छंदमय जीवन जगणारे शिक्षक - शंकर माने


_chandamay_shikshak_shankar_maneशंकर गुलाबराव माने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील पाटण गावचे रहिवासी. त्यांनी त्यांच्या विविध छंदांतून एक वेगळा आदर्श उभा केला आहे. ते सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील भातगाव या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांनी पुठ्ठ्यापासून वेगवेगळ्या प्रतिकृती बनवून त्यांच्या छांदिष्ट जीवनास सुरुवात केली. त्यांनी पुठ्ठयामध्ये अनेक प्रकारची घरे, मंदिरांच्या प्रतिकृती बनवल्या. पुठ्ठयापेक्षा बांबूपासून अधिक मजबूत वस्तू तयार होतील, म्हणून तो प्रयोग त्यांनी करून पाहिला. त्यांनी आतापर्यंत बांबूपासून गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल, शिडाची जहाजे, वाहनांचे मॉडेल्स, मंदिरे, होड्या; त्याचबरोबर वॉलपीस, ग्रिटिंग कार्ड, फुलदाणी इत्यादी कलाकृती बनवल्या आहेत. त्यांनी बालवयात जडलेल्या चित्रकला व काष्ठशिल्प कलेच्या छंदातून अनेक कृती घडवल्या. त्यातून नवनवीन छंद तयार होत गेले. विद्यार्थी नवीन इयत्तेत गेल्यानंतर जुन्या वर्षीचे पाठ्यपुस्तक निरुपयोगी ठरवून ते रद्दीत घालतो, पण शंकर माने यांनी त्याच निरुपयोगी ठरवून, फेकल्या जाणाऱ्या पुस्तकाचे अनमोल अशा ठेव्यात रूपांतर केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लहानपणापासून इतिहास क्रमिक पाठ्यपुस्तकात शिकण्यास असतो. माने यांनी त्यांच्या कल्पकतेने जुन्या पुस्तकांतील सर्व चित्रांची कात्रणे काढून शिवचरित्र त्रिमितीत साकारले आहे. ते सांगतात, की त्यांना चिपळूण जवळच्या डेरवण येथे असलेल्या शिवसृष्टीपासून प्रेरणा मिळाली. त्यांनी बनवलेल्या त्रिमितीय एकेक पान उलटताना, शिवचरित्रामधील सर्व प्रसंग प्रेक्षकाच्या डोळ्यांसमोर उभे राहतात. त्यात अश्वारूढ शिवछत्रपती, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, शिवकालीन संत, शिवनेरी किल्ला, शिवरायांचे बालपण, सवंगड्यांसोबत शिवराय, शिवरायांचे शिक्षण, स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा, अफझलखानाशी भेट, बाजीप्रभूंचा पराक्रम, शायिस्तेखानावर हल्ला, मुरारबाजीचा पराक्रम, मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी भेट, औरंगजेब बादशाहचा दरबार, मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटका, तानाजीची प्रतिज्ञा, तानाजी कोंढाणा सर करताना, राज्याभिषेक सोहळा, गोवळकोंड्याची ऐतिहासिक भेट, शिवराय-व्यंकोजीराजे भेट, शिवराय-कुतुबशाह भेट, नेताजी पालकर स्वधर्मात, पोवाडा गाताना शाहीर मंडळी अशी अनेकानेक दृश्ये आहेत; तसेच, विविध शिवकालीन किल्ल्यांची सचित्र माहिती पाहण्यास मिळते. 

_shankar_maneमाने यांच्या कलेचा सन्मान नवी मुंबई येथील ‘पारस काव्य कला जनजागृती संस्थे’मार्फत २०१७ चा राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार देऊन करण्यात आला आहे. त्यांची गुहागर येथील तालुकास्तरीय शिक्षण मेळाव्यातही दखल घेण्यात आली. त्यांना रत्नागिरीतील थिबा पॅलेसमध्ये ‘शिक्षणाची वारी’ या कार्यक्रमात स्टॉल लावण्यास आमंत्रित केले गेले होते.

त्यांनी त्यांचा छंद शिक्षकी पेशात तसाच चालू ठेवला आहे. त्यांनी लहानपणी जडलेला छंद जपून ठेवताना वस्तूतील बारकावे, रेखीव काम यांना महत्त्व देऊन त्या प्रतिकृती जिवंत बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी छंदाचे रुपांतर नंतर, नारळाच्या करवंटीपासून विविध कलाकृती बनवण्यासाठी केले आहे. ते नारळाच्या करवंटीपासून विविध वस्तू बनवतात. टाकाऊ गोष्टींचा योग्य वापर होतो आणि निसगार्चे ऋणही फेडले जाते. त्यांनी विविध पक्षी, फुलदाणी, शोभेच्या वस्तू बनवलेल्या आहेत. त्यांनी विविध शाळांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी सामाजिक संदेश देणारी अनेक मॉडेल्स बनवली आहेत. त्यांनी ठिकठिकाणी प्रदर्शने भरवली आहेत.

हे ही लेख वाचा -
करवंटीपासून कलाकृती - सुनील मोरे यांचे कसब
डॉ. प्रेमेन्द्र बोथरा - जंगल वसवणारा अवलिया
छंदवेडा कलासक्त उदय रोगे

 

त्यांच्या बालपणी महागडे खेळणे घेण्याची घरची परिस्थिती नव्हती. ते निसर्गातून जे जे उपलब्ध होईल त्यातून खेळणे निर्माण करून खेळत. तो तेव्हापासून त्यांचा छंदच बनला. ते मातीपासून, बांबूपासून, करवंटीपासून, पुठ्ठयापासून खेळणी बनवत. त्यावेळी आई- वडील आणि चार भावंडे असा त्यांचा परिवार होता. वडिलांवर आर्थिक भार असायचा. त्यांच्या कामात सर्व भावंडांचा हातभार होता. पण शंकर माने यांचा कल कलेकडे होता. जगापेक्षा वेगळे असे काम करत असल्याने त्यांच्याकडे सर्वजण कुतूहलाने पाहत. पण काही जण वेड्यागत काय तरी करत आहे म्हणून हिणावत. पण त्यांनी त्याच कलेच्या जोरावर कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या वडीलांना मुलाचा अभिमान, वाटे. ते म्हणत, पोरगं कधी उपाशी मरणार नाही. माने यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने भावंडांकडूनही शाबासकीची थाप मिळवली. 

ते निसर्गसौंदर्यातून प्रेरणा घेऊन कार्य करत राहिले. त्यांना कल्पतरू खुणावत होता. त्याच्या प्रत्येक भागापासून काही तरी आविष्कार घडत असतो. मात्र त्यावेळी त्यांना करवंट्या पडलेल्या दिसत होत्या. माने यांनी त्यातून नावीन्य शोधण्याचा प्रयत्न केला आणि एकेक नवनवीन कलाकृती साकार होत गेल्या.

_shankar_mane_kalakrutiते ती कला विद्यार्थ्याना शिकवत आहेत. त्यामुळे विद्द्यार्थ्याच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळू लागली आहे. विद्यार्थी कौशल्याधिष्ठित शिक्षणामुळे शाळेत रमू लागले आहेत. ‘पुनर्वापर नैसर्गिक साधनसंपत्तीचा, मंत्र पर्यावरण रक्षणाचा’ या उक्तीप्रमाणे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करण्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजू लागली आहे. विद्यार्थी कलाकुसरीच्या निर्मितीतून अर्थार्जन करून स्वावलंबी बनू लागले आहेत. 

शंकर माने 9850729414
shankarmane1073@gmail.com

- कृष्णात दा जाधव 
krushnatjadhav3518@gmail.com

लेखी अभिप्राय

Very nice Sir.

Dhanaji Mane 23/10/2019

अप्रतिम

वर्षा साळुंके25/10/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.