ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari)


-dnyaneshwari‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार लेणे’ असे संबोधतात. ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवदगीतेवर लिहिलेली टीका होय. त्या टीकाग्रंथात सुमारे नऊ हजार ओव्या आहेत. भगवदगीतेतील तत्त्वज्ञान त्यात उपमादृष्टांताच्या आधारे सुलभतेने सांगितले आहे. आध्यात्मिक विषयाचे काव्यमय विवेचन या दृष्टीने तो ग्रंथ लोकोत्तर मानावा लागेल. ज्ञानेश्वरीत काव्य आणि तत्त्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ आहे. भगवदगीतेवर आत्तापर्यंत अनेक टीकाग्रंथ निर्माण झाले. परंतु, त्या सर्व टीकांमध्ये लोकप्रिय आहे ‘ज्ञानेश्वरी’. ज्ञानेश्वरीस तिची रचना, विस्तारित आशय व काव्यात्मता यांमुळे गीतानिरपेक्ष स्वतंत्र अनन्य स्थान लाभले आहे.

ज्ञानेश्वरांचा काळ हा रामदेव यादवाचा काळ म्हणजे बारावे-तेरावे शतक. त्या काळात सर्व वर्णांतील समाज कर्तव्यापासून दूर गेलेला होता. धर्माचा अर्थ यज्ञयाग, व्रतवैकल्ये या पुरता लावला जात होता. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’चे लेखन समाजाला खरा धर्म सांगावा, खरे धर्मज्ञान सांगून समाज कर्तव्यमुख करावा या हेतूने केले. गीतेचा जन्म स्वधर्मापासून व कर्तव्यापासून दूर जाऊ पाहणाऱ्या, खरा धर्म न समजणाऱ्या, योग्यायोग्यतेचा विचार न सुचणाऱ्या संभ्रमित अर्जुनासाठी झाला होता; त्याचप्रकारे, ‘ज्ञानेश्वरी’कालीन समाजातील हजारो अर्जुन त्यांच्या कर्तव्यापासून दूर झालेले होते, त्यांना कर्तव्यसन्मुख करण्यासाठी, खरे ज्ञान सांगण्यासाठी ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’चा प्रपंच केला. म्हणोनि मार्गाधारे वर्तावे । विश्व हे मोहरे लावावे । । अलौकिक नोहावे । लोकांप्रती ।। हे ज्ञानेश्वरीचे प्रयोजन होते. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’त गीतेवर भाष्य केलेल्या पूर्वसुरींबद्दल आदरभाव व्यक्त केला आहे. व्यास, शंकराचार्य, रामानुजाचार्य, यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात, ‘तैसा व्यासांचा मागावा घेतु | भाष्यकारा वाट पुसतु ।।’ त्यातून ज्ञानेश्वरांचा नम्र भाव दिसतो. जेव्हा ज्ञानेश्वरांनी बोलीभाषेतून ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहिला तेव्हा संस्कृत भाषेला ज्ञानभाषेचे व राजभाषेचे स्थान होते. ज्ञानेश्वर ज्ञानभाषेइतकेच लोकभाषेचेही अभिमानी होते. त्यामुळे ‘ज्ञानेश्वरी’त जागोजागी मराठी भाषेविषयी अभिमान व्यक्त होतो. ‘माझा मऱ्हाटीची बोलू कौतुके । परि अमृतातेही पैजा जिंके ।। ऐसी अक्षरे रसिके मेळविन’

ज्ञानेश्वरीत अर्जुन-श्रीकृष्ण, धृतराष्ट्र-संजय, ज्ञानेश्वर-श्रोते, ज्ञानधार निवृत्तीनाथ असे संवाद आले आहेत. श्रोत्यांशी संवाद साधताना त्यांचा लडिवाळपणा, विनम्र भाव व्यक्त होतो. ते श्रोत्यांना माता, पिता, परीस असे संबोधतात तर स्वतःला लेकरू, बालक म्हणवून घेतात. त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या अठरा अध्यायांपैकी तेराव्या अध्यायाच्या प्रारंभी गुरू, देवता यांना वंदन केले आहे. ओंकाररूपी गणपतीस पहिल्या अध्यायात वंदन केल्यानंतर पुढील अध्यायातील नमनाचा रोख निवृत्तिनाथ यांच्यावर आहे. ‘ज्ञानेश्वरी’त मुख्य सिद्धांत अद्वैताचाच आहे. सर्वत्र एकच आत्मतत्त्व भरून राहिले आहे. ‘अहं ब्रह्मास्मि’ मीच ब्रह्म -माझ्याखेरीज दुसरे काहीही वेगळे नाही. आत्मतत्त्व म्हणजे दुसरे काही नसून मीच आहे असा भाव किंवा अवस्था निर्माण होणे म्हणजेच अद्वैतावस्था होय. अशी अवस्था निर्माण झाली असता भक्त-भगवंत, आत्मा-परमात्मा असे द्वैत उरत नाही. ‘ज्ञानेश्वरी’ हे काव्य व तत्त्वज्ञान अशा दोन भिन्न रंगाच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेले वस्त्र आहे. ‘ज्ञानेश्वरी’तील ओवी साडेतीन चरणाची आहे. या ग्रंथात अनेक अलंकार आले आहेत. उपमा, अनुप्रास, दृष्टांत अशा अलंकारांचा मुक्त वापर ‘ज्ञानेश्वरी’त आहे- वारकरी संप्रदायात ‘ज्ञानेश्वरी’चे स्थान अनन्यसाधारण आहे. 

(आधार – समग्र राजवाडे, मराठी वाड्मयाचा इतिहास – स.गं. मालशे, शं.गो. तुळपुळे)

लेखी अभिप्राय

'थिंक महाराष्ट्र'चे सर्वच लेख खूप माहितीपूर्ण आणि मेंदूला खाद्य असते.
9594660146

लीला शाह30/09/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.