भागवत परंपरेचे विरगाव (Virgoan)


-virgavविरगाव हे नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील पाच हजार लोकवस्तीचे गाव. ते विंचूर - प्रकाशा या महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 17 वर वसलेले आहे. गावची लोकसंख्या सातहजार आहे. सटाणा- ताहाराबाद या दोन गावांच्या दरम्यान विरगाव सटाणापासून दहा किलोमीटर अंतरावर येते. गुजराथ राज्य गावापासून वायव्य दिशेला फक्त चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. गावाजवळून वायव्य-आग्नेय या दिशेने कान्हेरी नावाची लहान नदी आहे. ती कोरडीच असते. कान्हेरी नदीत ‘रामशेर’ नावाचा डोह आहे. राम पंचवटीला वनवासात जाताना त्या डोहाजवळ थांबले होते. म्हणजे त्यांनीच तो डोह तयार केला अशी आख्यायिका सांगितली जाते. तिचा संगम पाच किलोमीटर पुढे आरम नदीशी होतो. आरम नदी पुढे गिरणा नदीला जाऊन मिळते.   

राजा वीरसेन याने गाव कान्हेरी नदीच्या काठावर वसवले म्हणून गावाला वीरगाव असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. ‘गावात पूर्वी वीर लोक होते, म्हणून गावाचे नाव वीरगाव अशी एक (दंत)कथा हसत हसत सांगितली जाते. शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्यानंतर ते मुल्हेर‍ किल्ल्यावर थांबून विरगावमार्गे परतले अशीही दंतकथा सांगितली जाते. 

विरगाव हे एकोणीस खेड्यांचे केंद्र समजले जाते. ती पंचक्रोशीतील महत्त्वाची बाजारपेठ आहे. गाव प्रामुख्याने पेठ गल्ली, डाव्या बाजूला उभी गल्ली आणि उजव्या बाजूला माळी अशा तीन गल्ल्यांनी घडले आहे. पण त्याचा दिमाख सरळ ओळीत आहे. त्या व्यतिरिक्तव गावात चावडी, सुतार चौक, कुंभारवाडा, लोहारवाडा, भिलाटी आदी वस्त्या आहेत. आजूबाजूला डोंगरेज, आव्हाटी, भंडारपाडे, वनोली, विरगावपाडे, केरसाने, दसाने, किकवारी अशी प्रख्यात गावे आहेत. गावात अन्यत्र पोस्ट, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, दोन बँका, सरकारी दवाखाना वगैरे आहे. गावात बारा बलुतेदार पद्धत अजून बघण्यास मिळते. (गावात अजूनही सुतार लोक आहेत. ते शेतकऱ्यांचे साहित्य तयार करतात, कुंभार मडकी घडवतात, न्हावी, शिंपी हे लोक परंपरागत व्यवसाय करत आहेत. त्यांच्यात अजूनही रोख स्वरूपात सर्व व्यवहार होतात असे नाही. त्यामुळे या गावातील बलुतेदारी पद्धत अजूनही पूर्णपणे मोडकळीस आलेली नाही.)

हे ही लेख वाचा -
तीर्थक्षेत्रांनी वेढलेले सटाणा (बागलाण)
तुकाराम खैरनार - कलंदर शिक्षक (Tukaram Khairnar)

गावच्या आसपासची जमीन काळी कसदार असून शेतीला उपयुक्त अशी आहे. बाजरी, गहू, हरभरा, ऊस, कपाशी, मका, कांदा, कडधान्य (कठान) ही पारंपरिक खरीप- रब्बी पिके असून अलीकडे द्राक्षे आणि डाळींबे यांची व्यावसायिक लागवड होऊ लागली आहे.   

गावाचे ग्रामदैवत श्री पद्मनाभ स्वामी महाराज आहेत. ते बर्याहच वर्षांपूर्वी गावात काशीहून आले होते. ते मुल्हेरला उद्धव स्वामींकडे काही काळ राहिले. ते उद्धवस्वामींचे शिष्य झाले. मुल्हेर विरगावापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. पद्मनाभ स्वामी यांनी विरगावला येऊन कान्हेरी नदीच्या काठावर झोपडी (कुटी) बांधली. त्यांनी तेथे राहून गावाला अध्यात्माची गोडी लावली. लोकांचे प्रबोधन केले. ते भागवत ग्रंथाधारे प्रवचन करत. त्यांनी तुकाराम महाराज यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात पहिला परंपरेचा भागवत सप्ताह विरगाव येथे 1684 साली केला. श्रीमद्‍ भागवत सप्ताह तेव्हापासून अव्याहतपणे चालू आहे. त्यांनी कान्हेरी नदीच्या काठावर संजीवन समाधी घेतली असे सांगितले जाते. त्या मंदिराला समाधी अथवा श्यामदेऊळ असे म्हटले जाते. समाधीला मोठा कोट बांधला आहे. महाराजांनी केलेले कार्य, त्यांनी केलेला उपदेश, त्यांचे कान्हेरी नदीच्या तीरावर असलेले समाधिस्थान व समाधिस्थानाजवळ असलेले मारुतिरायांचे छोटेसे मंदिर पाहिले, की महाराजांच्या कार्याची दिशा कळते. ‘परोपकाराची ठेव मिळवा’ असा संदेश गतवर्षी महाराजांच्या समाधीवर कोरला आहे. तो संदेश देताना विद्यमान महाराजांनी सांगितले, की भगवंत हा माणसात आहे. भगवंताचे नाम घ्या व माणसातील माणुसकी जागवा. माणसाशी माणसासारखे वागा.

-mandir-virgavपद्मनाभ स्वामींच्या मंदिराला नवीन पत्रे व स्लॅब घालण्यात आले असून, खांबांनी आधार देण्यात आला आहे. स्वामींच्या समाधी मंदिराची व सभा मंडपाची अवस्था जीर्णावस्थेमुळे खूपच वाईट झाली होती. गावातील नागरिक कै.वसंत दत्तात्रय जोशी (गुरुजी) यांनी 5 ऑगस्ट 2001 मध्ये ‘श्री संत पद्बनाभ स्वामी संजीवन समाधी जीर्णोद्धार स्वयंस्फूर्ती सेवा मंडळ, विरगाव, तालुका बागलाण’ या मंडळाची स्थापना केली. त्यांनी सर्व समाजाच्या तरुणांना संघटित केले. वेळच्या वेळी बैठका घेऊन, गावातील सर्व समाजांच्या नागरिकांकडून लोकवर्गणी जमा करून व त्यात स्वतः मोठा वाटा उचलून समाधी मंदिर व सभा मंडप यांच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले. त्या कामी गावातील विश्वकर्मा मंडळ व सुतार लोहार मंडळ यांचे सहकार्य लाभले. मंडळाच्या अध्यक्षांनीही स्वतः मोठा वाटा त्या कामी उचलला. पद्मनाभ स्वामींच्या स्मरणार्थ दरवर्षी दीप अमावश्येला विरगावच्या नदीकाठावर एक दिवसाची छोटी यात्रा भरते. यात्रेच्या आठ दिवस आधीपासून समाधीत भागवत ग्रंथ निमंत्रित पुरोहिताकडून वाचला जातो. त्या श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सोहळा सप्ताहाला विशेष महत्त्व असल्याने ठिकठिकाणची मंडळी, ग्रामस्थ त्या सप्ताहाला आवर्जून उपस्थित असतात. श्रीमद्‍ भागवत ज्ञानयज्ञ सोहळ्याचे निरूपण मकरंद नारायण वैद्य महाराज (ते पिंपळनेरला वास्तव्यास असतात. ते पुरोहित आहेत.) गेली सव्वीस वर्षें विरगाव येथे अखंडपणे करत आहेत. त्यांची एकूण एकशेअठ्ठ्याण्णव निरूपणे 2018 सालापर्यंत झाली. मकरंद महाराज हे मितभाषी आहेत, तथापी प्रवचन-निरूपणाच्या वेळी ओघवत्या भाषेत बोलत असतात. सप्ताहाच्या दरम्यान गीतापाठ, विष्णू सहस्त्रनाम पारायण, गोकर्ण महात्म्य व महाप्रसाद असा कार्यक्रम होतो. सोहळ्याची सांगता आषाढी दीप अमावास्येच्या दिवशी होते. संध्याकाळी श्रीकृष्ण मिरवणूक (शोभा यात्रा) पूर्ण गावातून काढली जाते. मंदिर परिसरात छोटीमोठी दुकाने, हॉटेले थाटली जातात. शिवाय खेळणी, अन्य वस्तू यांच्या विक्रीसह पेढे, चुरमुरे, लाडू, रेवडी यांचीही विक्री मोठ्या प्रमाणात होते. संपूर्ण पंचक्रोशीतून ग्रामस्थ दर्शनासाठी येतात. त्यांच्या वतीने समाधी मंदिराला भक्तिभावाने प्रदक्षिणा करण्यात येते. रात्री पद्मनाभ स्वामी महाराज यांच्या पादुकांची पालखी वाजतगाजत निघते. त्यासमवेत गावातील दिंडी असते व रात्री कार्यक्रमाची सांगता होते. पूर्वी यात्रेच्या दिवशी समाधीत लळित नावाचे लोककला- नाट्य सादर केले जात असे. त्यात गावातीलच बारा बलुतेदार- कारू, नारू असलेले कलाकार भाग घेत. परंतु ती जुनी पिढी हयात नाही. म्हणून त्यांच्या सोबत त्या लोककलेचाही अंत झाला. नव्या पिढीच्या काही तरुणांनी ते लळित बसवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते झेपले नाही.

गावात गणेश, महादेव, श्रीराम, मारुती, शनी आणि सावता माळी अशी मंदिरे आहेत. गावात वीर देव, चिरे, खांबदेव, म्हसोबा पुजले जातात. गावाबाहेर नदीच्या कडेला एका डोंगरावर आईभवानी नावाचे देवीचे स्थान आहे. 

अहिराणी माणूस सण व उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतो; त्याचबरोबर ग्रामहित व लोककल्याण जपत त्या सर्व परंपरांचा आनंद घेतो. गावात आखाजीच्या दिवशी बार होण्याची लोकपरंपरा होती. हा बार विरगाव आणि जवळच्या डोंगरेज नावाचे गाव यांच्यातील नदीच्या थडींवरून खेळला जात असे. दोन्ही गावांच्या महिला हातात टिपर्याा घेऊन नदीच्या थडींवर जाऊन एकमेकांना अश्लील शिव्या द्यायच्या. पुरूष लोक -makarand-maharaj-virgavएकमेकांच्या अंगावर दगड फेकून मारत. पण ती प्रथाही अलिकडे बंद झाली. पाडवा ते आखाजी या दरम्यान प्रत्येक सोमवारी रात्री गावात काठीकवाडीची मिरवणूक काढण्याची लोकपरंपरा आहे. ती काठी महादेव या दैवताची असते. पाऊस आला नाही तर गावात धोंड्या काढण्याची लोकपरंपराही टिकून आहे. मारूतीला पाण्याची अंघोळ घालत अंघोळीचे पाणी नदीपर्यंत पोचवले जाते. आखाजीच्या दरम्यान गावात देवतांची सोंगे नाचवण्याचा भोवाडाही होत असे. आता, तो नियमित होत नाही; कधीतरी होतो. गावात कानबाईचा उत्सव मोठ्या थाटामाटात प्रत्येक श्रावणात साजरा केला जायचा. कानबाई ही अहिराणी भाषा पट्ट्यातील महत्त्वाची देवता आहे. कानबाई बसवण्यातही नियमितपणा राहिलेला नाही.

गावाजवळच्या नदीकडेच्या डोंगरावरील आईभवानीचे आणि पद्मनाभ स्वामींच्या समाधीचे दर्शन आजूबाजूच्या खेड्यांवरील लोक कायम घेत असतात. गावात कोणाकडे पाहुणे आलेले लोकही त्या गावदेवतांचे दर्शन मुद्दाम घेतात. 

-डॉ. सुधीर रा. देवरे 0992611767/ 022 24183710
sudhirdeore29@rediffmail.com 
(नीलकांत बोरसे nilkant.borase@gmail.com)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.