रांगोळीत रांगोळी - चैत्रांगण (Chaitrangan)


-heading-chaitranganवसंत उत्सवाची सुरुवात झाडांना नवी पालवी फुटून होते. तो नव्या देहाचा जन्म जुने-जीर्ण टाकून देऊन झालेला असतो. सृष्टीचा तो सोहळा पाहून मन प्रसन्न होते आणि तसे प्रसन्न, कलासक्त मन अनेक प्रकारच्या रांगोळ्या काढून व्यक्त केले जाते. नवीन ऋतूचे स्वागत उत्साहाने रांगोळ्या काढून केले जाते. रांगोळी अंगणात सडा घालून दारापुढे व उंबरठ्यावर रोज काढणे ही भारतीय परंपरा आहे. रांगोळी काढून तिच्यावर हळदीकुंकू चिमूटभर टाकायचे ही प्रथा आहे. महाराष्ट्री कुटुंबांत ताटाभोवती रांगोळी सणावाराच्या दिवशी किंवा काही विशेष प्रसंगीही काढली जाते. बोडणाचीही रांगोळी विशेष असते. ‘चैत्रांगण’ हा रांगोळी प्रकार वैशिष्ट्यपूर्ण आहे.

चैत्र महिन्यात रोज सकाळी अंगणात एक चौकोन सारवून त्यावर विशिष्ट प्रकारची रांगोळी काढतात, तिला चैत्रांगण असे म्हणतात. त्यावर हळदी-कुंकू व फुले वाहतात. ती प्रतीकात्मक स्वरूपाची रांगोळी आहे. चौकोनात एका मखरामध्ये दोन गौरी काढतात. त्यांना पार्वती व तिची सखी समजतात. तिच्या दोन बाजूंला सूर्य व चंद्र काढतात. सूर्य हा कायम प्रकाशमान, निसर्गचक्राचा एक अविभाज्य घटक; तर चंद्र शीतल. सूर्य-चंद्रांमुळे ही सृष्टी कायम प्रकाशू दे, असे त्यातून सुचवायचे असावे. देवीच्या बाजूला दोन पंखे उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून आणि मखरात देवीला बसण्यासाठी दोन पाटही काढतात.

शंख, चक्र, गदा व पद्म ही देवतांची आयुधे आणि हत्ती, गरुड ही त्यांची वाहनेही त्यात काढली जातात. रांगोळीत गाय, नाग यांना शेतीमुळे महत्त्व तर कासवाप्रमाणे सर्व जाणिवा आत घेऊन नंतर देवदर्शन करावे हे सुचवण्यासाठी त्या जलचरांचाही समावेश होतो. गोपद्मामुळे गायीचे स्मरण आणि हत्ती म्हणजे गजांतलक्ष्मी ऐश्वर्याचे, सामर्थ्याचे प्रतीक. तीक्ष्ण नखे व दृष्टी, धारदार चोच यांच्या सहाय्याने भक्ष्याला अचूक टिपणारा गरुड हे श्रीविष्णूचे वाहन म्हणून ओळखला जातो. स्वस्तिक हेही शुभचिन्ह, ते सात्त्विकता, आनंद व मांगल्य यांचे प्रतीक आहे. म्हणून तर ती शुभचिन्हे चैत्रांगणात समाविष्ट झाली असावीत. ‘अज्ञानरूपी चिखलातून कमळ फूलू दे’ ही भावना आहे.

चैत्रांगणात विद्येची देवता सरस्वती, तुळस, वृंदावन, ॐ, आंबा, उंबर, पिंपळ यांबरोबरच कलशही दाखवतात. शुभचिन्ह व धार्मिक कामात कायमच लागणारा नारळही तेथे असतो. रांगोळीत मोर व पोपट हे पक्षी काढतात. गौर चैत्रात महिनाभर घरोघरी बसते. त्यामुळे चैत्रांगणात फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र, कंगवा ही सौभाग्यचिन्हे असतात. लक्ष्मीच्या पावलांसोबत पाळणा व तिचे बाळही असते. ते वंशवृद्धीचे प्रतीक आहे. शंकराची त्रिशूळ, डमरू ही वाद्ये, तर त्यांना प्रिय असलेले बेलाचे पान त्यात काढले जाते. अशा प्रतीकरूपी अनेकविध चित्रांनी साकारलेले चैत्रांगण अंगणात शोभून दिसते.

देवघरात झोपाळ्यावर विराजमान झालेली चैत्रगौर, तिच्यापुढे हळदीकुंकवासाठी खास केलेली आरास आणि कैरीची डाळ व पन्हे यांचा आस्वाद घेण्यासाठी जमलेला महिला वर्ग! मोगरा, दवणा, मरवा यांचा दरवळणारा सुगंध, सोबत वाळ्याचे अत्तर त्या सगळ्यामुळे वातावरण सुगंधित झालेले असते. अशा उत्साही वातावरणातील वसंतोत्सव चैत्रांगणाने अधिक आनंदी होऊन जातो.

-स्मिता भागवत 9923004118 smitabhagwat@me.com
(‘आदिमाता' वरून उद्धृत संपादित - संस्कारित)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.