प्रताप टिपरे - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची सावली (Pratap Tipre)


-prataptipre-with-babasaheb-purandareबाबासाहेब पुरंदरे यांचे स्वीय सहाय्यक व सचिव यांचे नाव राणाप्रताप असावे हा गमतीदार योगायोग आहे ना! त्यांचे पूर्ण नाव राणाप्रताप प्रभाकर टिपरे ते पुरंदरे प्रेमींमध्ये प्रतापकाका म्हणून ओळखले जातात. त्यांचे प्रथम वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे हस्ताक्षर सुंदर, वळणदार, सुवाच्च आहे. पुरंदरे महाराष्ट्रभूषण शिवशाहीर म्हणून ख्यातनाम आहेत. टिपरे पुरंदरे यांच्याकडे गेली पन्नास वर्षें काम करतात. ते त्याआधी 1960 सालापासून गो नी. दांडेकर यांच्यासोबत काम करत होते.

सुंदर हस्ताक्षरासाठी प्रसिद्ध पहिली व्यक्ती म्हणजे साक्षात बाळाजी आवजी चिटणीस ते इतिहासात साक्षात शिवछत्रपतींचे चिटणीसपद आणि सहवास लाभलेले व्यक्तिमत्त्व होय आणि वर्तमानात टिपरे यांना त्याच कारणासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सचिवपद मिळाले!

बाबासाहेब पुरंदरे यांना ओळखणाऱ्या मंडळींसाठी प्रतापराव टिपरे हे नाव खास आहे. बाबासाहेबांची भेट घ्यावी असे म्हटले तर पहिला फोन प्रतापकाकांना करावा लागतो. प्रतापकाका म्हणजे सदैव हसतमुख असणारे व्यक्तिमत्त्व. त्यांना कोणाला नाही म्हणणे जमतच नाही. प्रतापकाका यांनी प्रख्यात लेखक गो नी. दांडेकर यांच्या सोबतीने मावळातील बऱ्याच किल्ल्यांची भ्रमंती केली. गो.नी.दांडेकर राहत तळेगावला, प्रतापकाकाही तळेगावचे. पण दोघेही बहुतेकदा किल्ल्यांवर असत. दांडेकर हे सह्याद्री आणि दुर्गवेडे यांचे आदरस्थान होते आणि गंमत म्हणजे दांडेकर यांच्या घरी जाण्यासाठीचा जिना प्रतापकाकांच्या घरातून होता. त्यामुळे प्रतापकाकांना दांडेकरांकडे येणाजाणाऱ्या मोठमोठ्या व्यक्तींना पाहण्यास मिळत असे. बाबासाहेब पुरंदरे आप्पांच्या (गोनिदां) घरी एके दिवशी आले. तेव्हा प्रतापकाकांना त्यांच्याशी बोलण्याची संधी लाभली. प्रतापकाकांनी गडकिल्ल्यांची भटकंती आप्पांसोबत केली होती. ते आप्पांचे लेखनिक म्हणून काही वेळ काम करत असत. बाबासाहेबांनी काकांनी लिहिलेले अक्षर एकदा पाहिले. त्यांना ते हस्ताक्षर अतिशय आवडले. त्यांनी आप्पांना सांगितले. “हा मुलगा मला द्या.” प्रतापकाका तेव्हापासून अधूनमधून पुण्याला बाबासाहेबांकडे जाऊ लागले आणि मग ते बाबासाहेबमय कधी झाले ते त्यांचे त्यांनाच कळले नाही! प्रतापकाका बाबासाहेबांसोबत सावलीसारखे राहू लागले. ते गावोगावी तसेच किल्ल्यांवर निरनिराळ्या कार्यक्रमांना, व्याख्यानांना बाबासाहेबांसोबत असत.

हे ही लेख वाचा -
दापोली तालुक्यातील बुद्धिवैभव!
जाणता राजा – हिंदीमध्ये, दिल्लीत!
जाती जातींतील ब्राह्मण शोधा!

शिवराज्याभिषेकाला तीनशे वर्षें 1974 साली पूर्ण झाली. बाबासाहेबांनी त्यानिमित्त दादर येथील शिवाजी पार्कवर शिवसृष्टी शालिनीताई पाटील यांच्या सहकार्याने उभारली. काका त्यावेळी रात्रंदिवस बाबासाहेबांसोबत होते. बाबासाहेबांची कल्पकता, त्यांच्या ठायी असणारी काम करण्याची ताकद, त्यांचा प्रेमळ स्वभाव याचा प्रतापकाकांवर फार मोठा प्रभाव पडला. काकांनी त्यांच्यासोबत अवघा महाराष्ट्र पादाक्रांत केला. त्यांचा प्रवास लाल डब्याची एस टी ते स्वतःची गाडी इतका झाला आहे. तितकेच काय तर त्यांनी बाबासाहेबांबरोबर परदेशवाऱ्यासुद्धा केल्या. त्यांना अनेक राजवाडे, ऐतिहासिक वास्तू, घराणी बाबासाहेबांसोबत भटकंती करत असताना पाहता आल्या. त्यातूनच काकांना जुन्या वस्तू जमवण्याचा छंद लागला. त्यांचा मोठमोठ्या व्यक्तींशी परिचय झाला.

काकांच्या बाबासाहेबांसोबतच्या असंख्य आठवणी आहेत. एकदा ‘जाणता राजा’ महानाट्याचे प्रयोग सुरू असताना, बाबासाहेबांची तब्येत अचानक बिघडली. त्यावेळी प्रतापकाका नाटकात काम करत होते. काका कोणाच्याही नकळत तेथून बाबासाहेबांना घेऊन बाहेर पडले. त्यांनी त्यांना दवाखान्यात दाखल केले. त्यांच्यावर तेथे ताबडतोब शस्त्रक्रिया करावी लागली. काका तेथेच त्यांच्याजवळ बसून होते. बाबासाहेब काही वेळाने शुद्धीवर आले आणि त्यांनी हाक दिली, ‘प्रताप’. ती हाक ऐकताच काकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले!

बाबासाहेब त्यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला अगदी पाळण्यातील मुलाला देखील अहोजाहो करतात. बाबासाहेब प्रतापकाका यांना मात्र एकेरी नावाने हाक मारतात. बाबासाहेबांच्या व्याख्यानाचे आयोजन सांगलीत एका मोठ्या मैदानात करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात व्याख्यानाच्या दिवशी तेथे खुर्च्या, टेबल, लाऊडस्पीकर्स, प्रेक्षकांची बसण्याची सोय, दिवा यांपैकी काहीही व्यवस्था केली गेली नव्हती. बाबासाहेब व्याख्यानाच्या ठिकाणी संध्याकाळी सहाला दहा मिनिटे असताना जाऊन पोचले तर त्यांना तेथे शेंगा-चिवडा खाऊन टाकलेले कागद, प्लास्टिकच्या रिकाम्या पिशव्या, सिगारेटची थोटके पडलेली दिसली. ते प्रतापकाकांना म्हणाले “आपण ही घाण गोळा करून बाजूला ठेवू आणि आपल्यापुरती तरी जागा स्वच्छ करून घेऊ.”  त्यांनी अगदी तसेच करून बरोबर सहाच्या ठोक्याला बोलण्यास सुरुवात केली. समोर केवळ एक श्रोता होता - प्रतापकाका टिपरे. अन्य मंडळी नंतर दहा-पंधरा मिनिटांनी आली पण सगळी संख्या वीसपेक्षा अधिक नव्हती.

-prataptipre-babasahebpurandareप्रतापराव टिपरे यांचा जन्म 25, डिसेंबर 1950 चा. आई, पत्नी, मुलगा, सून व नात असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या पत्नीने ‘जाणता राजा’ या नाटकामध्ये सोयराबाई, बडी बेगम आणि जनाबाई या भूमिकांत सलग (1280 प्रयोग) चौतीस वर्षे काम केले आहे. त्यांचे वय सत्तर आणि पत्नीचे एकसष्ट आहे. त्यांच्या मुलानेही अनेक वर्षे बाल शिवाजीची भूमिका केली. तो सध्या ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. 

प्रतापकाकांना, गो.नी.दांडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या सहवासात बराच काळ व्यतीत करता आला - त्या दोन्ही इतिहासवेड्या मंडळींची जडणघडण जवळून पाहता - अनुभवता आली. सावलीला स्वतःचे असे वेगळे अस्तित्व नसतेच. सावलीने सदैव सोबत करायची असते... प्रतापकाका टिपरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची सावली बनून त्यांच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

- चंदन विचारे 98336 64811
chandan.vichare@gmail.com
(माहिती संदर्भ - बेलभंडारा -डॉ. सागर देशपांडे आणि राजेंद्रदादा टिपरे)

लेखी अभिप्राय

Very well worded.

Deepak Gore29/08/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.