महात्म्य, इंद्रायणी नदीचे नव्हे; कुंडली नदीचे!


इंद्रायणी नदी लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. ती पुढे टाटा धरणास मिळते. टाटांनी पाणी सोडणे बंद केल्यामुळे इंद्रायणी नदीला स्वतःचे पाणी नाही. ती लोणावळा, वडगाव आदी शहरांमुळे गटारगंगा झालेली आहे. परंतु, कार्ला भागापर्यंतचा परिसर आणि सह्याद्रीचा एकूण डोंगरभाग यांतून बरेच झरे येऊन तिला मिळतात आणि त्यामुळे तिच्यात पुढेही मोठा प्रवाह तयार होतो. त्यात कुंडली आणि आंध्रा या दोन नद्यांचा वाटा मोठा आहे. तेच पाणी यात्रेकरूंना उपलब्ध होते. देहूला प्रत्यक्षात खूप पाणी उपलब्ध असते. वास्तवात ते पाणी इंद्रायणीचे नसून आंध्रा, कुंडली आदी नद्यांचे व झऱ्यांचे आहे. परंतु, महात्म्य मात्र इंद्रायणीला लाभते!...

इंद्रायणी नदी सह्याद्रीतून वाहते आणि देहू-आळंदी ह्या संतांच्या पावन जन्मभूमीचा प्रवास करून, स्वतः गटारगंगा बनून व घातक रसायनांनी मलिन होऊन तुळापूरला मुळा, मुठा व भीमा यांच्या संगमात भीमा नदीच्या पात्रात लुप्त होते. त्यामुळे भीमेचे पिण्याचे पाणी प्रदूषित करते. इंद्रायणी नदीत जे पाणी पावसाळ्याव्यतिरिक्त इतर दिवशी दिसते ते इंद्रायणी नदीचे मुळी नाहीच! कारण त्या नदीचे सर्व पाणी टाटा धरणात लोणावळ्यात अडवले गेले आहे. त्यांपैकी एक थेंब पाणीसुद्धा धरणातून सोडण्याची व्यवस्था अस्तित्वात नाही. 

नदीमध्ये प्रचंड प्रमाणात घनकचरा लोणावळा स्थानिक स्वराज्य संस्थेकडूनसुद्धा टाकला जातो. इंद्रायणी नदीपात्रात अतिक्रमण हा विषय जणू स्पर्धेचा विषय बनला आहे. ती नदी लोणावळा सोडताना रेल्वे लाईनच्या खालून घुसते व त्या ठिकाणच्या विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे नदीच्या लोणावळा बाजूस प्रदूषित पाण्याचा साठा प्रचंड प्रमाणात बनला आहे. तो अतिशय घाणेरडा साठा नदीच्या दुर्दशेचे दर्शन घडवतो. 
ती गटारगंगा नदी लोणावळा अगदी संथपणे सोडते. नदीने लोणावळा परिसर सोडला की निसर्गच, नदी माळरानावरून वाहत असताना मानवी मलमूत्र व सांडपाणी यांच्यावर शुद्धिकरणाची प्रक्रिया करतो. मलमूत्राचे पाणी थोड्या अंतरावर, पुन्हा प्राण्यांना पिण्यायोग्य व शेतीसाठी उपयुक्त बनते. त्याचा फायदा नदीपात्राजवळचे शेतकरी व वीटनिर्मिती कारखानदार घेतात. वीटनिर्मिती हा त्या शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणा अथवा पोटापाण्याचा व्यवसाय बनला आहे. त्या अमर्याद व विनानिर्बंध पाणीउपशानंतर पात्रात पाणीच उरत नाही व परत पात्र कोरडे दिसू लागते! 

-indrayni-pollutionसह्याद्री पर्वतरांगांमध्ये छोट्या आणखी काही नद्या उगम पावतात. त्या मात्र स्वच्छ व सुंदर पाणी घेऊन इंद्रायणीस थोड्या थोड्या अंतरावर येऊन मिळतात. तेच पाणी शेवटपर्यंत येते. त्यामध्ये विशेष उल्लेख करण्यासारखी उपनदी म्हणजे कुंडली नदी. ती इंद्रायणीस कामशेतच्या जवळपास येऊन मिळते; पण त्या अगोदर, अंगणगाव-भाजेलेणी या परिसरातील अनेक बारमाही जिवंत झरे कार्ला गावाजवळ नदीला उजव्या बाजूने येऊन मिळतात. बारमाही वाहणारे काही नाले एकविरा डोंगराच्या बाजूनेही इंद्रायणीस पाणी पुरवत असतात.

इंद्रायणी नदीवरील पहिला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा (के.टी.विअर) कार्ल्याच्या परिसरात आहे. प्रदूषणाचा फटका त्या बंधाऱ्यास अजून तरी बसलेला नाही. त्यामुळे नदीच्या मूळ रूपाचे दर्शन कार्ला परिसरात अनुभवण्यास मिळते. इंद्रायणीवर कोल्हापुरी पद्धतीचा दुसरा बंधारा पुढे, मळवली येथे आहे. त्या दोन बंधाऱ्यांच्या मध्ये जलाशयात जैवविविधता बऱ्यापैकी अबाधित आहे. मळवलीच्या बंधाऱ्याअगोदर कार्ला भागातून खूपसे पाणी ह्या इंद्रायणीच्या नदीपात्रात येऊन मिळते. त्यानंतर टाकव बंधारा आहे. तोसुद्धा कोल्हापुरी पद्धतीचा आहे. त्याच्या अगोदर शिलाटणे व नदीच्या उजव्या बाजूने पाटण ह्या परिसरातील पाणी येते (पाटण हे इंद्रायणीचे बेसिन आहे). त्यानंतर लगेच पिपळोली हा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा येतो. टाकवे व पिपळोली हे बंधारे जवळ जवळ असल्याने नदीचा प्रवाह नव्वद अंशानी उजव्या बाजूला वळला आहे व तेच खरे सौंदर्य नदीचे पाहण्याजोगे आहे. नदी अचानक अशी वळते, त्यामागील निसर्गाची योजना काय असावी हे अभ्यासणे मानवाच्या बुद्धीला आवाहन आहे.

-manthan

टाटा ट्रॉली बंधारा टाकवे परिसरातच आहे. इंद्रायणी नदीच्या पात्रात पाणी त्या परिसरातून मोठ्या प्रमाणात झिरपत असते, कारण वडीवळे कालव्याचा उजवा कालवा टाकवे परिसराच्या शेतीला मुबलक पाणी पुरवत आहे. त्यामुळे तो परिसर सुंदर बनला आहे. ते सर्व नदीच्या मूळ रूपात कोणतेही बदल न केल्याने शक्य झाले आहे. नदीप्रवाहात मानवी हस्तक्षेप कमी केल्याने नदीतील उपलब्ध पाणीसाठ्याचे गुणवत्ता व निसर्गसंरक्षण असे दोन्ही दृष्टींनी समाधानी चित्र आहे. त्यानंतरच्या पाथरगाव बंधाऱ्याचा उद्देश फक्त पाणीसाठा हा दिसून येतो. त्यानंतर आहे कामशेत बंधारा. तो बंधारा नागरी पाणीपुरवठा ह्या एकाच अपेक्षेने बांधला गेला असावा. कुंडली नदी कामशेतनंतर ह्या नदीत विलीन होते, ती जरी लांबीला कमी असली तरी तीच खरी इंद्रायणी नदीची लाज राखते. ती पाणी पुरवणारी पर्यायी सोय आहे. जिवंत झऱ्यांचे पाणी जांभवली, धोरण, शिरदे आणि वळवणती ह्या परिसरातून सोमवाडी तलावात जमा होते. पाणी त्या तलावात नेहमी उपलब्ध होत असते. त्यामुळे निसर्ग त्या परिसरात प्रसन्न सदैव असतो. सोमवाडी तलावावर वडीवळे या गावी वडीवळे धरण व त्याच प्रकल्पातून शेतीसाठी सिंचन योजना तयार केली गेली आहे. उजवा कालवा व डावा कालवा असे दोन कालवे तयार झाले आहेत. त्यामुळे पाण्याचे वाटप शेतीसाठी उजव्या कालवा अंतर्गत कार्ल्यापासून वेल्होळी व डाव्या अंतर्गत पारवडी ते वडीवळे ह्या परिसरातील सर्व गावांना होत आहे. ती नदीची खरी किमया आहे.

कुंडली नदीचा दुसरा उगम शिरवटा धरणातून होतो. शिरवटा हे धरण मोठे आहे. त्याच्या विसर्गातून बाहेर आलेले पाणी कुंडली नदीला वर्षभर तुडुंब ठेवते. कुंडली नदीवर परत दोन ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे -gatarganga-indrayani-pollutionआहेत. त्यांपैकी एक आहे सांगीसे बंधारा व दुसरा बुधवडी बंधारा. त्या साठ्यामुळे देहू-आळंदीमध्ये साजरे होणारे वारकऱ्यांचे अनेक धार्मिक सोहळे व त्यासाठी आवश्यक नदीपात्रातील पाण्याची पातळी सांभाळली जाते. वारकऱ्यांना आवश्यक पाणी नदीत वडीवळे धरणातून सोडले जाते. 

कुंडली नदी ही महत्त्वाची भूमिका निभावत असतानासुद्धा एकही वारकरी त्या नदीचे गुणगान गात नाही; किंबहुना, कित्येकांना माहीतसुद्धा नसेल, की कुंडली नावाच्या नदीमुळेच इंद्रायणी नदीचे अस्तित्व टिकून आहे. ती नदी इंद्रायणी नदीला कामशेत व खडकाळे ह्या दोन बंधाऱ्यांच्या मध्यावर मिळते. त्या ठिकाणी इंद्रायणी नदीची भव्यता जाणवू लागते. ती भव्यता काय असते? ते अनुभवण्यासाठी पहिल्या पावसाचा भर ओसरल्यावर सप्टेंबर महिन्यात तेथे भेट दिली पाहिजे.

कुंडली नदीचे पाणी प्रदूषणविरहित व स्वच्छ पाच वर्षांपूर्वी होते, पण आता ते पाणी पण काही प्रमाणात प्रदूषित होऊ लागले आहे. कारण वडीवळे सिंचन प्रकल्पाच्या पाण्याची विपुलता लक्षात घेऊन सर्व व्यावसायिक शेतकरी पारंपरिक शेती सोडून देऊन ग्रीन हाऊससारखी महागडी शेती करू लागले आहेत. त्यातून बाहेर पडणारे घातक रसायने व रासायनिक खते मिश्रीत सांडपाणी नदीपर्यंत पोचण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रदूषणाची मात्रा जरी त्या परिसरात कमी असली तरी प्रदूषण शेतीमुळे सुरू झाले आहेच. खडकाळे, नानोली, पारवाडी एक व पारवाडी दोन ह्या चार बंधाऱ्यांच्या पाण्याचा वापर शेतीसाठी जास्त होताना दिसतो व त्यामुळे नदीच्या पात्रात अतिक्रमण हा विषय आटोक्यात आहे. मात्र वडगावपासून नागरी वसाहती नदीच्या पात्राच्या अगदी शेजारी उभ्या राहत आहेत. त्यामुळे घनकचरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जाताना दिसत आहे. त्यासोबत मानवी मलमूत्र, शुद्धिकरणाची प्रक्रिया न करता, थेट व बेधडक नदीपात्रात सोडताना कोणतीही संवेदना मानवास होताना दिसत नाही.

इंद्रायणी नदीच्या कुरवंडे ते वडगाव ह्या भागात पाण्याचा साठा प्रचंड आहे. तेथे शासनाने सुंदर सोय करून ठेवली आहे. पण तो जलाशय प्रदूषित होऊ नये याबाबतचे नियंत्रण सरकारकडून राबवले जात नाही.    

इंद्रायणी नदीला आंध्रा नावाची आणखी एक उपनदी राजापुरी बंधाऱ्यानंतर येऊन मिळते. तो इंद्रायणी नदीला मोठा, वर्षभर पाणी पुरवणारा पर्याय उपलब्ध आहे. आंध्रा नदी मोठ्या पाणीसाठ्यातून उगम पावते. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीतील कांबरे, ठोकरवाडी नावाच्या गावांच्या परिसरात पसरलेला जलाशय वर्षभर पाण्याने भरलेला असतो अर्थात त्याचा पसारा मोठा आहे. आंध्रा धरण त्या जलाशयावर बांधले आहे. त्या धरणाची पाणी साठवण क्षमता मोठी आहे. निसर्गनिर्मित नदी काय असते ते पाहण्यासाठी त्या नदीवर जावे. आंध्रा नदी धरणापासून पुढे वाहताना तिला कशाळ वगैरे परिसरातील अनेक प्रवाह येऊन मिसळतात. नदी नंतर कोडीवळे गाव पार करून पुढील नागमोडी प्रवास करत इंद्रायणीच्या मुख्य प्रवाहात विलीन होते. आंध्रा नदीचे पाणी शुद्ध व स्वच्छ आहे. लोणावळ्यातील मानवी मलमूत्र घेऊन सुरू झालेली इंद्रायणी नदी कुंडली नदीच्या

-kundali-river

पाण्याच्या जीवावर पुढे आली आणि त्यात आंध्रा नदी पण सामील झाली. त्यानंतर नदीचे पात्र रुंदावले आहे. इंद्रायणी नदीपात्र विशाल वाटू लागते आणि ती नदी वडगावच्या नागरी वस्तीच्या विळख्यात प्रदूषित होणे पुन्हा सुरू होते. नदी आंबी गावाच्या परिसरातून पुढे इंदुरीला पार करून काटेश्वर बंधाऱ्यात अडकते. त्याच्या पुढे इंद्रायणी नदी शेलारवाडी, कानेवाडी व त्यानंतर सांगुर्डी या अगदी जवळच्या अंतरावरील तीन बंधारे ओलांडून देहू परिसरात प्रवेश करते. पण त्या अगोदर तिला आणखी एक छोटी सुधा नदी जाधववाडीवरून येऊन देहूच्या बंधाऱ्यानंतर मुख्य प्रवाहात मिसळते.

- विकास पाटील 7798811512
ibksvrp@gmail.com 

(जलसंवादवरून उद्धृत, संपादित-संस्कारित) 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.