शिवगौरा – मूर्तिरूपातील शंकर, उरणजवळ

Think Maharashtra 15/11/2019

_shiv_gauraखोपटे हे उरण तालुक्यातील अरबी समुद्रालगतच्या खाडीकिनारी वसलेले, विस्ताराने मोठे गाव. ते गाव सात पाड्यांनी मिळून बनले आहे. गावात इतर गावांसारखाच गणेशोत्सव साजरा होतो, पण तेथील गावकरी त्याच्या जोडीला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उत्सव साजरा करतात. तो आहे शिवोत्सव. ती परंपरा तब्बल आठ दशकांपासून चालू आहे. ‘शिवगौरा’ मंडळाद्वारे त्या उत्सवाला सुरूवात झाली. शिवोत्सव पाच दिवस चालतो. उत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. शिव आणि शक्ती यांच्यातील वर्चस्ववादाचे प्रतीक असणारे कलगी-तुऱ्याचे जंगी सामने आणि पारंपरिक नृत्य हे त्या विविधरंगी कार्यक्रमांचे वैशिष्ट्य. संपूर्ण महाराष्ट्र भाद्रपद महिन्यात गौरी-गणपतींची प्रतिष्ठापना करत असताना, खोपटे गावातील ‘शिवगौरा उत्सव मंडळ’ शिवोत्सव साजरा करत असते. ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी गावाच्या पाटीलपाड्यात थेट भगवान शंकर सुंदर आरास असलेल्या जागेत विराजमान होतात. भाद्रपद शुक्ल द्वादशीला गौराविसर्जन होते. शाडूच्या मातीपासून बनलेल्या ‘गौरा’ म्हणजे शिवमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. शिवमूर्तीची निर्मिती आणि पूजन हे त्याच परिसरापुरते होते की आणखी कोठे? सहसा प्रतीकरूपात होत असलेले शिवपूजन मूर्तिरूपात कसे आले?

उत्सवामागील कारण संयोजकांनाही ज्ञात नाही. परंतु त्या परिसरात प्राचीन काळापासून शिवपूजन होत आहे. त्या गावाच्या शेजारील पिरकोन या गावात 1120 च्या शिलाहार ताम्रपटात शिवपूजन करून दान केल्याचे उल्लेख आहेत. सिंधू नदीच्या खोऱ्यात ज्या प्राचीन वसाहतींचे अवशेष सापडले आहेत, त्या वसाहतींच्या काळापासून लिंगपूजा भारतात सुरू असल्याचे सांगतात. मूळ शिवलिंग हुबेहूब मानवलिंगासारखे घडवत असत. पुढे, त्याला खांबाचे सुरेख स्वरूप मिळाले. शिवलिंगे चौकोनी, अष्टकोनी आणि गोल अशा तिन्ही रूपांतील पाहण्यास मिळतात. कोठे कोठे त्या लिंगावरच शंकर, सूर्य, गणपती यांसारख्या देवतांच्या प्रतिमा असतात. कलेच्या क्षेत्रात इतकी परिवर्तने होण्यासाठी इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत सुमारे चौदाशे वर्षांचा कालावधी लागला.

खोपटे गावात होत असलेला ‘गौरा’ हा शंकराचा मानवाकार प्रतिमा प्रकार. ते शिव-पूजनाचे दुसरे प्रतीक होय. लिंगपूजा अधिक प्रमाणात प्रचलित असली तरी शिवाच्या प्रतिमापूजनाची सुरूवातही सिंधू संस्कृतीपासून होत असल्याचे संदर्भ आढळतात. सिंधूच्या खोऱ्यातून मिळालेल्या एका ठशावर ‘पशुपती’ शिवाचे अंकन असल्याचे मत इतिहासतज्ज्ञ सर जॉन मार्शल यांनी मांडले आहे. शिवाचे एक रूप मानला जाणारा रुद्र ऋग्वेद, अथर्ववेद यांतही दिसतो. रूद्र म्हणजे शत्रूंना रडवणारा. शिवाचे वेदांमधील उल्लेख गिरीष अर्थात पर्वतांचा अधिपती, निळ्या गळ्याचा म्हणून नीलग्रीव, लाल रंगाचा म्हणून विलोहित असे रंगीबेरंगी आहेत. त्याचबरोबर तो नक्तंतर म्हणजे निशाचर असून धनुष्यबाण धारण करणारा म्हणून ‘निषंगी’ व ‘इषुधिमान’ आहे. शिवाला अभिषेक घालताना ज्या रुद्राध्यायाचे पारायण करतात त्यानुसार शिव हा शत्रूच्या डोळ्यांत पाणी आणणारा व संहारक असा पराक्रमी योद्धा आहे. त्याबरोबर तो ‘प्रथमो दैवो भिषक्’ म्हणजे देवांचा प्रथम वैद्य आहे. पौराणिक काळापर्यंत असुर, भूत-पिशाच्च यांना जवळचा वाटणारा रुद्र ‘महादेव’ या उपाधीपर्यंत पोचला. शंकराचा धर्मात पूर्ण रूपाने समावेश केव्हा झाला असावा हे सांगता येणे कठीण आहे.

_mahadevपण ते समायोजन समजून घेण्यासाठी रुद्र आणि नरनारायण ही कथा उपयोगी ठरते. त्या कथेप्रमाणे रूद्राने दक्षयज्ञांचा विध्वंस केल्यावर बद्रिकाश्रमात बसलेले नर व नारायण यांच्यावर आक्रमण केले. युद्धाला चांगले तोंड लागले, पण ते ब्रह्मदेवाच्या मध्यस्थीमुळे थांबले व दोन्ही पक्षांत समेट झाला. नारायणाने रुद्राचा गळा त्या युद्धात दाबल्याने रूद्राला ‘शितीकंठ’ असे नाव मिळाले, तर नारायणाने रूद्राच्या शूलाला ‘श्रीवत्स’ या चिन्हाच्या रुपाने स्वत:च्या छातीवर मिरवण्याचे कबूल केले. त्या कथांमधून शिवाचे पुराणांमधील ‘महाविलयन’ समजून घेता येते. लिंग, मातीच्या ठशांवरील शिवप्रतीके, नाण्यांवरील शिवप्रतिमा यांआधारे शिवस्वरूपाचे विवेचन करता येते. परंतु शंकराची प्रत्यक्ष मूर्ती कधीपासून अस्तित्वात आली असावी?

शिवमूर्तीची प्राचीनता अर्थशास्त्र आणि पतंजली यांच्या आधाराने मौर्यकाळापर्यंत नेता येते. अश्वत्थाम्याने शिवाचा ‘श्वेतविग्रह’ निर्माण केला होता आणि त्याची पूजा होमहवनाने केली असल्याचा उल्लेख महाभारतात आहे. लोककलेचे सोपे, उत्तम व स्वस्त माध्यम म्हणजे माती. शिवाच्या ज्ञात रूपाचे वर्णन करणाऱ्या मातीच्या मूर्ती उत्तर कुषाण व गुप्त या काळात आढळतात. जटाजूट असलेला, गळ्यात व हातात सापाचे दागिने घालणारा शंकर माती व पाषाण यांच्या मूर्तींमध्ये साकारला जाऊ लागला. शिवाचा वैशिष्ट्यपूर्ण असा तिसरा नेत्र हा कुषाण काळापर्यंत आडवा होता. तो गुप्त काळापासून उभा कोरला जाऊ लागला. सातव्या शतकापासून शिवाच्या जटा मुकूटाप्रमाणे दाखवण्यात येऊ लागल्या. मूर्तीमध्ये प्रमुख आयुधे त्रिशूल, सर्प, खट्वांग, डमरू व घट ही आढळतात. दैवतांना विविध रूपे कलाकारांच्या कल्पनेप्रमाणे लाभतात. शिवाची तशीच अनेक रूपे पाहण्यास मिळतात. त्या रूपांच्या प्रेमाखातर आणि महादेवावरील श्रद्धेपोटी गौरा उत्सवापुरते मर्यादित असणारे शिवाचे मूर्तिरूप खोपटे ग्रामस्थांनी कायमस्वरूपी त्याच्या मंदिरात स्थापन केले आहे. विश्वाचे ऊर्जा केंद्र अशी मान्यता असणाऱ्या शिवाचे ते केंद्र संपूर्ण खोपटे परिसराला त्या उत्सवाच्या निमित्ताने ऊर्जा पुरवते.

- तुषार म्हात्रे 9820344394
tusharmhatre1@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.