मुरुडकर झेंडेवाले: पुण्याची सांस्कृतिक खूण!


_murudkarपुण्याची व्यापारी गल्ली म्हणून पासोड्या विठोबा ते मारूतीचे मंदिर हा भाग प्रसिद्ध आहे. त्या गल्लीला लक्ष्मी रोडशी जोडणार्याल चौकाला मोती चौक असे नाव आहे. त्या गल्लीत पूर्वी पासोड्यांचा बाजार भरत असे. आता त्या गल्लीत इलेक्ट्रिकच्या वस्तूंची ठोक बाजारपेठ आहे. तेथेच, मुरुडकर यांचे दुकान 1940 सालापासून आहे. पासोड्या विठोबाच्या समोर त्यांच्या दुकानाची ‘मुरुडकर झेंडेवाले - कल्पकतेचे माहेरघर’ अशी आकर्षक पाटी ग्राहकांचे लक्ष वेधून घेते. तसेच, बाहेर ठेवलेल्या आकर्षक वस्तूंमुळे ग्राहकाच्या मनात कुतूहल जागे करते.

मुरुडकर यांनी पगड्या बनवण्याचा व्यवसाय चार पिढ्यांपासून जपला-जोपासला आहे. त्यांनी पगडी लोप पावण्याच्या उंबरठ्यावर असताना तिचे सांस्कृतिक वैशिष्ट्य जपले व तिला परंपरेचा मान मिळवून दिला! त्या दुकानाचे विद्यमान चालक आणि मालक आहेत गिरीश मुरुडकर. गिरीश यांच्या पणजोबांनी त्या गल्लीत छोटेसे दुकान सुरू केले. त्यांच्या वडिलांनी ते नावारूपाला आणले. त्यांचे पणजोबा शंकरराव हे लोकमान्य टिळक यांचे सहकारी होते. त्यांचे चिरंजीव रघुनाथ शंकर मुरुडकर, पद्माकर रघुनाथ मुरुडकर आणि आता गिरीश मुरुडकर अशी ती परंपरा आहे.

मुरुडकरांचा व्यवसाय उपरणी, फेटे, पितांबर यांसारख्या धार्मिक साहित्यापासून राजकीय प्रचारसाहित्यापर्यंत वस्तूंच्या विक्रीचा आहे. उदाहरणार्थ, पक्षप्रचारासाठी लागणारे झेंडे, बॅज, बॅनर्स वगैरे विविध वस्तू तेथे मिळतात. त्या दुकानात गणपती व इतर देवदेवता यांच्या पूजेसाठी आणि सजावटीसाठी लागणारे साहित्यही मिळते. गावोगावच्या जत्रा-यात्रांसाठी लागणारे सर्व साहित्य तेथे मिळते. उदाहरणार्थ जत्रेत वापरण्यात येणारे दंड, झेंडे, छत्र्या, अब्दागिरी; धर्म-समुदायांचे झेंडे व अनुषंगिक वस्तू, विविध कार्यक्रमांसाठी लागणारे बॅज, फेट्यांचे विविध प्रकार, जरीचे पडदे, बैठका, जिरेटोप त्यांच्याकडे मिळतात. गिरीश सांगतात, त्यांच्याकडे सर्व वस्तू बनवताना त्यांच्या योग्यतेबरोबरच त्या टिकाऊ, देखण्या आणि हाताळण्यास सोप्या (युजर फ्रेंडली) असाव्यात याची काळजी घेतली जाते. त्यांच्यापासून पर्यावरणाची हानी होणार नाही (इको फ्रेंडली) असेही पाहिले जाते. त्यांचा कटाक्ष कच्च्या मालासाठी भारत देशात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करण्याकडे असतो. मुरुडकरांकडे मिळणारे बहुतेक साहित्य हे फोल्डिंग करता येईल अशा स्वरूपाचे असते. त्यामुळे ते परदेशातही काहीही तोडफोड न होता उत्तम स्थितीत नेता येऊ शकते. 

_murudkar_zendewaleगिरीश सांगतात, “आमच्या दुकानात सुरुवातीला धोतर, लुगडी, इरकली साड्या, धारवाडी खण, सोवळ्यासाठी लागणारे कद व डोक्यावर बांधण्याचे रुमाल अशा वस्तूंची विक्री होत असे. पुढे, आम्ही मोठमोठ्या रुग्णालयांसाठी लागणारे बेडशीट्स, टॉवेल्स विकू लागलो. त्याच जोडीला उपरणी आणि लुंग्याही विकल्या जाऊ लागल्या. जन्माला आलेल्या बाळाचे बारसे करण्यासाठी लागणार्याउ वस्तूंपासून एकसष्टी साजरी करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मुरुडकरांच्या दुकानात एकाच छताखाली मिळते. मुरुडकरांच्या दुकानाची ओळख तशी तयार झाली आहे. 

राजकीय पक्षांना निवडणुकीच्या काळात आवश्यक असणारे साहित्य; तसेच, नेत्यांच्या जयंती-पुण्यतिथीनिमित्त लागणारे साहित्य मुरुडकर यांच्याकडे बाराही महिने उपलब्ध असते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांपासून, राजकीय कार्यकर्ते यांच्याप्रमाणेच विविध पक्षांच्या नेते मंडळींची ये-जा मुरुडकर यांच्या दुकानात असते. गिरीश गंमतीने म्हणाले, की “आमच्या दुकानात निवडणुकीच्या काळात खरेदीसाठी मित्र आणि विरोधी असे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येतात, आणि एकमेकांवर काहीही कॉमेंट्स न करता, त्यांची-त्यांची खरेदी करून शांतपणे निघून जातात.”  

गिरीश चित्रकार, शिल्पकार आहेत. त्यांचे हस्तकलेत नैपुण्य आहे. ते त्यांच्या कार्यशाळेमध्ये 'रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ या तत्त्वावर अभ्यास करून त्यांचे प्रॉडक्ट तयार करत असतात. त्यांचा जमान्याला साजेसे ‘प्रॉडक्शन’ करण्यावर भर असतो. त्यांनी सात-आठ वर्षांपूर्वी फिलाडेल्फियाला काही ‘प्रॉडक्ट’ पाठवले. त्यात फोल्डिंगच्या रियुजेबल अशा शाही फेट्याचा समावेश होता. अगदी हुबेहूब बांधल्यासारखा वाटणारा फेटा फिलाडेल्फियामधील भारतीय व अमेरिकन यांच्याही कौतुकाचा विषय ठरला. गिरीश म्हणतात, की झेंडेवाले हे आमचे आडनावच झाले आहे. कारण मुरुडकर म्हटले, की लोक विचारतात, की ते झेंडेवाले का? 

ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्सने त्याच्या लग्नाचे आमंत्रण मुंबईच्या डबेवाल्यांना दिले होते. डबेवाले त्याला आणि त्याच्या राणीला अहेर म्हणून साडी आणि पुणेरी पगडी घेऊन गेले होते. ती पगडी मुरुडकर यांच्या कार्यशाळेत तयार झाली होती. प्रिन्स चार्लस् यांना पाठवलेल्या पगडीमुळे पुण्याच्या व मुरुडकर यांच्या पगडीला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. गिरीश यांची कला विदेशात जाऊन पोचली; पण पुण्यात मात्र त्यांची ओळख अथवा खूण टिकून राहणारी गोष्ट त्यांनी केली नव्हती. एके दिवशी दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कै. प्रतापराव गोडसे यांनी गिरीश यांना बोलावून घेतले आणि म्हणाले, “तुम्ही आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली आहे, पण आपल्या बाप्पासाठी मात्र काही घडवले नाही.” गिरीश यांनी त्यांना फक्त पंधरा मिनिटांत पाच-सहा प्रकारच्या फेट्यांचे डिझाईन तयार करून दाखवले. प्रतापराव खूष झाले. मुरुडकर यांनी बनवलेल्या फेट्यामुळे दगडुशेठच्या बाप्पाचे रूप आणखी साजरे दिसू लागले. त्यातून त्यांचा ‘जय गणेश फेटा’ प्रसिद्ध झाला. त्यांनी फेट्यावर अष्टविनायकाच्या गोल्ड प्लेटेड मूर्ती, मोदकांची माळ, छोट्या छोट्या मोदकांची सजावट, दुर्वा अशा, गणपतीला आवडणार्या  वस्तूंचा वापर केला आहे. ‘शिवशंभो फेटा’ हा ब्राँझच्या रंगाचा असल्यामुळे असे वाटते, की तो ब्राँझमध्येच तयार केला आहे. त्यातही शिवशंकराला आवडणार्याा सर्व वस्तूंचा, जसे रुद्राक्ष, चंद्रकोर अशा गोष्टींचा वापर कल्पकतेने केला गेला आहे. मुरुडकरांनी मोरांच्या विविध प्रतिमांचा वापर करून ‘मयूर फेटा’ तयार केला आहे.

गिरीश भारत आणि फ्रान्स यांच्यामधील सांस्कृतिक मैत्री कार्यक्रमाचे प्रतिनिधी म्हणून एकवीस दिवस फ्रान्सला जाऊन आले आहेत. तेथे त्यांनी भारतीय लोककलांचा परिचय करून दिला. त्यात गरबा, कोळी नृत्य अशा नृत्यप्रकारांसाठी वर्कशॉप घेतले. गिरीश व्यावसायिक आहेत, पण त्याचबरोबर त्यांना सामाजिक जबाबदारीची जाण आहे. ते  ‘भारत फ्लॅग फाऊंडेशन’ नावाची संस्था (एनजीओ) चालवतात. त्यासाठी ते त्यांच्या -girish_murudkarव्यवसायातील नफ्याचा एक टक्का भाग वापरतात. त्या अंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. मरणोत्तर नेत्रदान करणार्याप व्यक्तींच्या नातेवाईकांना भेट म्हणून एनजीओकडून कृतज्ञता पत्रक दिले जाते. तसेच, त्या संस्थेच्या माध्यमातून दर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला लोकांनी वापरून, कोठेही टाकून दिलेले झेंडे जमा केले जातात. जेणेकरून ते पायदळी तुडवले जाऊन त्यांचा अपमान होऊ नये! ते ‘झेंडे बचाव’ मोहीम 2002 सालापासून राबवत आहेत.

गिरीश यांनी एका परदेशी पाहुणीची आठवण सांगितली. इरिना  ग्लुश्कोव्हाअसे त्या महिलेचे नाव. ती मराठी बोलते-लिहिते. ती पुणेरी पगड्यांवर लेख लिहिण्याच्या उद्देशाने भारतात आली होती. ती पुण्याला मुरुडकर यांना अर्थातच भेटली. तिचे काम झाल्यानंतर ती तिच्या मायदेशी रशियाला परतली. काही दिवसांनी मुरुडकर यांना एक पार्सल आले. त्यामध्ये तिने लिहिलेला पगड्यांवरील लेख आणि स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले पत्र होते. त्यात तिने पाहुणचारात घेतलेल्या मिष्टान्नाचा उल्लेख तर केला होताच; सोबत, गिरीश यांच्या हाताला झालेल्या दुखापतीबद्दल विचारणा केली होती. तिने घरातील इतर सर्व व्यक्तींबरोबर घरातील पाळीव कुत्र्याविषयीही चौकशी केली होती. शेवटी 'आपली स्नेहांकित' म्हणून सही केली आहे. ते पत्र गिरीश यांनी त्यांच्या ‘खरी कमाई’ या फोल्डरमध्ये व्यवस्थित जतन करून ठेवले आहे.

महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास व जलसंधारण खाते, पुणे महानगरपालिका, दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ इत्यादींनी मुरुडकर यांचा प्रशस्तिपत्रके देऊन गौरव केला आहे. पुण्याच्या ‘त्रिदल’ या संस्थेनेही त्यांचा गौरव केला आहे. सकाळ प्रकाशनाने पुण्याच्या जडणघडणीत महत्त्वाची कामगिरी करणार्यां पुणेकरांवर पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात मुरुडकर यांच्यावर एक प्रकरण आहे. 

गिरीश मुरुडकर उत्साही आणि बोलक्या स्वभावाचे आहेत. त्यांच्याकडे माणसांना जोडण्याची हातोटी आहे. त्यांचे लक्ष चौफेर असते. ते येणार्याआ ग्राहकांकडे, दुकानात काम करणार्याा कामगारांकडे लक्ष ठेवत असतानाच, त्यांचे लक्ष दुकानावर आलेला त्यांचा मुलगा यश याच्याकडेही तेवढ्याच प्रमाणात असते. गिर्हानईकांची गरज पूर्ण करता करता दुसरीकडे, त्यांचा  यशबरोबरचा संवादही सुरू असतो. यशही बोलका आणि हुशार आहे. यशला त्यांचा व्यवसाय पुढे चालवायचा आहे. परंतु नव्या स्वरूपात! यश जुन्याच जागेवर मॉल बांधण्याचे स्वप्न पाहत आहे. यश पंधरा वर्षांचा आहे. मुरुडकरांची पाचवी पिढीही पुण्याच्या आणि पुणेरी पगडीच्या तुर्याात मानाचे पान खोवण्यास तयार आहे.  

 मुरुडकर झेंडेवाले 9822013292

- मंगला घरडे 9763568430
mangalagharade@gmail.com

लेखी अभिप्राय

Girish we are proud of you..Dr. Ketkar had recorded our grandfathers name in Vishwakosh. Now you have recorded Internationaly our name as Zendewale. Keep it up.

Adv.Damodar Murudkar24/11/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.