्याशी बोलताना माझ्या काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या. समाजातील सुशिक्षित वर्ग त्यांच्या मुलांना चांगले वळण लागावे म्हणून प्रयत्न करतो; चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो. उलट, नानावाडा येथील ‘नूतन विद्यालया’त मुले जेथून येत होती त्या जागेकडे, म्हणजे वेश्या वस्तीकडे जगातील वाईट ठिकाण म्हणून बघितले जाते. तेथे मुलांना घडवणे ही एक वेगळी जबाबदारी शिक्षकांवर आहे. ती जबाबदारी संध्या पांढरे व त्यांचे सहकारी सक्षमपणे पेलत आहेत.

मी त्या शाळेला केवळ एकदा भेट द्यायची असे ठरवून प्रथम गेले होते, पण तेथे गेल्यावर मला जाणवले, की ती एक भेट पुरेशी नाही, तेथे अनेक वेळा, शक्य तर वारंवार जायला हवे. ती मुले अभ्यासात हुशार आहेत, चुणचुणीत आहेत, त्यांच्यामध्ये एकाग्रता आहे. शिकण्याची इच्छा आहे. ती मुले ‘वंचित विकास’मधून आली आहेत. वेश्यांच्या मुलांना सांभाळण्याचे काम ‘वंचित विकास’ नावाची संस्था करते. तेथून ती मुले ‘नूतन विद्यालया’त येतात. त्या मुलांच्या येण्याने वेगळीच गोष्ट घडली. त्या भागातील इतर मुले जी शाळेत येत होती, त्या मुलांनी शाळेत येणे बंद केले! संध्या पांढरे यांनी इतर मुले येण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यांना लोकांचे मन बदलणे शक्य झाले नाही. “त्या खराब बायकांची मुले जेथे शिकतात, तेथे आमची मुले नको” असे म्हणून अगदी गरजू पालकदेखील मुलांना तेथे पाठवण्यास तयार झाले नाहीत.

संध्या पांढरे यांच्याकडून मुलांविषयीच्या अजून काही समस्या समजल्या. “ती मुले ‘वंचित विकास’मध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत असतात. त्यांतील काही वेळ ती ‘नूतन विद्यालया’त येतात, पण बाकी वेळ ती त्याच बकाल वातावरणात असतात. त्यांना आई आहे, वडील नाहीत. आईला त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यांच्या आयांचा व्यवसाय हा शरीरविक्रीचा आहे. त्या त्यांचे पोट भरण्यासाठी नाईलाजाने तो व्यवसाय करतात. त्या व्यवसायात कित्येकजणी तर बळजबरीने, फसवणुकीने किंवा गरिबीमुळे आल्या आहेत. त्या त्यांच्या मुलांवर प्रेम करतात, पण त्या मुलांवर त्यांच्या आजुबाजूच्या वातावरणाचा परिणाम झाल्याशिवाय कसा राहणार? परिणामी, बहुतेक मुले बिघडतात. मुली आजुबाजूच्या वातावरणामुळे कित्येकदा त्याच व्यवसायात खेचल्या जातात. मुले लहानपणापासून हे सर्व बघत असल्यामुळे, ती छोटी छोटी मुलेही अजाणता तशाच प्रकारचे खेळ खेळतात.” पांढरे मॅडम यांचे ते बोलणे ऐकताना एकीकडे माझ्या मनात अनेक विचार येत होते. मी त्यांना म्हणाले, “आपण दिवाळीच्या आधी या मुलांचे व त्यांच्या पालकांचे एकत्रित शिबिर घेऊया. _sudhir_date_nutan_vidyalayत्याला ‘दिवाळी पार्टी’ असे नाव ठेवुया. म्हणजे आम्हाला त्यांच्या आयांना भेटता येईल.” यावर पांढरे मॅडम म्हणाल्या, “त्या बायकांना भेटण्यास बोलावले, तर त्या येतच नाहीत. कारण त्यांना बघायला लोक जमा होतात.” मग आम्ही ठरवले, की शिबिर त्यांच्या वस्तीत, ‘वंचित विकास’ या संस्थेत जाऊन घ्यायचे. त्यांना काही उपदेश करण्यास बोलावायचे नाही, फक्त गप्पागोष्टी करण्यासाठी बोलावायचे.

मी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांना घेऊन येईन, हे पांढरे मॅडम यांना प्रतिभा यांना न विचारता सांगितले. फक्त तारीख त्यांच्या सोयीनुसार ठरवून तुम्हाला कळवीन असे आमचे बोलणे झाले. प्रतिभा रानडे यांनी स्त्रियांविषयी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्या पारंपरिक विचाराच्या असल्या, तरीही त्यांना स्वत:मधील स्त्रीशक्तीची योग्य जाणीव आहे. त्या स्वत:चे अस्तित्व पुरुषी समाजात निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्री आहेत. त्यांची ‘दुर्गाबाई भागवत’, ‘झाशीची राणी’, ‘बुरख्याआडच्या स्त्रिया’ ही पुस्तके म्हणजे स्त्री कर्तृत्वाला दिलेली एक प्रकारची सलामीच आहे! त्या चांगल्या कामासाठी कधीही नाही म्हणणार नाहीत, ही मला खात्री होती.

त्यानंतर दर शनिवारी रेवती आणि निरंजन ही दोघे जाऊन त्या मुलांना शिकवू लागली. रेवती आणि निरंजन ही दोघेही सोनाली देशमुख यांची मुले. रेवती ही इंजिनीयरिंगची पदवी मिळवून पुण्यात नोकरी करते, तर निरंजन हा ‘स्पेशल’ आहे. शाळेतील मुलांमध्ये बदल काही दिवसांतच दिसू लागला. माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे, की शिक्षणात प्रगती होण्यासाठी सरकारकडून शाळांना प्रोजेक्टर, कॉम्प्युटर, टॅब दिले जातात. पुस्तके, वह्या, रेनकोट, दप्तर, बूट येथपासून अनेक वस्तू गरजू मुलांनी शिकावे म्हणून त्यांना शाळेत वाटल्या जातात. पण त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक दर्ज्यामध्ये फारसा बदल घडत नाही. त्या सर्व गोष्टींची गरज आहेच; पण, शिक्षणासाठी सर्वात प्राथमिक गरज आहे - ती पोटाला पुरेसे अन्न, घरून मिळणारी पालकांची माया आणि शिक्षकांचा प्रेमळ सहवास या गोष्टींची. शिक्षकांच्या मनी त्यांच्या विद्यार्थ्यांनी शिकावे अशी तळमळ हवी, तर विद्यार्थी पटापट शिकत जाऊ शकतात.      

रेवती आणि निरंजन तळमळीने नानावाडा येथील ‘नूतन विद्यालया’त जाऊ लागले. त्यांच्यामुळे दीड महिन्यांतच त्या मुलांमध्ये केवढा तरी फरक पडला! मुले चित्रे काढू लागली. रेवतीने त्यांना मातीचे गणपती बनवण्यास शिकवले. त्यांना इंग्रजी शिकवण्यास सुरुवात केली. ती सर्व मुले आवडीने शिकू लागली. तेथेच आमच्या दिवाळी पार्टीचा पाया तयार झाला. मुलांमधील बदल त्यांच्या आयांना सुखावत होता. त्या त्यांच्या लेकरांचे चांगले व्हावे या इच्छेने समोर आलेला नरकवास झेलत होत्या.

_divali_bhetसोनाली देशमुख यांनी दिवाळी पार्टीची सर्व तयारी केली. ‘भाग्यश्री फाऊंडेशन’तर्फे ‘वंचित विकास’ या संस्थेमध्ये त्या सर्व स्त्रियांना व मुलांना ती दिवाळी पार्टी योजण्यात आली होती. प्रतिभा रानडेदेखील उत्साहाने आल्या. त्या ब्याऐंशी वयाच्या आहेत. त्या ‘वंचित विकास संस्थे’मध्ये मोठे तीन जिने चढून, कसलीही कुरकुर न करता हसतमुखाने आल्या. त्यांच्या पायाच्या हाडाला फ्रॅक्चर पडल्यामुळे दीड वर्षापूर्वी झाले आहे. त्या कार्यक्रमाला पस्तीस बायका आल्या. संस्थेमधील शिक्षिका आरती तरटे व तृप्ती फाटक या दोघीही मला म्हणाल्या, “एरव्ही कधी बोलावले तर पाच-दहा बायका पण येत नाहीत”. रेवतीने त्यांचे जे वर्ग घेतले होते, त्यामुळे त्या मुलांची तिच्याशी जवळीक झाली होती; त्याचाच तो परिणाम.

आम्ही त्या स्त्रियांना कोठलाही सल्ला दिला नाही. मी त्यांची योगासने व मेडिटेशन घेतले. त्यांना सांगितले, “प्रथम स्वत:ला एक छान व्यक्ती समजा, जी तुम्ही आहात. कारण सांगू, तुमची मुले फार छान आहेत. पालकांचे प्रतिबिंब मुलांमध्ये दिसत असते. कित्येक माणसे समाजात त्यांच्या चांगुलपणाचे, श्रीमंतीचे, विद्वत्तेचे प्रदर्शन करत असतात. पण त्यांच्या मुलांकडे बघितल्यावर त्यांचे माणूस म्हणून असलेले लहानपण कळून येते. ते त्यांच्या मुलांनाच जर चांगले संस्कार देऊ शकले नाहीत, तर इतर सर्व गोष्टी करणे व्यर्थ आहे. ते सर्व संस्कार ‘वंचित विकास’ व ‘नूतन विद्यालय’ यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांना दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही स्वत:विषयीचा न्यूनगंड मनातून काढून टाका. जशी मी व्यक्ती आहे, तशाच तुम्ही एक व्यक्ती आहात.” असे बोलताच त्यांचा बुजरेपणा, बावरलेपणा कमी होऊ लागला. नंतर संध्या पांढरे व सोनाली देशमुख यांनी त्यांना त्यांच्या मुलांची अभ्यासातील प्रगती सांगितली. संध्या पांढरे व आरती तरटे यांनी मुलांविषयीच्या स्वच्छता, आरोग्य यांच्याशी संबधित काही गोष्टी सांगितल्या. त्या सर्व शिक्षकांना फार आंनद झाला होता. कारण त्या निमित्ताने त्या सर्व बायका त्यांना भेटल्या होत्या. त्यांना त्यामुळे त्यांच्याशी बोलणे शक्य झाले होते.      

रानडे यांनीदेखील आईच्या मायेने त्यांच्याशी संवाद साधला. त्या सर्वजणी जणू माहेरी आल्याप्रमाणे प्रेमाने आमच्याशी गप्पा मारत होत्या. त्यानंतर आम्ही सर्वांना खाऊ, खेळणी यांचे वाटप केले. रेवतीने सर्व मुलांमध्ये काय काय चांगले आहे, ते सर्वांसमोर सांगितले. त्यामुळे त्या मुलांना खूप छान वाटले. तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सर्वात शेवटी आम्ही सांगितल्याप्रमाणे पांढरेमॅडम यांनी घोषणा केली, की जी मुले तेथून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करतील त्यांच्या पुढील शिक्षणाची व मार्गदर्शनाची जबाबदारी ‘भाग्यश्री फाऊंडेशन’तर्फे घेतली जाईल. अशा प्रकारे, त्या पार्टीची सांगता फार आनंदात झाली. इतका आनंद मनाला मिळाला त्याचे वर्णन मला करता येणार नाही.      

पांढरेमॅडम यांचा फोन दुसऱ्या दिवशी दुपारी आला. त्यांच्या बोलण्यातून कार्यक्रम अपेक्षेपेक्षा जास्त छान झाल्याचा उत्साह व आनंद, दोन्ही ओसंडून वाहत होते. बाकी बोलणे झाल्यावर त्या मला म्हणाल्या, “मॅडम, काल तुम्ही जी घोषणा केली; त्यानंतर जाताना त्यांतील एक बाई माझ्याकडे आली. ती बाई तिच्या मुलाला शाळेतून काढणार होती. मी कितीही सांगून ऐकत नव्हती. ती माझ्याकडे येऊन म्हणाली, मी माझ्या मुलाला शाळेतून काढणार नाही. त्याला दहावीपर्यंत येथेच शिकवणार. मला खात्री आहे, तो शिकून पुढे खूप प्रगती करेल!” पांढरेमॅडम ते सांगत असताना मला फार आनंद वाटत होता. मी पांढरेमॅडम यांना म्हणाले, “मग तर आपलं उद्दिष्ट सफल झालं. आणखी काय हवं आपल्याला? शिक्षण म्हणजे माणसाला माणसाविषयी विश्वास वाटणं. ज्याच्याकडे जास्त शिक्षण आहे त्याला जास्त जबाबदारी घेता आली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांचा आधार होता आले पाहिजे तरच त्या शिक्षणाला अर्थ आहे.”

संध्या पांढरे व सुधीर दाते; तसेच ‘वंचित विकास’मधील आरती तरटे व तृप्ती फाटक यांच्या रोजच्या काही तासांच्या संगतीमुळे त्या वेश्या वस्तीतील वेश्यांची मुले चांगले मनुष्य बनू शकतात. तसेच रेवती देशमुख हिच्या पाच ते सहा आठवड्यांच्या प्रयत्नांतून ती मुले बऱ्यापैकी इंग्रजी बोलण्यास शिकतात, चित्रे काढण्यास शिकतात, मातीपासून वस्तू बनवण्याचा प्रयत्न करतात. तर, नियमित शाळांमधील शिक्षकांसमोर जूनमध्ये चाळीस-पन्नास-साठ अशी काही मुले येतात, ते त्यांची अभ्यासातील प्रगती का नाही मार्चपर्यंत साध्य करू शकत? प्रत्येक शिक्षकाने मुलांना समजून घेऊन शिकवण्याचा प्रयत्न जर केला, तर प्रत्येक शिक्षकाला नक्की यश येईल. त्यांच्या वर्गातील पन्नास मुलांचे जीवन नक्की बदलेल... आणि अशा सर्वांचा एकत्रित परिणाम?

शिक्षण हा विषय फार मोठा आहे. त्याविषयी जितका विचार करू, अभ्यास करू तितकी एक गोष्ट लक्षात येते; ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे कार्य समुद्रातील एका छोट्याशा थेंबाप्रमाणे आहे. ‘शिक्षक व्यासपीठा’वर विविध शिक्षणविषयक उपक्रमांवर चर्चा होत असते. शालेय शिक्षण जास्तीत जास्त सहज होऊन मुलांपर्यंत जावे; त्यातून त्यांना त्यांच्या जीवनाशी निगडित अनेक गोष्टी साध्य करता याव्यात... अशा ‘अनेक गोष्टीं’विषयी त्या व्यासपीठावर विचार होत असतो. शिकतानाचा प्रत्येक अनुभव हा जीवनात काहीतरी भर घालतो, पण त्या अनुभवाकडे शिकण्याच्या दृष्टिकोनाने पाहता यायला हवे. चांगले शिक्षण घेण्यासाठी मुलांमध्ये प्रथम शिकण्याची आवड व जाणीव निर्माण व्हायला हवी. शिक्षण म्हणजे नेमके काय? हे त्यांना कळायला हवे, कारण जी गोष्ट कळते तीच वळते! त्यानंतर जीवनात त्या गोष्टीचा उपयोग होऊ शकतो.

_pratibha_ranadeआम्ही ‘भाग्यश्री फाऊंडेशन’तर्फे विविध शिबिरे ठिकठिकाणी शाळांमध्ये घेतो. त्या कामासंबंधीचा लेख ‘सकाळ’ वृत्तपत्रात आला होता. आम्ही शाळांतील मुलांना लिहिता-वाचता यावे, त्यांच्या मनात अभ्यासाची गोडी उत्पन्न व्हावी यासाठी ‘रोजनिशी’ उपक्रम चालवतो. त्यासंबंधीचा तो लेख होता. तो लेख वाचून मला श्रीमती संध्या पांढरे या शिक्षिकेचा फोन आला. मॅडम, तुमचे काम मला खूपच आवडले. आमच्या शाळेला तुम्ही भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे. पण...’’ एवढे बोलून त्या थांबल्या. “काय झाले?’’ मी विचारले. त्यावर त्या थोडे अडखळत म्हणाल्या, आमची शाळा पुण्यातील नानावाडा येथे भरते. नूतन विद्यालय असे आमच्या शाळेचे नाव आहे. महानगरपालिकेची ती शाळा आहे. शाळा पहिली ते चौथीपर्यंत असून, तेथे एकूण वीस मुले आहेत. पाच ते दहा वयोगटातील ती मुले आहेत.’’ त्या बार्इंची तळमळ त्यांच्याशी बोलताना मला जाणवत होती. त्या समाजातील तथाकथित टाकाऊ घटकासाठी इतक्या तळमळीने काम करत होत्या! त्यांनी त्या तळमळीनेच मला फोन केला होता. मला कळेना, की मी त्यांच्यासाठी काय करू शकते! रोजनिशी उपक्रमाचा तेथे काहीही उपयोग नव्हता. त्या लहानग्या मुलांना मी पाहिले नव्हते. तरीही त्यांना रोजनिशी उपक्रम आणि लिहिणे-वाचणे या पलीकडे कशाची तरी गरज होती, हे मी समजू शकत होते.      

- शिल्पा खेर 98197 52524
संयोजक, शिक्षक व्यासपीठ
khersj@rediffmail.com

लेखी अभिप्राय

अतिशय कौतुकास्पद काम!

Pradip Pandav18/12/2019

अशा मुलांसोबत राहून त्यांना शिकवणे खरंच खूप अवघड आहे, या सर्व शिक्षकांच्या कार्याला सलाम.

Sunita Date18/12/2019

मॅडम फार छान काम करत आहात. वंचित समाजातील मुलांना शिक्षण मिळाले तरच त्यांच्या जीवनात प्रकाश पडेल. संध्या पांढरे, दाते सर यांची तळमळ अभावानेच पहावयास मिळते.

Manoj Khedkar21/12/2019

शिक्षकांच्या कार्याला सलाम दोघे खूप मेहनत घेतात मुलं खूप हुशार चिकित्सक आहेत आणि यांना घडवण्याचे समाजात आणण्याचे पवित्र काम तुम्ही करत आहात great.

Swapnarani Bhalerao13/01/2020

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.