फड मंडळींचे महाजनपूर (Mahajanpur)


_fad_nasik_niphadमहाजनपूर नावाचे गाव नासिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात येते. सध्या महाजनपूर, भेंडाळी अन् औरंगपूर ही तीन गावे म्हणजे नकाशावरील एक त्रिकोण आहे. त्या तिन्ही गावांचे नाव 1650 ते 1700च्या दरम्यान एकच होते, ते म्हणजे महाजनपूर! इतिहासाच्या पाऊलखुणा ती तिन्ही गावे भटकताना सापडतात.

महाजन म्हणजे बाजारपेठेतील व्यापार, व्यवहारातील वजने-मापे, मालाची देवघेव इत्यादींवर देखरेख ठेवणारा आणि व्यापारी कर वसूल करणारा अधिकारी. म्हणजेच असा कोणी अधिकारी महाजनपुरात राहत होता का? ते कळत नाही, परंतु त्या ग्रामनामाची दुसरी कोणती व्युत्पत्ती मात्र लावता येत नाही. ती तीन गावे सायखेडा रस्त्यावर डाव्या हाताला भेंडाळी, उजव्या हाताला महाजनपूर तर भेंडाळीच्या मागील बाजूस औरंगपूर अशी आहेत. भेंडाळी गावात शिरताच, काही अंतर गेल्यावर एक मोठी दगडी भिंत उजव्या हाताला लागते. ती भिंत इतिहासात हरवलेले काही पैलू उलगडण्यास मदत करते. ती भिंत दोन एकरांतील एका भल्यामोठ्या वाड्याची एकमेव उरलेली आहे. गावात औरंगजेब व त्याचे सैन्य 1655 च्या दरम्यान राहिले होते. त्यावेळी औरंगजेबाकडून ती गावे लुटली गेली असावीत अन् औरंगजेबाने त्या गावातील महाजन म्हणजेच मोठा व्यापारी असलेला कोण्या सरदाराची वाताहत केली असावी असा तर्क आहे. त्याच दरम्यान त्यांचा वाडाही उद्ध्वस्त झाला असेल. तो सरदार मराठा असण्याची शक्यता अधिक वाटते. कारण वाड्याच्या आजूबाजूला असलेली मंदिरे व वीरगळ त्या धर्तीचे आहेत. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीतून त्या तर्काला पुष्टीही मिळते. गावात औरंगजेब आला होता व तो जेथे थांबला तेथील महाजनपुरातील भागाला औरंगपूर म्हटले जाऊ लागले असे ग्रामस्थ सांगतात.

वाड्याच्या भिंतीमागे दगडाची लहानमोठी मंदिरे आहेत. तेथील वीरगळ पाहिल्यानंतर, पुन्हा भेंडाळीकडे तोंड करून उभे राहिल्यावर, डाव्या हाताला एक रस्ता शेताकडे घेऊन जातो. गावात जाण्यापूर्वी तेथे जाणे सोयीस्कर. दोन किलोमीटर गेल्यावर, तेथे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली लाल वीटांची बारव आहे. ती दुमजली आहे. बारव वापरात नाही, तिची अवस्था वाईट आहे. भेंडाळी गावात जुन्या-नव्या घरांचा संगम दिसतो. ग्रामस्थांना भेंडाळी हे नाव कसे पडले ते माहीत नाही, तरी ते महाजनपूर हे आमचे मूळ गाव असे आवर्जून सांगतात. भेंडाळीत राम व हनुमान मंदिरे जुन्या लाकडी व मातीच्या बांधणीतील आहेत. तेथून औरंगपूरकडे जाण्यापूर्वी एक ओढा लागतो. तो ओढा गोदावरीला जाऊन मिळतो. ओढ्याच्या अलिकडे आणखी एक बारव आहे. त्या बारवेवर शिलालेख आहे. शिलालेखावर महाजनपूर असा उल्लेख आहे. शिलालेखाची अवस्था अत्यंत वाईट आहे. बऱ्याच ओळींचा अर्थ लावता येत नाही. मात्र तो शिलालेख भेंडाळी, महाजनपूर व औरंगपूर एकत्र असल्याचा पुरावा आहे. ग्रामस्थ तशीच बारव जवळच्या सोनगावातही असल्याचे सांगतात. नासिकमध्ये अन्यत्र असलेल्या बारवांवर शिलालेख नाहीत, भेंडाळीतील बारवेवर शिलालेख असणे हेही त्या गावच्या ऐतिहासिक वैभवावर व श्रीमंतीवर प्रकाश टाकते.

औरंगपूरमधील अडीचशे-तीनशे वर्षांपूर्वीची मशीद ओढा ओलांडताना समोर दिसते. तेथून थोडे पुढे, पूर्वी दगडी असलेल्या महादेव मंदिराचा जीर्णोद्धार नुकताच केला गेलेला आहे. जुन्या दगडी मंदिराचे अवशेष आजूबाजूला विखुरलेले दिसतात. तेथून पुढे शंभर उंबऱ्यांचे औरंगपूर गाव व एक खंडोबा मंदिर आहे. महाजनपूर हे रस्त्याच्या पलीकडे वसलेले गाव आहे. ते गाव औरंगजेबाच्या धास्तीने ग्रामस्थ मूळच्या महाजनपूरातून बाहेर जाऊन त्यांच्याकडून वसवले गेले असावे. महाजनपूर या गावास सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. अभियांत्रिकी, पोलि स आणि ‘आर्मी’ या तीन क्षेत्रांत करिअर करण्यासाठी गावातील तरुण आग्रही दिसतात. महाजनपूरची लोकसंख्या एक हजार सहाशे आहे.

fad_akhanda_harinamलोक गावच्या चव्हाटा-पारावर सर्व तंटे गावातच मिटवत. महात्मा गांधी तंटामुक्ती सदस्य पंडितकाका, मधुकर कुटे, पोलिस पाटील, सरपंच यांची ती कामगिरी. गावात पंडित महाराज फड यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला, तो वारसा मनोहर महाराज दराडे हे पुढे चालवत आहेत. गावात माउली भजनी मंडळ आहे. त्याचा विशेष म्हणजे त्यात सर्व भजनी मंडळी तरुण आहेत. तरुण मंडळींना मार्गदर्शन करण्याचे काम वाल्मिकी फड, नामदेव शिंदे, ज्ञानेश्वर लवांडे, राजू फड यांसारखे लोक करतात. गावातील भीमाकाका आव्हाड हे सर्वांना सोबत घेऊन गावातील कामे करतात. गणपत (रामा) फड यांनी गावात सर्वाधिक झाडे लावली आहेत. त्यांनी त्यासोबत त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही घेतली आहे. त्यांनी भैरवनाथ मंदिरासमोर सुंदर बगीचा तयार केला आहे. त्यांचे स्वप्न आहे, की गावात सगळीकडे हिरवळ असावी. पर्यावरणपूरक महाजनपूर अशी गावाची ओळख निर्माण व्हावी ही रामभाऊंची इच्छा आहे. 

गावात विठ्ठ्लरूक्मिणी, खंडोबा, महादेव, भैरवनाथ, दत्त, बजरंगबली, मंजिरबाबा मंदिर (मातंग समाजाचे), येसळबाबा अशी मंदिरे आहेत. खंडोबा महाराज हे ग्रामदैवत आहे. गावात रामनवमी व हनुमानजयंती हे उत्सव गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. यात्रेत जागरण, गोंधळ, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजले जातात. गावात कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असले, की गावातील सर्व लोक एकत्रित येतात. लोकवर्गणीतून यात्रेचे आयोजन केले जाते. गावातील अनेक लोक मुंबई-नासिक यांसारख्या ठिकाणी कामाला आहेत. ते सर्व लोक व गावातील सैनिक दसरा-दिवाळीला आणि खंडोबा महाराज यात्रेला सुट्टी काढून गावात हजर होतात.

हा ही लेख वाचा - महाजनपूर सैनिकांचे गाव

यात्रेत बारा बैलगाड्या एकाला एक बांधून एकट्याने ओढल्या जातात. बारा गाड्या ओढण्याचा मान दिनकर फड (भगत बाबा) यांच्याकडे आहे. त्यात गावातील लोक सहभाग घेतात. गावात यात्रा तीस वर्षांपासून भरते. यात्रोत्सव दोन दिवस असतो. यात्रेआधी क्रिकेटचे सामने भरवले जातात. यात्रेच्या दिवशी फायनल असते. फायनल झाल्यावर सर्वजण यात्रेचा आनंद लुटण्यासाठी खंडोबा मंदिराकडे जातात. गावातील रामभाऊ कोंडाजी फड हे नासिक केंद्रावर वाघ्या मुरळीचे गाणे म्हणण्यास गेले होते. त्यांचीच प्रेरणा घेऊन रघुनाथ फड हे जागरण-गोंधळाचे कार्यक्रम करतात. त्यांची नऊ-दहा माणसांची पार्टी आहे. त्यांचे कार्यक्रम यूट्यूबवर आहेत.

गावात ग्रामपंचायत व सोसायटी आहे. ग्रामपंचायतीत नऊ सदस्य आहेत. आशा फड या गावच्या सरपंच तर योगेश रामराव रहाणे हे ग्रामसेवक आहेत. ते गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध कामे जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्यामार्फत करवून घेतात. गावात किराणा मालाची तीन दुकाने व चायचे टपरीवजा एक हॉटेल आहे. गावात व्यायामशाळा आहे. त्यात तरुणवर्ग येतो. वाळीबा कचरू फड हे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. त्यांचे वय वर्षें चाळीसपेक्षा अधिक आहे. ते व्यायामशाळेत नियमित येतात व मार्गदर्शन करतात. गावातील तरुणांनी सरपंचांच्या मागे लागून मैदान तयार करून घेतले आहे. त्यासाठी गावातील पंचवीस ते तीस मुले दोन महिने काम करत होती. उंच उडी, गोळाफेक, सोळाशे मीटरचा ट्रॅक आदी व्यवस्था त्या मैदानावर केल्या आहेत. तेथे तरुणांची गर्दी असते. जे सैनिक सुट्टीसाठी _fad_mandaliगावी आलेले असतात तेही सकाळी तेथे पोचून तरुणांना मार्गदर्शन करतात.

गावात वंजारी ‘फड’ लोक पंचाहत्तर टक्के आहेत. वीस टक्के मराठा ‘शिंदे’ आणि बाकी पाच टक्के अन्य जातींचे रहिवासी आहेत. ते सारे एकोप्याने राहतात.

भेंडाळी येथे सोमवारी आठवडी बाजार भरतो. गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. भेंडाळी येथे माध्यमिक शाळा दहावीपर्यंत आहे. पुढील शिक्षणासाठी सायखेडा गावी जावे लागते. गावातील लोकांचा व्यवसाय मुख्यत्वे शेती आहे. तेथील लोक शेतीपूरक व्यवसाय करतात. गावात दोन गुऱ्हाळगृहे आहेत. नांदूर मधमेश्वर हे धरण गावापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे.

(अधिक माहिती – अविनाश फड 9527973678 रघुनाथ फड – 9822272847)

- रमेश पडवळ 8380098107 rameshpadwal@gmail.com
(मूळ स्रोत - ‘दैनिक महाराष्ट्र टाइम्स’ संपादित-संस्कारित)
लेखाचा विस्तार - थिंक महाराष्ट्र टीम

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.