वसई चर्चमधील घंटा हिंदू मंदिरांत! (Bells From Vasai church in Hindu Temples)

Think Maharashtra 25/10/2019

चिमाजी अप्पांनी वसई परिसरातील किल्ले पोर्तुगीजांकडून जिंकून घेतल्यानंतर तेथील वेगवेगळ्या चर्चमधून ज्या घंटा मिळाल्या त्या महाराष्ट्रातील विविध मंदिरांत नेऊन बसवण्यात आल्या आहेत. फादर कोरिया यांनी केलेले ते संशोधन मोठे रसपूर्ण आहे...

चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सेनेने चौलपासून डहाणूपर्यंतच्या त्या पोर्तुगीज किल्ल्यांवर हल्ले सुरू केले. तो रणसंग्राम दोन वर्षें चालू होता. तेथील किल्ल्यात आणि किल्ल्याबाहेर असलेल्या चर्चेसचा विध्वंस त्या लढाईत फार मोठ्या प्रमाणावर झाला. त्या चर्चेसमधील येशू, मारिया आणि अन्य संत यांच्या मूर्ती भग्न पावल्या; मात्र चर्चच्या मनोऱ्यावर असलेल्या घंटा चांगल्या स्थितीत राहिल्या. मराठा सैनिकांनी किल्ले जिंकल्यानंतर चर्चच्या मनोऱ्यावर असलेल्या घंटा काढून घेतल्या. पोर्तुगीज सैनिकांनी शरणागती पत्करताना वसई किल्ल्यातील सात चर्चेसच्या मनोऱ्यांवर असलेल्या घंटा काढून घेतल्या. मराठ्यांनी किल्ले जिंकल्यानंतर त्या त्या किल्ल्यातील शस्त्रास्त्रे, दारूगोळा व पोर्तुगिजांची संपत्ती हे सारे मराठी सत्तेचा भाग झाला. परंतु त्या भागातील चर्चेसमधील प्रचंड घंटांचे काय झाले हा अनेक वर्षें कुतूहलाचा विषय होता.

चिमाजी आप्पांनी त्या घंटा रणसंग्रामात विशेष मर्दुमकी गाजवलेल्या सरदारांना भेट म्हणून दिल्या. त्यांनी त्या नेऊन त्यांच्या त्यांच्या विभागातील मंदिरांत त्या बसवल्या. काही घंटा वितळवून त्यांच्यापासून तोफा _father_koria_church_bellतयार करण्यात आल्या. फादर फ्रान्सिस कोरिया यांनी ते संशोधन केले. त्यांनी त्यासाठी त्यांच्या मित्रांबरोबर 1995 पासून महाराष्ट्रभर भ्रमंती केली. त्यांना असे आढळून आले, की महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांतील नारोशंकर, तुळजापूर, भीमाशंकर, जेजुरी, मेणवली, येऊर, खंडोबा, ज्योतिबा, श्रीवर्धन, हर्णे-मुरुड, मेसलिंग, अंबादेवी अशा तीस तीर्थक्षेत्रांत वसई परगण्यातील पोर्तुगीज चर्चेसमधील चौतीस घंटा विराजमान झालेल्या आहेत. त्यांपैकी सर्वात मोठी घंटा जालना येथील राजूर तीर्थक्षेत्रात आहे. तिची उंची त्रेचाळीस इंच असून व्यास अडतीस इंच आहे. दुसरी घंटा नाशिक येथील नारोशंकर (रामेश्वर) मंदिरात असून तिची उंची साडेबेचाळीस इंच तर घेरा अडतीस इंच आहे.

पोर्तुगीजांची सत्ता वसई परिसरात 1516 पासून 1739 पर्यंत होती. ती रायगड जिल्ह्यातील चौलपासून पालघर जिल्ह्यातील डहाणूपर्यंत पसरली होती. पोर्तुगीजांनी वसईत त्याच सुमारे सव्वादोनशे वर्षांच्या काळात व्यापार केला आणि स्थानिक जनतेमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसार केला. अनेक पोर्तुगीज लोक त्या परिसरात स्थायिक झाले. त्यांच्या आध्यात्मिक गरजांसाठी; तसेच, तेथे ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिलेल्या नवख्रिश्चनांच्या धार्मिक गरजांसाठी, पोर्तुगीजांनी चौलपासून डहाणूपर्यंत किल्ल्यात आणि किल्ल्याबाहेर सत्त्याहत्तर चर्चेस बांधली. पोर्तुगीजांचे लहानमोठे सुमारे दहा किल्ले त्या भागात होते. वसई किल्ला हा त्या सर्व किल्ल्यांत मोठा आणि मजबूत किल्ला होता. त्या किल्ल्यामधून त्या परिसरातील पोर्तुगीज सत्तेचे नियंत्रण गव्हर्नर करत असे. तो काळ 28 मार्च 1537 पासून 23 मे 1739 पर्यंतचा. त्यांनी अर्नाळा किल्ला 28 मार्च 1536 रोजी जिंकला. पोर्तुगीजांची वसई परगण्यातील सत्ता त्यांनी वसई किल्ल्यात शरणागती 12 मे 1739 रोजी पत्करल्यानंतर संपुष्टात आली.

त्या सर्व घंटांची निर्मिती भिन्न धातूंपासून विदेशात झालेली आहे. काही घंटा वजनी इतक्या आहेत, की त्या हत्तीच्या पाठीवर ठेवून-वाहून नेण्यात आल्या. त्यांपैकी अनेक घंटांवर तत्कालीन पोर्तुगीज धार्मिक प्रथेप्रमाणे आयएचएस, येशूचे दया, पवित्र कूस, बाल येशूसह मारिया अशी ख्रिस्ती धार्मिक चिन्हे, ख्रिस्ती वचने, निर्मितिवर्ष असा मजकूर कोरलेला असल्याचे फादर फ्रान्सिस कोरिया आणि त्यांचे संशोधक पथक यांना आढळून आले. काही घंटा टांगण्याच्या व त्या कशा वाजवण्याच्या हे मंत्र-तंत्र ज्ञात नसल्यामुळे; तसेच, त्या वाजवण्याचा सराव नसल्यामुळे काहींना कालांतराने तडा गेला आहे.

हिंदू मंदिरांमधील घंटा वाजवली जाते ती प्रामुख्याने भक्ताने मंदिरात प्रवेश केल्यानंतर देवाला जागे करण्यासाठी, तर ख्रिस्ती चर्चमधील घंटा प्रामुख्याने वाजवली जाते ती ख्रिस्ती भाविकांना चर्चमध्ये येण्याचे आवाहन करण्यासाठी. पुस्तकातील पहिल्या प्रकरणामध्ये दोन मंदिरांतील परंपरांची माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या प्रकरणात चर्चघंटांची वैशिष्ट्ये सांगण्यात आली आहेत. तिसऱ्या प्रकरणात चर्चमधील घंटांची ऐतिहासिक माहिती देऊन, त्या हिंदू मंदिरांत कशा रीतीने नेण्यात आल्या त्याचा मनोरंजक तपशील देण्यात आला आहे. ख्रिस्त धर्मपरंपरेत ख्रिस्ती मंदिरातील घंटांना फार महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचा पारंपरिक इतिहास _ghanta_church_koriaचौथ्या प्रकरणात देण्यात आला आहे. वसईच्या रणसंग्रामाची माहिती पाचव्या प्रकरणात देण्यात आली आहे. त्यामध्ये चौलवा किल्ला, कोलईवा किल्ला यांचाही परिचय करून देण्यात आला आहे. सहाव्या प्रकरणात महाराष्ट्रातील घंटांचे जिल्हानिहाय अस्तित्व देण्यात आले आहे.

लेखकाने उपसंहारात सार्थपणे पुढीलप्रमाणे नोंद केली आहे. “चिमाजी अप्पाने वसईवर जेव्हा स्वारी केली तेव्हा, साहजिकच, त्याच्या सैन्याधिकाऱ्यांचे लक्ष त्या घंटांच्या आवाजाने ओढून घेतले. त्यांनी अप्पांकडे त्या घंटा सन्मानाने प्रदान करण्याविषयी आग्रहाची विनंती विजयानंतर केली. चर्चमधील घंटा हिंदू मंदिरांत गेल्यामुळे दोन धर्मांत जणू एक प्रकारचा भावनिक पूल बांधला गेला आहे!

फादर कोरिया यांच्या त्या शोधमोहिमेत त्यांना बाबतीस डाबरे, पॉल समाव, शरद विचारे, बेरिना जिसील्या, जोसेफ परेरा, अगस्टीन तुस्कानो, एफे जिन तुस्कानो यांचे सहकार्य लाभले. त्यांनी या विषयावर यापूर्वी पुस्तक लिहिले आहे. लेखक महेश तेंडुलकर यांचेही सहकार्य लाभले. तेही ऐतिहासिक महत्त्वाचे लेखन करतात. पु.द. कोडोलीकर यांची प्रस्तावना पुस्तकास आहे.

पुस्तकातील महाराष्ट्राच्या नऊ जिल्ह्यांतील तीस तीर्थक्षेत्रांतील हिंदू मंदिरांची, तेथे टांगून ठेवलेल्या चर्चमधील घंटांची छायाचित्रे देण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे आठ पानी आर्टपेपरवर वसई किल्ल्यांसह काही महत्त्वाच्या किल्ल्यांमधील चर्चघंटांचे मनोरे, किल्ले, मंदिरे यांची रंगीत छायाचित्रे देण्यात आली आहेत. 

फादर फ्रान्सिस कोरिया - 9325631274
franciscorrea40@gmail.com  
(पुस्तकावरून संकलित)

नवयुगाच्या प्रेषिता 
सप्तर्षी प्रकाशन 
पृष्ठे-१६३. 
किंमत रुपये २०० 
पुस्तक मिळण्याचे ठिकाण जीवन दर्शन केंद्र, गिरीज, वसई

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.