व्हीकेराजवाडे.कॉम (vkrajwade.com)


_v.k._rajwadeइतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी जमवलेल्या सुमारे एक लाख दुर्मीळ कागदपत्रांचा ठेवा http://vkrajwade.com  ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला गेला आहे. राजवाडे संशोधनमंडळ (धुळे), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) व नेहरू सेंटर (मुंबई) ह्यांची ती संयुक्त कामगिरी आहे. संकेतस्थळावर विभाग विविध आहेत. त्यांपैकी राजवाडे ह्यांच्याविषयीच्या विभागात वि.का.राजवाडे ह्यांचे संक्षिप्त चरित्र, त्यांच्या चरित्रातील घटनाक्रम, त्यांची छायाचित्रे, त्यांचे हस्ताक्षर; तसेच, प्रबोधनकार के.सी. ठाकरे, श्री.व्यं. केतकर व साने गुरुजी ह्यांचे राजवाड्यांवरील लेख, वि.का. राजवाडे ह्यांचे वडील बंधू वैजनाथशास्त्री राजवाडे ह्यांचे वि.का. राजवाडे यांविषयीचे पत्र ह्यांचा समावेश आहे. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे संशोधन मंडळ ह्या संस्थेविषयीची माहिती; तसेच, तेथील सार्वजनिक ग्रंथालयाविषयीची माहितीही संकेतस्थळावर वाचण्यास मिळते.

ई-बुक्स (e-Books) ह्या विभागात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विविध ई-पुस्तकांची माहिती देण्यात आली आहे. त्या ई-पुस्तकांत मु.ब. शहा संपादित समग्र राजवाडे खंड (1 ते 11), इतिहासाचार्य राजवाडे ह्यांनी संपादलेले ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ ह्या ग्रंथमालेचे खंड (1 ते 11), ‘सोर्सेस ऑफ मराठा हिस्ट्री’चे पाच खंड, ऐतिहासिक लेख-चर्चेचे चार खंड; तसेच, इतर पुस्तके – उदाहरणार्थ भा.वा. भट ह्यांनी लिहिलेले ‘इतिहासाचार्य राजवाडे ह्यांचे चरित्र’, राजवाडेकृत ‘धातुकोश’ व ‘नामादिव्युत्पत्तिकोश’ ह्या महत्त्वाच्या पुस्तकांचा समावेश आहे. ई-पुस्तकांच्या किंमती व नमुन्यादाखल पानेसुद्धा दिलेली आहेत. मात्र पैसे जमा करून पुस्तके उतरवून घेण्याची सोय नाही; त्यासाठी संपर्क साधता यावा म्हणून पत्ता दिला आहे. 

संकेतस्थळावरील सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे संगणकीकृत दुर्मीळ हस्तलिखिते व दस्तऐवज ह्यांचा. तेथे अभिलेखांची/ हस्तलिखितांची दोन प्रकारे वर्गवारी लावून दिली गेली आहे. संकेतस्थळाच्या डाव्या स्तंभात भाषेनुसार फारसी, संस्कृत, मराठी, हिंदी ह्या भाषांमधील व मोडी लिपीमधील अभिलेख/ हस्तलिखिते विभागून दिली आहेत. सर्व कागदपत्रे विषयवार व प्रकारवार विभागली आहेत. भाषेतील विशिष्ट विषय वा प्रकार निवडला, की उजवीकडील स्तंभात त्या विभागातील कागदपत्रांची शीर्षके अकारविल्हे लावलेली दिसतात. 

फारसी भाषेच्या विभागात कऱ्हाड काजी ह्यांची सहासष्ट पत्रे व इतर फारसी-मोडी अशी द्वैलिपिक सामग्री आहे. मोडी विभागात अंकगणित, जमाखर्च, भूमिती, गद्य- मराठी - मोडी (बखर), जंत्री आणि मोडीतील काही पत्रे आहेत. संस्कृत भाषेतील हस्तलिखिते भरपूर आहेत. त्यांत वेद, वेदान्त, कोश, पुराणे आणि माहात्म्ये ह्यांबरोबरच संस्कृत व्याकरणावरील अष्टाध्यायी, लघुकौमुदी, भाष्यप्रदीपोद्योत, भट्टोजी दीक्षितकृत सिद्धान्तकौमुदी. वररुचीकृत प्राकृत मनोरमा वृत्ती इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रतींचा समावेश आहे.  

मराठी विभागात आरत्या, चरित्रे, इतिहास, ज्योतिष, कथापुराणे, काव्य, स्तोत्रे, वेदान्त, याज्ञिकी ग्रंथ इत्यादींचा समावेश आहे. महिकावतीची बखर, ज्ञानेश्वरी, केकावली, ज्ञानेश्वरीचे विविध कोश, अमृतानुभव, पवनविजय, मूलस्तंभ अशा महत्त्वाच्या विविध ग्रंथांची हस्तलिखिते; तसेच, काही मराठी दोलामुद्रिते (1867 पूर्वी छापलेले मराठी ग्रंथ) संगणकीय प्रतिमांच्या रूपांत तेथे पाहण्यास मिळतात.  संकेतस्थळाची मांडणी नेटकी आहे. संकेतस्थळावर ठेवलेल्या सामग्रीचे दुवे मुख्य पानावर दिलेले आहेत. शुद्धलेखनाच्या काही चुका खटकतात. उदाहरणार्थ - ऐतिहासिक, स्वामींचे. संगणकीय प्रतिमांच्या पीडीएफ धारिकांत जी मुद्रा मजकुराच्यामध्ये दिलेली आहे, ती वाचताना काही वेळा अडथळा ठरते. परंतु, एकंदरीत, भरपूर माहितीने परिपूर्ण असे हे संकेतस्थळ आहे.  

- श्रद्धा काळेले kalele.shraddha@gmail.com
(‘भाषा आणि जीवन’वरून उद्धृत संपादित-संस्कारित)

लेखी अभिप्राय

खूप छान माहिती.

रघुनाथ धोंडिबा…29/09/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.