'मिया पोएट्री'चे आसामात वादळ!


-heading-mia-poetryI am Miya ; My serial number in NRC
is 200543
I have two children
another is coming next summer
will you hate him?
as you hate me!

ही आहे सध्या ‘मिया पोएट्री’मध्ये गणली जाणारी आणि गाजणारी ‘मिया पोएम’ म्हणजे मिया कविता! आसाममधील बांगलाभाषी मुसलमानांची व्यथा व्यक्त करणारी ही एक कविता. महाराष्ट्रामध्येही दलितांची व्यथा व्यक्त करणारा ‘विद्रोही कविता’ हा काव्यप्रकार जन्माला आलात्याशी ‘मिया पोएट्री’ची तुलना करण्याकडे काही लोकांचा कल आहे -  तोच कवितेचा ‘विद्रोही’ मार्ग आसाममधील बांगलादेशी मुस्लिमांनी ‘मिया पोएट्री’ या नावाने रूढ केला आहे. मात्र त्या कवितांतील आशय आणि त्यांचा उद्देश पाहता, त्यांची तुलना मराठी विद्रोही कवितेशी करणे चुकीचे ठरेल. खरेतर, विद्रोहीपण ही दलित तरुणांमधील ऊर्जा होती, तिला संवेदनेचा, निर्मितीचा बाज होता. विद्रोही कवितांमुळे दलितांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले. परिणामी दलित चळवळ काही प्रमाणात पुढे गेली. उलट, ‘मिया पोएम’ दोन समाजात संघर्षाची ठिणगी पाडण्यास कारणीभूत ठरतील काय अशी भीती वाटते.

त्या काव्यप्रकाराच्या नावातच ‘मिया’ असल्याने त्यामागील आशय आणि उद्देश स्पष्ट आहे. एनआरसीच्या (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स – राष्ट्रीय नागरिकता नोंद) च्या अंतर्गत राष्ट्रीयता निश्चित करण्यासाठी आसामात जी पडताळणी सुरू आहे तिचा त्या समाजास कसा मानसिक त्रास होत आहे असा आशय व्यक्त करणाऱ्या त्या कविता आहेत. दहा कवींनी तो काव्यप्रकार 2016 मध्ये जन्माला घातला. ‘मिया’ म्हणजे खरे आदरार्थी संबोधन. पण तो शब्द आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांसाठी वापरला जातो. तो शब्द वापरून आसामिया समाज त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतो, त्यांचा अपमान-पाणउतारा करतो. घुसखोर म्हणून सरसकट त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते अशा भूमिकेतून विद्रोही कवितांचा सिलसिला सुरू झाला.

कविता सोशल मिडियाच्या माध्यमातून आसाममध्ये सर्वत्र पोचवल्या जातात. घुसखोरांसाठी असलेली शिबिरे म्हणजे जणू काही छळछावण्या अशी मांडणी होते. मुस्लिम बुद्धिजीवी आणि त्यांना पाठिंबा देणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे भारतीय पुरस्कर्ते यांची एक लॉबीच आसाममध्ये त्यामुळे सक्रिय झाली आहे.

त्यामुळेच आसामी आमनागरिकांत खळबळ माजली आहे. “या कविता धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या, समाजात फूट पाडणाऱ्या, लोकांना धार्मिक चिथावणी देणाऱ्या आहेत. सबब त्या कवितांवर बंदी घातली जावी” अशा तक्रारी पोलिसांकडे दाखल करण्यात आल्या आहेत. उलट, त्या कवितांवर बंदी म्हणजे लोकशाही आणि अभिव्यक्ती यांबद्दलच्या स्वातंत्र्याची गळचेपी अशी भूमिका घेऊन सुमारे दोनशे बुद्धिवंत पत्रकार, लेखक, चित्रपट अभिनेते ‘त्या अन्याया’च्या विरुद्ध एकत्र आले आहे. त्यांनी बंदीचा एकमुखी निषेध केला.

कविता वर वर साध्या वाटल्या तरी त्यातील आशय व त्यांचे ‘टायमिंग’ बघता आणि त्यांचा ज्या प्रकारे वापर केला जात आहे ते बघता त्या कवितांच्या आडून एनआरसी प्रक्रियेलाच आव्हान दिले जात आहे अशी एक भूमिका आहे. तुम्ही आम्हाला ‘मिया’ म्हणताना ऽ ऽ ! मग आहोतच आम्ही मिया’ असा आक्रमक जहरी प्रचार त्या कवितांच्या माध्यमातून आसाममधील मुस्लिमांच्यात केला जातो आणि म्हणूनच त्या कवितांच्या विरूद्ध फिर्यादी दाखल झाल्या आहेत. मात्र बंदी घालून सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात तरी काही साध्य होत नाही हे उघडच आहे.

तो अहवाल जाहीर झाला तरी घुसखोर म्हणून शाबित झालेल्यांवर पुढील कारवाई कितपत होईल? बांगलादेश त्या नागरिकांना परत घेण्यास तयार होईल काय? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. पण त्याचा अर्थ असा नव्हे, की नागरिकत्व शाबित करण्यासाठी आम्हाला पुरावे द्यावे लागतात, वारंवार खेटे घालावे लागतात, आम्हाला मानसिक त्रास दिला जातो असे ‘मिया पोएम’च्या माध्यमातून व्यक्त होत आहे. ती तक्रार असू शकते, पण तक्रारीची कविता बनण्यास सैद्धांतिक उंचीवर जावे लागेल.

हा विषय संवेदनशील असल्याने व गेल्या काही महिन्यांत धार्मिक हिंसाचाराचे प्रकार आसाममध्ये घडल्याने, त्यातून काही अनर्थ घडू नये याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे.

- पुरुषोत्तम रानडे 
(ईशान्य वार्ता ऑगस्ट २०१९वरून उद्धत, संस्कारित)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.