झाडीपट्टीच्या लोकजीवनातील वाघनदी! (Shrubbery Wagh River)


_wagh_nadiवाघनदीचे गोंदिया जिल्ह्याच्या लोकजीवनात महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाघनदीचा उगम छत्तीसगढ राज्यात असून तिच्या उगमस्थानाजवळच्या गावाचे नावच बाघनदी आहे (हिंदीत वाघचा उच्चार बाघ असा केला जातो). बाघनदी हे गाव वेगाने शहरीकरणाकडे वाटचाल करत असले तरी वाघनदीचे ग्रामसौंदर्य मात्र त्या गावाने जपलेले आहे. मुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्गावरील ते गाव, त्याच्या ‘अजीबोगरीब’ (विचित्र) नावाने त्या महामार्गाने जाणाऱ्या-येणाऱ्यांना मोहवून घेते. 

वाघनदी एकेकाळी बारमाही प्रवाही नदी होती. माझे गाव बोरकन्हार हे त्या नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. आम्हाला नदीपर्य॔त पोचण्यासाठी कन्हारी-मातीच्या शेतातून सुमारे एक किलोमीटर चालावे लागते. गावातील गुरेढोरे दिवसातून एकदा तरी त्या नदीला कवटाळत असतच. नदीच्या पात्रात बोरकन्हार व भजेपार या गावांदरम्यान एक खोल डोह होता (आजही आहे). त्या डोहातील पाण्याची खोली किती असेल, यावरही एकेकाळी वाद-संवाद होत असत. कोणी म्हणे, ‘एका खाटेची रस्सीही पुरणार नाही’; तर दुसरा म्हणे, ‘नाही गा! तेवढा खोल नसे डोह, असेल दहा-वीस फूट खोल!’ डोहाच्या काठावर उंबराचे मोठे झाड होते. ते झाड नंतर जेव्हा मी बालकवींची औदुंबर कविता वाचली व ग्रेस यांच्या संपादनाखालील ‘युगवाणी’च्या एका दिवाळी विशेषांकात त्यावरील गूढरम्य ‘लिखाण’ वाचले, तेव्हापासून माझ्या मनोविश्वात जिवंत झाले. आजही ते जिवंतच आहे. ते झाड मात्र अस्तित्वशून्य झाले आहे.

वाघनदी आणि पोळ्याचा दुसरा दिवस(भाद्रपद एकादशी) म्हणजे आमच्याकडील मारबतचा दिवस यांचा अभिन्न असा स्मृतिबंध माझ्या मनोविश्वात आहे. नदीच्या काठावर आमची काही शेती होती/आहे. ती शेती तेव्हा व आजही पडितच आहे. त्या शेतीत आंब्याची एक-दोन झाडे असल्याचे मला आठवते. त्या शेतीच्या व नदीच्या दरम्यान नदीच्या अगदी काठावर कटंगचे वनच होते. त्याचा अंश शिल्लक आहे. तेथेच बेलाचेही झाड होते. त्याचे अस्तित्व टिकून आहे. त्या शेतीचे नाव म्हणजे ‘मारबत टेकर!’ विदर्भात, झाडीपट्टीत पोळ्याच्या दुसऱ्या दिवसाला मारबतचा दिवस म्हटले जाते. त्या दिवशी नागपूर येथे मारबतींची मोठी मिरवणूकसुद्धा काढली जाते. त्या दिवशी झाडीपट्टीतील बहुतेक घरी कोंबडा-बकऱ्याचे मटण शिजतेच शिजते. श्रावण महिन्यातील सामिष-उपवासाची सांगता अशी केली जाते. 

मारबत टेकर का? तर... मारबतच्या दिवशी अगदी पहाटे-पहाटे (सुमारे चार वाजता) गावातील प्रत्येक घरातून ओल्या कन्हारी मातीच्या मारबतीमध्ये तेल टाकून वाती पेटवल्यावर मातीची ती लंबगोल मारबत हाती घेऊन, घरभर ‘ढेकुल, मोंगसा, राई-रोग, खासी-खोकला घेऊन जा गे मारबत!’ असा घोष लावून, ती पेटती मारबत ‘थंडी करण्यासाठी’ तिला त्या मारबत टेकरावर नेऊन तेथे दरवर्षीच्या मारबतीने झालेल्या उंचवट्यावर ती ज्याची त्याची मारबत टेकवत असत. म्हणून तो ‘मारबत टेकर!’ मारबत ‘थंडी केल्यावर’ (म्हणजे त्या मातीच्या ढिगाऱ्यावर ठेवल्यानंतर) तेथे गावचा नंगारसी (आदिवासी जमातीतील ढोल वादक) त्याच्या आवेशात्मक ढोल वाजवू लागे आणि मग कुस्तीचा फड जमायचा. पाच-सहा पैलवान कुस्त्या खेळत. जो जिंकेल त्याला छोटे-मोठे बक्षीसही दिले जाई. पण कुस्ती-फडाचा उद्देश बक्षीस मिळवणे हा नसायचा, तो मारबत ‘साजरा’ करायचा गावकऱ्यांचा आनंदमय रिवाज असायचा! आमच्या गावचा बारीक शरीरयष्टीचा, नेहमी बिमारसारखा दिसणारा काशीराम मेंढे त्या मारबत ‘थंडी करण्याच्या’ आणि कुस्तीच्या फंदात पडायचा नाही. तो दरवर्षी मारबतीच्या दिवशी न चुकता दुथडी भरून वाहणाऱ्या त्या भयकारी वाघनदीला पोहून ओलांडणे व पोहतच परत फिरणे या दरवर्षीच्या अखंड कार्यक्रमात मग्न असायचा. खरे तर, तो केव्हाचाच नदीत कुदलाही असे. लोक त्याला कौतुकाने पाहत, ‘जास्त दूर नको जाऊ’ असे ओरडून सांगत - त्यात त्यांची काळजी असे. ते सारे नवशे गवशे आता काशिरामच्या चिखलयुक्त पुराने डबडबलेल्या व भयंकर आवाज करणाऱ्या _borkanaharपाण्यातील संथ पोहणे पाहण्यात दंग झालेले असतात. बैलपोळ्याच्या कालावधीत पाणी गढूळ असते. त्यावेळी झाडे, साप, माती अशी असे सारे नदीतील पाण्याबरोबर वाहून येत असते.

मारबतच्या दिवशी मारबत टेकरावर जाणे, कुस्तीचे फड जमणे/जमवणे, काशीरामचे (आता दिवंगत) पोहणे आणि मुख्य म्हणजे वाघनदीचे दुथडी भरून वाहणे पाहणे, ह्या सर्व बाबी ‘सशाच्या शिंगांप्रमाणे’(!!!) अदृश्य झाल्या आहेत. वाघ नदी थोडी पुढे जाऊन वैनगंगा या मोठ्या नदीत सामील होते व तिचे स्वत:चे अस्तित्व शून्य करून बसते. आमची वाघनदी तिच्या मर्जीने आता भर पावसाळ्यातही दुथडी भरून वाहू शकत नाही. वाघनदीवर पूजारीटोला येथे 1967 ते 1972 च्या दरम्यान धरण बांधण्यात आले व आमची स्वतंत्र वाघनदी आम्हा माणसांच्या ताब्यात (!) आली. आता, तिला पूर्वीप्रमाणे स्वमर्जीने दुथडी भरून वाहता येत नाही. खूप पाऊस आला आणि पुजारीटोला धरण भरल्याने धरणाचे दरवाजे उघडले तरच (आम्हा माणसांच्या मर्जीनेच) ती दुथडी भरून वाहू शकते. तिला तशी संधी दर पावसाळ्यात दोन-तीन प्रसंगी मिळते. त्यामुळेच वाघनदीचे बारमाही प्रवाही असणेसुद्धा ऐतिहासिक तथ्य उरले आहे. पण त्यासाठी वाघनदीचा एकही पुत्र वाघनदीवर नाराज मात्र नाही, कारण तिच्यावरील पुजारीटोला धरणामुळे तिचे पुत्र धानाची खरीप व उन्हाळी अशी दोन्ही पिके घेऊ शकतात. म्हणजे वाघनदीचा बारमाही प्रवाहत्याग तिच्या पुत्रांसाठी सकारात्मकच ठरला आहे! वाघनदीच्या उगमावरील शिरपूर बांध व दरम्यानचा कालीसराड बांध हेसुद्धा वाघनदीच्या उन्मुक्त, स्वमर्जी प्रवाहाला बाधकच ठरत असले तरी झाडीपट्टीची ती जीवनदायिनी वाघनदीमाय नाराज नसावी असे वाटते. कधी कधी, तिचा संयम सुटतो व ती ‘भरकटते’, तरी एकंदरीत आमची वाघनदी आम्हाला प्रियच आहे. स्वतः संकोचूनही ती तिच्या पुत्रांच्या कामी पडत आहे.

- लखनसिंह कटरे 7066968350
lskatre55@gmail.com 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.