शिवडीचा भट्टीवडा


_shivdicha_bhattiwadaवडापावचा जन्म मुंबईत दादरमध्ये 1966 साली झाला. त्याला कै. अशोक वैद्य यांनी जन्माला घातले अशी माहिती वाचनात येते. दादरच्या छबिलदास शाळेसमोरचा 'श्रीकृष्ण वडा' दादरच्याच कीर्ती कॉलेजजवळचा अशोक वडापाव, पार्ल्याचा दिनानाथ नाट्यगृहासमोरचा वडापाव, भांडूपचा भाऊ वडापाव, ठाण्याचा कुंजविहार आणि  गजानन वडापाव, गिरगावचा बोरकर वडापाव, फोर्टचा आराम वडापाव, कल्याणचा खिडकी आणि अंबर वडापाव हे विशेष प्रसिद्धीस पावलेले आहेत. 

शिवडी कोळीवाडा येथील वडापाव तसाच चोखंदळ खाणाऱ्यांच्या तोंडी असतो. विठ्ठल शिंदे हे पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील इंदापूर गावचे रहिवासी. ते मुंबईतील शिवडी येथे 1950 साली स्थायिक झाले. जवळच शिवडीची खाडी आणि खाडीजवळच्या पट्ट्यात शिवडी कोळीवाडा आहे. विठ्ठल शिंदे कोळीवाड्यात मासेविक्रीसाठी बसलेल्या कोळी लोकांना चहा आणि वडा पुरवण्याचे काम करत असत. सुरुवातीला, त्यांचा तो व्यवसाय फिरस्तीचा होता. पण मग जवळच एक जागा घेऊन विठ्ठलरावांनी शिवडी कोळीवाड्यातच कायम व्यवसायाचा श्रीगणेशा 1955 साली केला. सुरुवातीला, त्यांच्या वड्याची किंमत पंधरा पैसे इतकी होती. तेव्हा वड्याबरोबर पाव हा सहज खाल्ला जात नव्हता. 

विठ्ठलराव निर्वतल्यानंतर त्यांची तीन मुले तुकाराम, दत्तात्रय व भरत यांनी तो व्यवसाय पुढे आजतागायत अविरतपणे सुरू ठेवला आहे. त्याला पासष्ट वर्षे झाली. त्यांची तिसरी पिढी, कुणाल शिंदे त्या व्यवसायात कार्यरत आहे. 

हे ही लेख वाचा -
कल्याणचा वझे यांचा ‘खिडकीवडा’!
विभावरी बिडवे यांचे खाद्यकॅलेंडर

शिंदे यांच्या वडापावची जाडी कमी असते पण ते वडापावच्या सोबतीने पावात चण्याच्या, डाळीचा, खरपूस तळलेला डाळवडा देतात. त्यासोबत बेसनाच्या पिठात तळलेली हिरवी मिरची आणि कमी तिखटाची मिरची मध्ये कापून त्यात मिठाचे सारण भरून वर पुन्हा बेसनाचे पीठ लावून असे दोनदा खरपूस तळून देतात. पिठात सोडा टाकला जातो पण वडा तेलकट होणार नाही याची काळजी घेतली जाते. खोबऱ्याची हिरवी चटणी आणि शेंगदाण्याची चटणी पावाला लावून तो गरमागरम, खुसखुशीत केला जातो. तो वडापाव चौदा रुपयांना मिळतो. 

लाकडाची भट्टी करून, त्यावर मोठ्या कढईमध्ये वडे तळून काढले जातात. त्या भट्टीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात इंधन म्हणून वापरण्यात आलेले लाकूड निकामी असते. शिंदे फर्निचरच्या दुकानातून जास्तीचे उरलेले, नको असलेले लाकूड विकत घेतात. तसेच त्यांच्याकडे महापालिकेची फायर परमिशन आणि फूड लायसन्सही आहे. भट्टीवरील वडे म्हणून त्यास भट्टी वडापाव या नावाने ओळखले जाते. दुकानाचे नाव विठ्ठल वडापाव सेंटर. तुकाराम शिंदे यांनी सांगितले, की त्यांचा हा वडापाव फक्त थेट दुबईपर्यंत जाऊन पोचला आहे. 

पत्ता - शिवडी कोळीवाडा चाळ नं. ४६, सरदार वल्लभभाई पटेल रोड, एमपीटी, शिवडी (पूर्व), मुंबई
तुकाराम शिंदे - 9867807769

-चंदन विचारे 98336 64811
Chandan.vichare@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.