रांगोळी – पारंपरिक संस्कृती

Think Maharashtra 03/09/2019

‘रांगोळी’ शब्दाची उत्पत्ती संस्कृत शब्द ‘रंगावली’वरून झाली आहे. तो मूळ शब्द ‘रंग’ आणि ‘आवली’ अर्थात पंक्ती यांच्यापासून बनला आहे; त्याचाच अर्थ रंगांची पंक्ती म्हणजे ओळ, भारत देशाच्या विभिन्न प्रांतांत ह्या लोककलेचे नाव आणि शैली यांमध्ये विविधता आहे. ती नावे कर्नाटकात ‘रंगोली', तमिळनाडूत ‘कोल्लम', पश्चिम बंगालमध्ये ‘अल्पना’, राजस्थानात ‘मांडना’, उत्तरप्रदेशात ‘चौकपूजन’, छत्तीसगडला ‘चौक पूरना’, गुजरातमध्ये 'साथिया' तर महाराष्ट्रात ‘रांगोळी’ अशी आहेत.

-rangoliरांगोळी व्रत किंवा पूजा यांचे शुभकार्याशी नाते आहे. घरात, समारंभात काही चांगली गोष्ट, समारंभ घडत असेल तर रांगोळी हमखास असतेच. ती कला आर्यांच्या युगाच्या आधीपासून आहे असा दावा केला जातो. रांगोळीचे नाव अल्पना हेच मोहन-जो-दाडो आणि हडप्पा या संस्कृतींत सापडते. भारतीय कलेचे बंगाली अभ्यासक आनंद कुमार स्वामी यांनी म्हटले आहे, की रांगोळ्या काढण्याची पद्धत आर्य येण्याच्या आधी मुंडा नावाच्या आदिवासी जमातीत होती. त्यांच्या समजुती रांगोळीच्या जादुई प्रभावाने शेतीचे उप्तन्न अधिक येते आणि प्रेतात्मा पळून जातो अशा होत्या. रांगोळीच्या परंपरागत आरेखनापासून प्रेरणा घेऊन आचार्य अवनींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनमधील कलाभवनात रांगोळीला चित्रकला विषयाबरोबर स्थान दिले आहे. रांगोळी रेखाटने देवी-देवतांच्या प्रतिमा, फुले आणि पाने या मुख्य रूपांत काढली गेली. ती हळूहळू भौमितिक आकारात ठिपक्यांच्या साहाय्याने काढली जाऊ लागली. मग त्यात अनेक प्रकार व्यक्तीच्या कौशल्यानुसार निर्माण झाले. आचार्य वात्स्यायनाच्या कामशास्त्रात ती चौसष्ट कलांतील एक मानली गेली आहे. 

रांगोळीचे स्वरूप प्रेमाने, धार्मिक भावनेने आणि कलादृष्टीने जतन केले गेले आहे. जसे, केरळात ओणम वा इतर सणांमध्ये रांगोळी फुलापानांची काढली जाते. रांगोळी ओणमच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळी काढली जाते. खास म्हणजे त्या रांगोळीचा आकार रोज विस्तृत केला जातो. रांगोळ्यांसाठी अशी फुले आणि पाने वापरली जातात, जी लवकर कोमेजत नाहीत. रांगोळीचा विषय हा विष्णुसंबंधित अधिक असतो. रांगोळी तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांत तांदळाच्या पिठापासून काढली जाते. तिचा आकार त्रिकोण, चौकोन व वर्तुळाकार अधिक असतो. त्यांतील रेषा ह्या किंचित जाड मात्र गोलाकार अधिक असतात. त्यांच्या रांगोळ्या अधिक जटिल असतात. रांगोळ्या घराबाहेर मोठ्या असतात आणि त्या घरातील देव्हाऱ्यासमोर छोट्या असतात. रांगोळ्या तांदळाच्या पिठाने काढण्याचे कारण, म्हणजे लहान कीटकांना त्या रांगोळीतून अन्न मिळावे. रांगोळी चुन्याच्या निवळीनेसुद्धा आंध्रात काही ठिकाणी काढली जाते.

महाराष्ट्रात घरातील देवासमोर शंख, चक्र, गदा, पद्म, चंद्र, सूर्य आणि गोखूर रांगोळीने काढले जातात. दिवाळीत तर रांगोळीचे महत्त्व अधिक असते. रांगोळ्या नव्या युगात नवनवीन कल्पनांनी; तसेच, माध्यमांचा आधार घेऊन काढल्या जातात. संस्कारभारती रांगोळ्या ही नवी घडामोड गेल्या दोन-तीन दशकांतील आहे. त्या ठिपक्यांऐवजी हाताच्या बोटात रांगोळी पावडर घेऊन बोटांच्या फटकाऱ्यांनी सपासप काढल्या जातात. मात्र त्यांतील सौंदर्य कमी होत नाही; उलट, त्यांना वेगळीच आकर्षकता लाभते. मात्र ठिपक्यांच्या रांगोळीची नजाकत त्यांत असत नाही.

-संकलन

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.