नाधवडे – उमाळ्याचे गाव (Nadhawade village)


-nadhavdegav

ऋषीचे कूळ व नदीचे मूळ शोधू नये ही म्हण खोटी ठरते. नाधवडे हे गाव मुंबई - गोवा महामार्गावर असलेल्या तळेरे या गावावरून वैभववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाच किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. त्या गावाच्या परिसरात अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत; त्यांपैकी उमाळा ह्या ठिकाणी जमिनीतून बुडबुडे सतत येत असतात. तेथे नैसर्गिक झरे आहेत. शुद्ध पाणी जमिनीच्या पोटातून येते. पाणी वर्षाचे बाराही महिने वाहते. पोटरीइतकेच खोल आणि अत्यंत नितळ असे पाणी आहे. पाच-सहा ठिकाणांवरून पाण्यातून बुडबुडे येतात. बुडबुडे म्हणजेच उमाळे. तेथूनच गोठणा नदी सपाट पठारावर उगम पावते. उमाळे जेथे प्रकटले आहेत, त्या परिसरात महादेवाचे मंदिर आहे. महाशिवरात्रीला तेथे मोठी यात्रा भरते. मंदिरात पोचायचे झाल्यास गोठणा नदी पार करावी लागते. त्यासाठी साकव बांधलेला आहे.

उमाळा पुढे नाधवडेच्या हद्दीपर्यंत सुसाट वेगाने धावत हद्दीवरून उडी मारतो. तो जेथे उडी मारतो, ते स्थळ नापणे धबधबा म्हणून परिचित आहे. त्या धबधब्याचा वरचा भाग म्हणजे नाधवडे आणि जेथे पाण्याचा झोत पोचतो तेथून नापणेची हद्द सुरू होते. महाराष्ट्रात बारमाही धबधबे तीन आहेत. ते तिन्ही कोकणात आहेत. एक ठाणे जिल्ह्य़ात दाभोसे येथे, दुसरा संगमेश्वरजवळ नायरी-तिवरे येथील धोधावणे धबधबा आणि तिसरा वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधबा. नापणेच्या धबधब्याचा प्रवाह अंगावर झेलणे हे सोपे नाही. त्याचे दर्शन घेता येते, मात्र सगळ्यांनाच तो अंगावर झेलता येत नाही. एका गावाचे पाणी दुस-या गावाच्या हद्दीत उभे राहून अंगावर घ्यायचे, तितके सोपे नाही, हे तेथे गेल्यानंतरच प्रत्यक्ष अनुभवता येते.

नाधवडे हे गाव सुजलाम, सुफलाम आणि निसर्गरम्य  आहे. गावापासून जिल्ह्याचे ठिकाण (सिंधुदुर्ग) सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे, तर तालुक्याचे ठिकाण सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे. नाधवडे गावाचे क्षेत्रफळ सुमारे 1987 चौरस हेक्टर आहे. गावाची लोकसंख्या दोन हजार पाचशेबावीस असून सुमारे सहाशेएकसष्ट कुटुंबे गावात राहतात. गावात पुरुषांची संख्या अकराशेसत्याऐंशी असून महिलांची संख्या तेराशे पस्तीस आहे (2011ची जनगणना). गावात सब पोस्ट ऑफिस आहे. तेथील पोस्टल पिन कोड 416810 आहे. दळणवळणासाठी एसटीबस, रिक्शाची; तसेच, खाजगी वाहनांची सुविधा आहे. गावात सहकारी बँकेची शाखा कार्यरत आहे.

नाधवडे गावाची ओळख 'एक गाव बारा वाडी’ अशी आहे. नाधवडे गावात एकूण बारा मंदिरे आहेत. ब्राह्मणदेव, नागेश्वर, धावगीर, महादेव, विठ्ठल-रखुमाई, चव्हाटी, सिंहासन, गांगोदेव, स्थानेश्वर, आदिनाथ, हिरवाई या सर्वच देवतांकडे वर्षाचे बारा महिने काहीना काही उत्सव सुरू असतो. एक मशीद, एक धरण, विद्येचे मंदिर - सरदार अरविंद सावंत माध्यमिक विद्यालय आणि पाच प्राथमिक शाळा, अंगणवाड्यार अशी गावाची वैशिष्ट्ये आहेत.

उमाळ्याच्या प्रवाहाचे रुपांतर पुढे गोठणा नदीत झाले आहे. उमाळ्यामुळे नाधवडेसहित आसपासच्या गावांना पाण्याचा तुटवडा कधीही भासत नाही. पूर्वी एकच मोठा प्रवाह वाहत असे. कालांतराने, त्याचे  स्वरूप विखुरले जाऊन पाणी चार-पाच प्रवाहांच्या रूपात वाहते. उमाळ्याबाबत असे बोलले जाते, की पूर्वी प्रवाहाच्या ठिकाणी दोन मण वजनाची गोण ठेवली तरी ती पाण्याच्या प्रवाहाच्या जोरावर दूरवर फेकली जात असे! -napnewaterfoolधबधबा साधारणपणे ऐंशी फूट उंचावरुन वाहतो. तेथील पाण्याची खोली  कोणी सांगू शकलेला नाही.

गावाच्या आग्नेय दिशेस उभा असलेला भव्य-दिव्य सालवा डोंगर हे नाधवड्याचे भूषण मानले जाते. कोकिसरे-नाधवडे, खांबाळे, अर्चिणे या गावांना सालव्याची सीमा आहे. तेथे पांडवांनी वस्ती केली होती अशी पुराणकथा आहे, तर त्या खिंडीतून शिवाजी महाराज, त्यांचे सरदार, सैनिक येत-जात असत असा इतिहास आहे. उजव्या-डाव्या बाजूला शिंगीचा डोंगर, पालखीचा डोंगर व पश्चिसमेला देव डोंगर आहे.

श्री महादेवाचे मंदिर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. ते पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू पिंड आहे. घुमटावर सुंदर असे नक्षिकाम आहे. मंदिरासमोरुन गोठणा नदी वाहते. महाशिवरात्र हा उत्सव तेथे मोठ्या उत्साहाने तीन दिवस साजरा केला जातो. मंदिराच्या समोर काही फूट अंतरावर शंकराच्या जटेतून गंगा वाहवी असा पाण्याचा उगम म्हणजेच उमाळा. बारा वाड्या असलेल्या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी देवाचे स्थान आहे. महादेव मंदिराच्या परिसरात सायंकाळी बसून निसर्गरम्य वातावरणाचा घेतलेला आस्वाद काही औरच आहे. 

यात्रेच्या पहिल्या दिवशी नवलादेवी मंदिरातून देवीची पालखी, खांबकाठी, निशाण, अब्दागिरसह ढोलताश्यांच्या गजरात गावातून वाजत-गाजत आणली जाते. यात्रेच्या दिवशी दिवसागणिक तीनदा आरती केली जाते. रात्री मंदिराच्याभोवती पालखी, अब्दागिर, खांबकाठ्या यांच्यासह मानकरी, ग्रामस्थ व भाविक नाच-गाण्यासह प्रदक्षिणा घालतात. त्यावेळी प्रदक्षिणेवर गुलाल व चुरमुरेयांची उधळण करून लोक 'शिव हर हर महादेव'चा जयघोष करतात. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम, युवक मंडळाचे नाटक-एकांकिका आणि मुंबईकरांचे नाटक सादर केले जाते. पहाटेपर्यंत जागर करुन अखंड बहात्तर तास यात्रा भरते. तिसऱ्या दिवशी स्त्री-पुरुष, आबालवृध्द यांसह सर्वजण नदिपात्रात स्नान करतात. विशेषत: नवविवाहित जोडपी नदीला श्रीफळ अर्पण करून स्नान करतात. यात्राकाळात कोणाच्याही घरी गेले तरी पाहुणा समजून आदरातिथ्य केले जाते. 

शेकडो वर्षांपूर्वी एका गुजराथी भाविकाने महादेव त्याच्या नवसाला पावला म्हणून देवळाला घुमट बांधला. चमत्कार 1952 साली घडला. पहाटेच्या वेळी मोठा आवाज होऊन महादेव मंदिराचा घुमट कोसळला. लोक झोपेतून खडबडून जागे झाले. लोक विचलित  व आश्चर्यचकित झाले. घुमटाची दगडमाती सगळीकडे अस्ताव्यस्त पडली होती. पण वैशिष्ट्य म्हणजे मूर्ती व मूर्तीच्या आजूबाजूला एकही कण पडला नव्हता व मूर्तीला जराही दुखापत झाली नव्हती. मंदिराला कोल्हापूरच्या भाविकाने 1886 मध्ये नवस पूर्ण झाल्याने दिलेली घंटा मंदिरात आहे.

नाधवडे गावची ग्रामदेवता म्हणून नवलादेवीची ख्याती आहे. लोकवस्तीपासून थोडे दूर हिरव्यागार वनराईत देवीचे पुरातन मंदिर आहे. मंदिराच्या मागे संथ वाहणाऱ्या नदीचे पात्र आहे. पूर्वसत्ता म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री नवलादेवीच्या मंदिरामध्ये देवीची सुबक मूर्ती आणि बाजूला रवळनाथाची मूर्ती आहे. काळ्या पाषाणात कोरलेली देवीची मूर्ती प्रसन्न आहे. तिच्या एका हातात वीणा तर दुसऱ्या हातात शस्त्र आहे. मंदिराची रचना कोकणातील इतर देवळांसारखी आहे. आवारात कोरडी विहीर आहे. त्या विहिरीत एखादा डुक्कर पडला तर त्याचे मांस संपूर्ण गावात देवीचा प्रसाद म्हणून वाटले जाते. देवीने नाधवडे गावच्या हद्दीपर्यंत डुक्कर किंवा इतर प्राण्यांची शिकार करण्यास मनाई केली आहे, असा रहिवाशांचा समज आहे. मंदिराचा परिसर शांत व निसर्गरम्य आहे. तेथे दर मंगळवारी राज दरबार भरतो. पंचक्रोशीतील भक्त गाऱ्हाणी घेऊन देवीच्या दर्शनाला जातात. होलिकोत्सवात देवीची पालखी वाजतगाजत प्रत्येकाच्या घरी जाते. मंदिराचा जीर्णोध्दार 2011 मध्ये करण्यात आला. त्या मंदिरात नवरात्रौत्सव व देवदिवाळी मोठया उत्साहात साजरी केली जाते.

-mahadevmandir-nadhavde

श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. सुंदर कौलारू सभामंडप आहे. मंदिराच्या परिसरात समोर पाण्याची चिरेबंदी तळी आहे. विठ्ठल रखुमाईच्या चरणातून पाणी हे बारमाही वाहत असते. समोर गोठणा नदीच्या काठावर पिंपळाच्या झाडाखाली श्री पुंडलिकाचे स्थान आहे. गावकरी वारकरी माऊलीची दिंडी आषाढी एकादशीला चवाटी मंदिरातून प्रारंभ करतात. कार्तिकी एकादशीला गावकरी एकत्र येऊन सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा करतात. वाडीतील भजन मंडळी मंदिरात भजन करतात. भजने रात्रभर चालू असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराच्या समोर दहीहंडी बांधली जाते. गावकरी दह्यादुधाची ती  हंडी फोडून कार्यक्रमाची सांगता करतात. कार्तिकी एकादशीच्याच दिवशी तुलशी विवाहाचा उत्सव साजरा केला जातो. प्रथम तुलशी विवाह पूजा कार्यक्रम श्री नागेश्वर मंदिरात होतो. तेथे तुलशी विवाह झाल्यानंतर त्याच ठिकाणावरून ब्राम्हणासहित मानकरी गावघर येथे येऊन तुलशी विवाहास सुरुवात करतात. पंढरपूर यात्रा करून आलेले गावातील भाविक प्रथम श्री विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात येतात. तेथे त्यांचे दर्शन घेऊन झाल्यावर त्यांचे स्वागत दिंडी काढून केले जाते.

गावामध्ये आठ-नऊ पिढ्यांपासूनची नुरानी जामा मशीद आहे. ती त्याच नावाच्या स्थानिक ट्रस्ट मार्फत सध्या नव्या स्वरूपात तयार झाली आहे. मुस्लिम बांधवांतर्फे तेथे मोहरम हा दहा दिवसांचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. उरुसाचा कार्यक्रमही होतो.

हे ही लेख वाचा - 
मुणगे गावचा आध्यात्मिक वारसा!
माझं गाव मोडनिंब! (Modnimb)

श्री ब्राम्हणदेव मंदिर पालखी डोंगराच्या पायथ्याशी आहे. ते गावाच्या दक्षिण दिशेला येते. मंदिरात तीन दिवस सप्ताह हा कार्यक्रम केला जातो. पंचक्रोशीतील भजनी मंडळी तेथे येऊन सतत तीन दिवस सुस्वर भजनांनी देवाची आराधना करतात. तिसऱ्या दिवशी दहिकाला उत्सव मोठया उत्साहात पार पडतो.

नाधवडे येथे श्री दत्तजयंती उत्सव गेली छत्तीस वर्षे अपूर्व उत्साहात साजरा होत आहे. प्रभाकर नारकर प्रणीत औदुंबर सेवा ट्रस्टच्या विद्यमाने मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी ते मार्गशीर्ष वद्य प्रतिपदा असे तीन दिवस दत्तजयंती उत्सव साजरा केला जातो. मौजे रायपाटण (तालुका राजापूर) येथील ग्रामस्थ धोंडू निखार्गे यांनी नाधवडे येथे प्रत्यक्ष न येता नारकर यांच्या घराशेजारी असणाऱ्या औदुंबराच्या रोपट्याची खूण नारकर यांना १९५६च्या जून महिन्यात पटवून दिली. त्या पाच फुटी रोपट्याची ओळख तंतोतंत खरी ठरली. त्यामुळे निखार्गे यांच्या मार्गदर्शनानुसार नारकर यांनी भक्तिपूर्ण श्रध्दा चालू ठेवली आहे. नारकर यांना दृष्टांत १९७८ मध्ये झाला. तेव्हापासून तो  उत्सव आजतागायत धार्मिक विविधतेने उत्साहात साजरा केला जातो. 

नाधवडे गावातील प्रमुख उद्योग-रोजगार-व्यवसायांमध्ये काजू प्रक्रिया उद्योग महत्त्वाचा; एकमेवसुद्धा. इतर शेती व्यवसायासाठी लागणारे मनुष्यबळ, भांडवल व अन्य खर्च या दृष्टीने शेतकऱ्यांना काजू उद्योग समाधानकारक आर्थिक फायदा करून देतो. ताम्हणकर बंधू यांनी सुरू केलेल्या त्या प्रक्रिया उद्योगानंतर, आता गगनगिरी काजू उद्योग, तनिष्का काजू उद्योग असे सुरू झाले आहेत. त्यातून रोजगार तयार होतो.

-dairyfarm-nadhavde

ऊसशेती हादेखील प्रमुख व्यवसाय म्हणून नाधवडे परिसरात वाढीस लागत आहे. तरुण शेतकरी वर्ग त्या व्यवसायाकडे मोठया प्रमाणात वळलेला दिसतो. ऊस पुरवठा गगनबावडा/ कोल्हापूर या ठिकाणी कारखान्यांना केला जातो. सिंधुभूमी डेअरी फार्म, प्रकल्पामुळे आसपासच्या गावांतील दुग्ध व्यवसायास चालना मिळाली आहे. डेअरी फार्मने शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा या करता बेबीकॉर्न लागवड हा यशस्वी प्रयोग केला आहे. पीक साठ-पासष्ट दिवसांत तयार होते. पिकापासून कणसे मिळतातच, पण तो  चारा खाल्ल्यामुळे दूध उत्पन्न व दुधाची गुणप्रत वाढते. जनावरांचे आरोग्य चांगले राहते. सध्या गाय दूध, म्हैस दूध, श्रीखंड व लस्सी ही उत्पादने सुरू आहेत. त्या उपक्रमामुळे पाच-सहाशे जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

- सरपंच – दादासाहेब पावसकर 9822084446

- विनोद पुंडलिक महाजन vinod.p.mahajan@gmail.com
9923047790

लेखी अभिप्राय

फारच छान...

नीता भिसे14/08/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.