मराठी पंडिती (आख्यानपर कविता) (Marathi Pandit Poet)


_marathi_pandit_kaviमराठी काव्य मध्ययुगात पंडिती अंगाने प्रकट झाले. ते अभ्यासून कविता लिहीत. त्यात काव्याचा उत्स्फूर्त आविष्कार नसे. पंडित कवींनी रामायण, महाभारत, भागवत पुराणे, रघुवंश, कुमारसंभव, हनुमन्नाटक(प्रभु रामचंद्र यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ), शकुंतला यांसारख्या संस्कृत काव्यातील विषयांना त्यांच्या काव्यलेखनाचे विषय म्हणून निवडले. मुक्तेश्वर, वामनपंडित, रघुनाथ पंडित, सामराज, श्रीधर, नागेश, विठ्ठल, मोरोपंत या कवींना पंडितकवी म्हणूनच ओळखले जाते. त्यांच्या रचना मुख्यत: संस्कृत काव्याच्या वळणावर, विविध गणवृत्तांवर आधारित लिहिलेल्या आख्यानपर होत्या.

मध्ययुगीन मराठी वाङ्मयात पंडिती काव्याचे दालन समृद्ध आहे. पंडिती काव्याचा कालखंड यादवकाळ, शिवकाळ आणि पेशवेकाळ असा आहे. त्या काळातील पंडित विद्वानांनी विद्वान वाचकांना समोर ठेवून जी काव्यनिर्मिती केली त्या रचनेला पंडिती काव्य ही संकल्पना वापरली जाते.

पंडित कवींच्या रचनेचे प्रयोजन मोक्षप्राप्ती हे तर होतेच; पण त्याचबरोबर काव्याचा आस्वाद रसिकतेने घेणे, स्वतःची विद्वत्ता, पांडित्य रसिकांना दाखवणे - त्याचे प्रदर्शन करणे हेसुद्धा होते. पंडित कवींना सामाजिक-राजकीय आश्रय लाभलेला होता. पंडित कवींपैकी अनेकांचा व्यवसाय हा पुराणिकाचा होता. त्यामुळे त्यांना रचनेसाठी हवे असलेले सामाजिक, मानसिक स्वास्थ्य विपुल प्रमाणात लाभले होते. त्यांनी काव्याचा अभ्यास केलेला असल्याने ते काव्यालंकार, काव्यशास्त्र यांमध्ये पारंगत होते. त्यांनी त्यांच्या काव्यात विविध प्रयोग केले. 

पंडित कवी कोणत्याही एका विचारसरणीशी, तत्त्वज्ञानाशी, संप्रदायाशी बांधील नव्हते. पंडितांनी केवळ कलेला, कलाविष्काराला महत्त्व दिले. त्यांनी त्या काळात असलेले विद्वान, पंडित, बुद्धिवंत यांना समोर ठेवून काव्यलेखन केले. पंडिती काव्याच्या आस्वादकांचा वर्गही तसाच व्युत्पन्न आणि मर्मज्ञ होता. पंडितांना बहुजन समाजाशी देणेघेणे नव्हते. त्यामुळे पंडितांकडून सर्वसामान्यांना समजेल, रुचेल अन सर्वसामान्यांच्या आकलनाच्या कक्षेत येईल अशी रचना झाली नाही.

पंडितांनी त्यांच्या काव्यातून केलेले आवाहन हे भावनेपेक्षा बुद्धीला अधिक आहे. त्यामुळे त्यांनी अलंकाराचा सोस काव्यात धरला, विविध प्रकारच्या रचनापद्धती काव्यात आणल्या, तंत्रबद्धतेला अतिरेकी महत्त्व दिले. त्यामुळे पंडिती कविता चमत्कृतीत रमली. सर्वसामान्यांना ती कविता तिच्यात संस्कृतप्रचुरता अधिक असल्याने समजली नाही. पंडिती काव्य रचनेच्या दृष्टीने कलात्मक खरे, पण क्लिष्टही झाले. पंडिती काव्यातून सर्व रसांचा आविष्कार जाणीवपूर्वक घडवला गेला असला तरी तेथे वीर व शृंगार या रसांना विशेष स्थान मिळाले; कृतक पद्धतीने काव्य घडवण्याच्या नादात कधी कधी रसहानीही झाली. मात्र पंडितांकडून मराठी भाषेला समृद्ध करणारे काव्यलेखन झाले. पंडित कवींनी संस्कृत भाषेची शैली, डौल, प्रौढी, अलंकरणे, रचनाप्रकार मराठीत आणून मराठी भाषा विविध रसांनी संपन्न केली. पंडित कवींनी काव्यरचना विविध प्रकारच्या केल्या. त्यामध्ये महाकाव्य, खंडकाव्य, चंपुकाव्य, लघुकाव्य, कथाकाव्य, आरत्या, स्तोत्रे, चरित्र इत्यादींचा समावेश आहे. त्यांतील प्रसिद्ध पंडित कवी -

आख्यानकार मुक्तेश्वर (Mukteshwar)

मुक्तेश्वर हे मराठी पंडित कवींमधील अग्रगण्य, रसाळ, आख्यानकार व श्रेष्ठ कलाकवी. मुक्तेश्वर हे संत एकनाथांच्या गोदा नावाच्या मुलीचा मुलगा. त्यांच्या पित्याचे नाव चिंतामणी. त्यांचे बालपण व शिक्षण एकनाथ यांच्याकडे झाले. मुक्तेश्वरांनी देशाटन व तीर्थाटन भरपूर केले असावे. मुक्तेश्वरांची कविता सतरा हजार इतकी भरते. मुक्तेश्वरांनी संत एकनाथांकडून स्फूर्ती घेऊन संक्षेप रामायण रचले असावे. रामायण विविध छंदांमध्ये लिहिण्याचा पहिला मान मुक्तेश्वर यांना मिळाला आहे.

_mukteshawar_mandir_dattamandirमुक्तेश्वरांनी संपूर्ण महाभारत लिहिले किंवा काय? याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांची पाच पर्वे मात्र उपलब्ध आहेत - आदी, सभा, वन, विराट सौप्तिक -  त्या पाच पर्वांची ओवीसंख्या चौदा हजार एकोणऐंशी आहे. त्यातून मुक्तेश्वर यांचे श्रेष्ठ दर्ज्याचे कलाकवित्व प्रकट होते. त्यांच्या काव्यात प्रतिभा आणि पांडित्य, विद्वत्ता आणि रसिकत्व यांचा मनोहर संगम आढळून येतो. मुक्तेश्वर यांचे ओवीवृत्तावर प्रभुत्व दिसते. मुक्तेश्वरांनी महाभारत लिहिण्यापूर्वी अनेक प्राकृत भाषांमधील महाभारताचा अभ्यास केला होता. त्यांनी त्यांच्या महाभारतात त्यांच्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी महाभारत लिहिले होते त्या सर्वांचा उल्लेख केला आहे. तसेच, त्यांनी त्यांच्या उणिवा दाखवून देण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यांनी खुद्द व्यासांच्या चुका दाखवून दिल्या आहेत. त्यावरून मुक्तेश्वर यांची बंडखोर वृत्ती दिसते.

मुक्तेश्वर यांची शैली आकर्षक, डौलदार आहे. त्यात त्यांना रम्य, अद्भुत, उदात्त भव्य अशा प्रसंगांचे आकर्षण आहे. मुक्तेश्वरांचा कल्पनाविलास मार्मिक उपमा, समर्पक दृष्टांत, पल्लेदार रूपके यांतून प्रकट झाला आहे.

रसाळ श्रीधर कवी (Shreedhar)

श्रीधर म्हणजे भक्तिरसामृताचा झरा. त्यांची वाणी-लेखणी रसाळ होती. त्यामुळे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचले व प्रिय झाले. श्रीधर यांचे वास्तव्य व लेखन पंढरपूर येथेच झाले. त्यांचे ग्रंथ घरोघरी पोचले आहेत. श्रीधर यांनी अनेकविध स्वरूपाचे काव्य, विपुल रचना केली आहे. त्यांचे हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप, शिवलीलामृत, पांडुरंग महात्म्य, व्यंकटेश महात्म्य, वेदांतसूर्य, ज्ञानेश्वरचरित्र; यांशिवाय, काही संस्कृत स्तोत्रे व किरकोळ पदे, संस्कृतातील तत्त्वगीता, मल्हारीविजय, जैमिनी प्रकरण, ‘पंढरीमहात्म्य’ इत्यादी रचना लोकप्रिय आहेत. ‘हरिविजय’ हा ग्रंथ श्रीकृष्ण चरित्रपर आहे. त्यांनी कृष्णकथा साध्या शब्दांतून सुबोध पद्धतीने मांडली आहे. श्रीधर यांचा ‘पांडवप्रताप’ हा सर्वाधिक लोकप्रिय ग्रंथ होय. श्रीधर यांनी ‘पांडवप्रतापा’त पांडवांची विजयगाथा रसाळपणे व परिणामकारक रीत्या वर्णन केली आहे. तिच्यात करूण, वीर, हास्य हे रस दिमाखाने मिरवतात. त्यांच्या ग्रंथांची भाषा सुगम, सहजसुंदर व रसानुकूल आहे. ‘शिवलीलामृत’ या त्यांच्या ग्रंथाची कथा स्कंद पुराणातून घेतली आहे. ‘शिवलीलामृतां’त पौराणिक आख्यानांचा संग्रह नसून व्रतकथा व _hariharदैवतकथा यांचा संग्रह आहे. जैमिनी अश्वमेधाची कथा वर्णन केली आहे. श्रीधर यांच्या निवेदनशैलीची सर्व वैशिष्ट्ये ‘जैमिनी अश्वमेध’ या ग्रंथात दिसून येतात.

रघुनाथ पंडित (Raghunath Pandit)

रघुनाथ पंडित हे समर्थभक्त कवी होते. त्यांच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. त्यांनी रामदासवर्णन, गजेंद्रमोक्ष, दमयंतीस्वयंवर अशी अल्प रचना केली. त्यांचे ‘रामदासवर्णन’ हे पहिले काव्य होय. रघुनाथ पंडित यांचे ‘दमयंती स्वयंवर’ हे महत्त्वाचे काव्य असून ते मराठीतील सर्वश्रेष्ठ काव्य मानले जाते. त्या ग्रंथात दमयंती स्वयंवरापर्यंतचा कथाभाग आला आहे. संस्कृत महाकाव्याचा आदर्श समोर ठेवून त्या कथानकावर मराठी काव्यरचना करणारे रघुनाथ पंडित हे भास्कर भट्ट बोरीकर यांच्यानंतरचे पहिले मानकरी होत. ‘गजेंद्रमोक्ष’ हे प्रकरण भागवतावर आधारित आहे. त्याची रचना विविध वृत्तांत आहे.

सामराज (Samraj)

सामराज हे शिवकालीन कवी होते. त्यांनी छत्रपती शिवाजी, संभाजी, राजाराम या तिघांच्या कारकिर्दी पाहिल्या. त्यांना राजदरबारातील रीतिरिवाजांचा, लोकव्यवहाराचा परिचय चांगला होता. त्यांनी कुलदेवतेविषयीच्या लेखनाने काव्यरचनेस प्रारंभ केला. ‘रुक्मिणीहरण’ या ग्रंथाची कथा भागवताच्या दशम स्कंधावर आधारलेली आहे. सामराजांनी त्यांच्या प्रतिभेने काव्यात अनेक प्रसंग निर्माण केले. रुक्मिणीची शालीनता, मनाचे औदार्य, समयसूचकता इत्यादी गुणवर्णनामुळे तिचे चित्र आकर्षक झाले आहे; काही ठिकाणी रसहानीदेखील झाली आहे. सरळ, साधे आणि प्रासादिक निवेदन हे सामराज यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. महाकवीच्या तोलामोलाची कवित्वशक्ती सामराजांजवळ होती.

नागेश (Nagesh)

नागेश ऊर्फ नागभट्ट यशवंतराव कोकाटे हे आश्रित होते. त्यांनी संस्कृत पंचमहाकाव्ये, नाटके, अलंकारशास्त्रे, छंदशास्त्रे, कामविषयक ग्रंथ यांचा अभ्यास केला होता. नागेश कवींनी सीता स्वयंवर, चंद्रावळीवर्णन, रुक्मिणीस्वयंवर, रसमंजिरी इत्यादी ग्रंथरचना केली आहे. ‘सीतास्वयंवर’ हे नागेश कवींचे प्रसिद्ध काव्य होय. नागेश कवींनी अग्निपुराणातील कथाप्रसंगांतून चंद्रावळीवर्णनाची रचना केली आहे. चंद्रावळ नावाच्या गोपीशी श्रीकृष्णाने तिच्या बहिणीचे रूप घेऊन एकांतात भेट घेतली, त्याचे ते वर्णन आहे. चंद्रावळ व तिच्यासोबतच्या गोपी यांचे वर्णन त्या ग्रंथात आले आहे. नागेश कवी हे रसिक असल्याने लोकप्रिय होते.

विठ्ठल बिडकर (Vitthal Bidkar)

विठ्ठल बिडकर हे व्यापारी होते. पंढरपूरचा विठोबा हे त्यांचे उपास्य दैवत असल्याने, ते पंढरीच्या वारीला दरवर्षी जात असत. त्यांनी रामायण, महाभारत, भागवत, रघुवंश यांसारखी काव्ये अभ्यासली असावीत. ते स्वतःस सत्कविराज विठ्ठलदास असे म्हणवून घेत. विठ्ठलकवींनी ‘रुक्मिणीस्वयंवर’, पांचालीस्तवन, सीतास्वयंवर, रसमंजिरी, विद्वज्जीवन, बिल्हणचरित्र या ग्रंथांचे लेखन केले. बिल्हणचरित्र हे काश्मिरी कवी बिल्हणाच्या चौरपंचासिका ह्या संस्कृत काव्याचे भाषांतर आहे. वसंततिलका ह्या वृत्तात केलेल्या पद्यमय भाषांतरात कवी बिल्हण व राजकन्या शशिकला ह्यांच्या प्रेमाची व विवाहाची कथा आहे. त्यांनी त्या काव्यात ‘विठ्ठल’ या नावाखेरीज स्वतःची अन्य माहिती दिलेली नाही. त्यामुळे विठ्ठल बिडकर हेच त्या काव्याचे कर्ता असावे का? याबद्दल अभ्यासक शंका व्यक्त करतात. कमला-शारदा-संवाद ह्या विठ्ठल यांच्या ग्रंथात लक्ष्मी व शारदा यांचा वाद दाखवला आहे. त्यांनी रचलेल्या काव्यात रसाविष्कारापेक्षा अलंकारणास महत्त्व जास्त आहे. त्यांनी अनेक नवी वृत्ते मराठीत आणण्याचे कार्य केले. त्यांची रचना कृत्रिम व चमत्कृतिप्रधान आहे.

मोरोपंत (Moropant)

मोरोपंत हे शेवटचे पंडितकवी मानले जातात. त्यांनी सुमारे बेचाळीस वर्षें अव्याहतपणे विपुल लेखन केले. त्यांचे काव्य म्हणजे एक सागरच आहे. मोरोपंत सकलशास्त्र पारंगत असे चतुर राष्ट्रीय पुराणिक, दांडगे व्यासंगी, विशाल बुद्धीचे कुटुंबवत्सल असे गृहस्थ होते. त्यांच्या साहित्यावर अवतीभोवतीच्या राजकीय घटनांचा परिणाम झालेला नाही. त्यांच्या काळात नानासाहेब, राघोबा यांच्यासारख्या व्यक्तीच्या करामती, पानिपतचा रणसंग्राम अशा उलथापालथी घडल्या. परंतु, पंतांच्या साहित्यातून त्या उलथापालथींचा उल्लेख येत नाही. मोरोपंतांच्या काव्यलेखनामागील भूमिका अगदी सरळ होती- भगवंताचे गुणगान करावे. त्या कथा लोकांनी ऐकाव्यात, वाचाव्यात. त्यामुळे माणसामाणसांत प्रेमाचे, जिव्हाळ्याचे नाते निर्माण व्हावे. तसे नाते निर्माण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे असे ते मानत. पंत स्वतःकडे लहान _kekavaliकवीची भूमिका नम्रतापूर्वक घेतात.
मोरोपंतांच्या काव्यकलेचा उत्कर्ष ‘आर्याभारता’त झालेला दिसतो. पंतांनी व्यासांना वंदन करून तो भारत इतिहास दहा-बारा वर्षांत लिहून पूर्ण केला. ‘आर्याभारता’तील आटोपशीर कथा-संवाद, तालबद्धता, संस्कृतातील-रस, अलंकार-उपमाचातुर्य-शब्दचमत्कार-ईश्वरभक्ती-नीतिशिक्षण इत्यादींचा लाभ ‘आर्याभारता’च्या वाचनाने होतो. मोरोपंतांनी अनेक रामायणे लिहिली. त्यांनी प्रत्येक रामायणाची सुरुवात ‘श्रीराम जयराम जयजयराम’ अशा तेरा अक्षरी मंत्राने साधली आहे. मोरोपंतांनी एकूण एकशेआठ रामायणे लिहिली असे बोलले जाते. परंतु, त्यांपैकी सत्तर उपलब्ध आहेत. त्या सर्व रचनांतून पंतांची भगवंतावरील श्रद्धा दिसते. पंतांच्या रामायणातून त्यांची रामभक्ती, बुद्धिवैभव, भाषाप्रभुत्व, प्रतिभासंपन्नता दिसते. पंतांना रामायण-महाभारतावर रचना केल्यानंतर भागवतावर रचना करावी असे वाटू लागले. त्यातून मंत्र भागवताची निर्मिती झाली. भागवतातील छोट्या-मोठ्या कथा, तो ग्रंथ त्यांतील नित्य उपदेशाने साधला गेला आहे. त्यांनी विठ्ठल, गणपती, श्रीकृष्ण, कोल्हापूरची देवी, तुळजाभवानी, पुंडलिक, रामगंगा, कृष्णा-गोदावरी यांच्यावर स्तोत्ररचना केली आहे. पंतांनी त्या स्तोत्रांमधून त्यांची भक्ती व परमेश्वराविषयी त्यांचा पूज्यभाव व्यक्त केला आहे.

पंतांनी ‘श्लोक केकावली’च्या अगोदर आर्या केकावली लिहिली. त्या आर्या अतिशय सुंदर व भावस्पर्शी आहेत. मयूराने स्वतःच्या उद्धारासाठी जो करूण टाहो फोडला त्या केका. मयुराचा केकांच्या पंक्तीचा संग्रह म्हणजे ‘केकावली’ होय. श्लोक केकावली वाचताना रसिकाचे अंतःकरण द्रवल्याशिवाय राहत नाही. ते काव्य अप्रतिम व अतिप्रेमळ आहे. पंतांच्या बुद्धीचा पूर्ण विकास त्यातून दिसतो. देवाविषयी लडिवाळपण, प्रेम, भय, कवित्व, बुद्धिवैभव या सर्वांचे मधुर मिश्रण म्हणजे ‘श्लोक केकावली’ होय. मोरोपंतांनी विपुल काव्य लिहिले. त्यांचे काव्य म्हणजे परस्परविरोधी भावनांचे आगर आहे. त्यांचे एक श्रेष्ठ पंडित कवी म्हणून महत्त्व अनन्यसाधारण आहे.

-नितेश शिंदे info@thinkmaharashtra.com

लेखी अभिप्राय

खूप छान माहिती ,अभ्यासपूर्ण संशोधन लेख

ड्रा जगताप यू एस01/05/2020

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.