नव्या युगासाठी नवा अजेंडा!


-nava-agendaमाणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या असे कोणी विचारले तर कोणाच्याही तोंडी पटकन येईल, की अन्न, वस्त्र आणि निवारा. पण त्यांची तर परिपूर्ती झाली आहे. देशात अन्नधान्य मुबलक आहे. गेल्या वर्षी दुष्काळ असूनदेखील देशात अन्नधान्य उत्पादन नेहमीपेक्षा एक लाख मेट्रिक टनाहूनही जास्त झाले. कपड्यांची विविधता इतकी आहे, की अर्धवट कपडे अंगावर असलेला नंगा माणूस गोष्टींत आणि मालिकांतदेखील आढळत नाही! निवारा म्हणजे घरे अजून दुर्मीळ आहेत, परंतु लोक झोपड्या बांधून राहतात. गृहनिर्माणाचे वेगवेगळे प्रयोग, विविध योजना जाहीर होत असतात आणि लक्षावधी ब्लॉक्स, कुलुपे लावून पडले आहेत. काही वेळा असे वाटते, की विनोबांनी भूदान चळवळ चालवली, ती अल्प प्रमाणात यशस्वीही झाली. तशी ‘फ्लॅटदान’ चळवळ समाजात सुरू व्हावी. एरवीही, रिअॅलिटी इंडस्ट्री भरभराटीत आहे. भुरट्या कंपन्या बुडीत आहेत पण महत्त्वाच्या सहा कंपन्या (कल्पतरू, डीएचएफएल यांसारख्या) डेट फ्री उद्योग करत आहेत असे सांगतात. त्यामुळे माणसाला जे हवे ते मिळाले आहे. तेवढेच नव्हे तर देशातील बहुसंख्य माणसांच्या सभोवती सुखसुविधांची चैन आहे.

मग माणसाने जगावे कशासाठी? म्हणजे तो प्रश्न व्यक्तिगत पातळीवर नसतो, कारण कोणाला अध्यात्माची ओढ असते, कोणी छांदिष्ट असतो – तो एक वेड घेऊन जगत असतो. कोणी वाचन-अभ्यास-संशोधन करतो. पण समूह म्हणून, समुदाय म्हणून माणसांपुढे अजेंडा राहिलेला नाही, हे लक्षात येते का तुमच्या? तो एकेकाळी रोटी-कपडा-मकान या स्वरूपात होता. मग त्यामधून वेगवेगळी परिमाणे तयार होत होती – तितके अजेंडे बनत होते व तितक्या मनुष्यसमुहांना उद्दिष्ट मिळत होते. ते अजेंडे मुख्यत: भौतिक स्वास्थ्य व नंतर समृद्धी यांसाठी होते. माणसाने रोटी-कपडा-मकान प्राप्त करण्याचा प्राथमिक टप्पा पार केला, ते नकळतपणे घडलेले नाही. माणसाने त्यासाठी प्रयत्न केले, लोकांनी आंदोलने केली, सरकारने पंचवार्षिक योजना आखल्या, उद्योगधंद्यांच्या विकासाला चालना दिली. त्याचे लाभ सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचले. त्याचे तीन कालखंड दिसतात – 1947 ते 1970 - देशाच्या स्वातंत्र्यानंतरचा संस्थापनेचा काळ; 1970 ते 1990 – विस्ताराचा कालखंड – लोकांच्या मागण्या वाढल्या व सरकारी योजना तशा पसरत गेल्या; आणि 1990 ते 2010 – विपुलतेचा काळ. त्यामुळे लोकांच्या मागण्या मंदावल्या, माणसे वेगळेच प्रश्न घेऊन पुढे आली – त्यांच्यातील विधायकता, प्रयोगशीलतादेखील वाढली आहे. गिर्यारोहण ते एव्हरेस्टवरील चढाई यांसारखी वेडी साहसेही माणसांना अधिक खुणावू लागली आहेत.

या तिसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानाने माणसांचा कबजा घेतला; त्यांना सुखस्वास्थ्य खूपच लाभले. त्याहून अधिक असे ‘कम्युनिकेशन’चे साधन, म्हणजे मोबाईल प्रत्येकाच्या हाती आला. त्याने समाजाची मानसिकताच बदलली. त्यामुळे माणसे स्वत:मध्ये रमू लागली, स्वान्त झाली. त्यांचे प्रत्येकाचे प्रश्न, अडचणी असतील कदाचित, परंतु समूह म्हणून समस्या खूपच कमी झाल्या. त्यांना मोकळा बराच वेळ मिळू लागला. ते करमणुकीत मग्न झाले. खरोखरीच, नव्या जगासमोरील नवे प्रश्न म्हणून जे सांगितले जातात ना त्यात ‘लीजर टाइम’ हा असणार आहे. मोकळा, फुरसतीचा वेळ! प्रगतीचा वेग पाहिला तर माणसांना जगण्यासाठी पुढील काळात काम करावे लागेल असे वाटत नाही आणि त्या मोकळ्या वेळाचे काय करायचे हा प्रश्न त्यांना भेडसावू लागेल. तो प्रश्न वृद्ध लोकांच्या समुदायात तीव्रपणे सध्याही जाणवतो.

-manthanlogo

म्हणजे अन्न-वस्त्र-निवारा या भौतिक गरजा भागवल्या गेल्यानंतरच्या कालखंडासाठी माणसाला नवा अजेंडा काय असणार याचाच विचार करावा लागणार आहे. तो अजेंडा मन:स्वास्थासंबंधी असणार आहे. म्हणजे मानसिक विकार बरे करण्यासाठी नव्हे तर मानवी मन अधिकाधिक मुक्त, स्वच्छंद आणि तरी संघटित व सुदृढ अशा तऱ्हेने विकसित कसे होईल यासाठी अजेंडा! तो प्रश्न संस्कृतीचा आहे. प्रथम धर्माने मानवी मनाला तो आधार दिला. माणसास भौतिक विकासाची गरज भासली तेव्हा लोकशाही, स्वातंत्र्य या संकल्पनांनी व त्यानुसार आखल्या गेलेल्या देशोदेशीच्या राज्यघटनांनी तो आधार पुरवला. भौतिक विकास बराचसा साधला गेला. जगभरच्या माणसांना स्वातंत्र्य लाभले. तोवर तंत्रज्ञानाने त्यांना त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याची जाणीव करून दिली. म्हणजे देश-प्रदेश स्वातंत्र्याच्या पुढील, मानवी जीवनातील परमोच्च पातळी. त्या अवस्थेतील समाजात विषमता असणार, अतिश्रीमंत आणि अतिगरीब असे दोन्ही लोक असणार. विषमता समर्थनीय आहे असे नव्हे, परंतु ती अपरिहार्य आहे. व्यक्तीचा वेगवेगळेपणा, स्वतंत्रपणा हा मनुष्यजीवनाचा भाग आहे, असे गृहीत धरून अजेंडा आखावा लागेल. नव्या समाजासाठी नवा अजेंडा हीच नव्या युगाची हाक असणार आहे.

- दिनकर गांगल 9867118517
dinkargangal39@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.