‘गुणवत्ता’ मोजण्यास साधन नवे!


विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मारडा (मोठा) या लहानशा गावी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली गेडाम हिने तिच्या वर्गातील एका विद्यार्थिनीला लिहिलेले पत्र मुद्दाम वाचावे. 

-heading-gunvatta-

प्रिय दीक्षा,

खूप म्हणजे खूपच गोड आहेस तू! तुझी नजर सतत काही शोध घेत असते. तू प्रत्येक चांगली गोष्ट करून पाहतेस. तुला खूप खूप वाचावेसे वाटते. वाचनालयातून पुस्तके घेतेस, वाचण्यासाठी. सर्वांसोबत मिळून राहतेस. सर्वांना मदत करतेस. सोबत-सोबत चालताना हळूच माझा हात पकडतेस, तेव्हा खूप छान वाटते मला. तू तुझ्या बाबांची फार लाडकी आहेस, हो ना? आणि आईला तुझे खूप कौतुक वाटते. आता तू दुसऱ्या वर्गात गेलीस. पुढील वर्षी आणखीन नवीन नवीन छान छान गोष्टी शिकू. 

तुझी, वैशाली टीचर

हा हृदयस्पर्शी मजकूर मुलांना वर्षाच्या शेवटी शाळांकडून जे प्रगतिपुस्तक दिले जाते, त्याच्या मागील बाजूस लिहिला आहे!

वैशालीची भूमिका साक्षरता म्हणजे शिक्षण नाही, तर सर्वांगीण गुणवत्ता म्हणजे शिक्षण, अशी आहे. तिचा प्रयत्न राज्याला मूल्यमापनाच्या बाबतीत निराळा दृष्टिकोन देण्याचा आहे. वैशाली शाळेतील मुलांची जिवलग मैत्रीण असते. तिने ‘सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन’ (CCE) करताना प्रत्येक विद्यार्थ्याची विषयनिहाय वेगळ्या प्रकारे केलेली नोंद वाचणाऱ्याला विचार करण्यास लावते. एका विद्यार्थिनीच्या प्रगतिपुस्तकावरील या काही नोंदी: 

विद्यार्थिनीचे नाव- दीक्षा,  इयता- दुसरी.

भाषा (मराठी) - तुला मराठीतील सगळेच येते. खूप वेगाने आणि छान वाचण्यास शिकत आहेस. कोठे काही लिहिलेले दिसले की पटकन वाचून टाकतेस. वेगाने आणि छान लिहितेस. बोलताना मान आणि डोळे असे फिरवतेस, की लाडच येतो! कोणतीही गोष्ट लक्ष देऊन ऐकतेस, पाहतेस. म्हणून तुला सर्व काही येते.

गणित- गणित तुला पूर्ण येते. संख्या लिहिता-वाचता येतात. बेरीज-वजाबाकीची गणिते पान पान भरून मागतेस आणि पटपट सोडवतेसही. लहान-मोठी संख्या, मागील-पुढील संख्या तुला सांगता आणि लिहिता येते.

इंग्रजी- तुला इंग्रजी कविता छान म्हणता येतात. A, B, C, D... वाचता-लिहिता येते. इंग्रजी बोलता येते. तुला Sorry म्हणता येते.

परिसर अभ्यास- सुंदर फुले, फुलपाखरू पाहिलेस, की मला येऊन सांगतेस. तुला झाडे, डोंगर, नदी, वारा, पाऊस, ऊन, ढग, आकाश, चंद्र, चांदण्या, पक्षी, प्राणी, फुले, फळे, गाडी, विमान, डोंगर अशा कितीतरी गोष्टी तुला माहीत आहेत. 

-caption 1- dikshaकला- गाणे म्हणण्यास खूप आवडते तुला. डान्स छान करता येतो. चित्र फारच सुंदर काढतेस. मुलगी नाचत आहे. मुलगा झाडांना पाणी घालत आहे, अशी छान छान चित्रे काढली आहेस. 

कार्यानुभव- नेहमी वर्ग झाडतेस. सुट्टी झाल्यावरही थांबून राहतेस आणि सामान नीटनेटके मांडून ठेवतेस. आगपेटीच्या काड्यांपासून, डाळींपासून छान डिझाईन तयार करतेस. झाडे लावतेस. त्यांना पाणी देतेस. कैचीने तुला नीट कापता येते.

शारीरिक शिक्षण- सतत माझ्यामागे ‘टीचरजी, आपण हे खेळू - ते खेळू’ म्हणत राहतेस. खेळासाठी तयारच राहतेस. तुला कबड्डी, खो-खो, खेळण्यास खूप आवडते. तुला लंगडी घालता येते. वेगाने धावतेस. उंच उडी मारतेस. खूप स्वच्छ आणि नीटनेटकी राहतेस.

अशा बारीकसारीक नोंदी कराव्या म्हटले तर मुलांमध्ये मिसळल्याशिवाय, तन-मन-धनाने काम केल्याशिवाय कसे शक्य आहे? वैशाली चौकटीतील शिक्षक नाही. तिचा स्वतःचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निराळा आहे. 

वैशालीचे आईवडील, दोघेही शिक्षक होते. तेही मुलांकरता वेगवेगळे उपक्रम योजत. वैशाली मूळ चंद्रपूर जिल्ह्याच्या पंभुर्णीची. ती गेली बावीस वर्षें शिक्षक म्हणून काम करत आहे. त्यांचा विवाह तुलेश चालकुरे यांच्याशी झाला आहे. ते पतसंस्थेत काम करतात. ती सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या दुर्गम तालुक्यातील गोंडगुडा (धोंडा) या गावी इयत्ता पहिली ते पाचवीला शिकवते. तिचे पती व मुले चंद्रपूरला असतात. ती शाळेच्या गावी मुक्कामी असते. ती शनिवार-रविवार चंद्रपूरला येते. तिला दोन मुले आहेत. मुलगी यावर्षी बारावी व मुलगा दहावी पास झाले. वैशाली डी एडला असताना सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होत असे. तिला डीएडचा निकाल लागल्यानंतर सात-आठ महिन्यांतच चंद्रपूर जिल्हा परिषदेत नोकरी मिळाली. नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणाले, “तुम्हाला नोकरी मिळाली आहे. तुम्ही पुढे पदवी मिळवून, स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होऊ शकता. कोणाकोणाला पुढे जाऊन अधिकारी व्हायचे आहे?” सगळ्यांनी हात वर केले. तिने एकटीने हात वर केला नाही. त्यांनी कारण विचारले, तेव्हा वैशालीने उत्तर दिले, ‘मला आयुष्यभर शिक्षकच राहायचे आहे.’ 

वैशाली शिक्षक झाल्यावर मुलांची गुणवत्ता सुधारण्याच्या मागे लागली. मुलांना गणित आले पाहिजे, त्यांना लिहिता आले पाहिजे; त्या सर्वांबरोबर मुलांनी शिस्तीत राहवे, मुलांनी ती जे सांगे तेच करावे असे तिला वाटत होते. पण वैशाली जसजशी मुलांसोबत राहू लागली तसतशी तिला वस्तुस्थिती समजत गेली, मुलांची मानसिकता समजत गेली. भाषाशिक्षणाचा क्रम ‘श्रवण-भाषण-वाचन-लेखन-आकलन-कार्यात्मक व्याकरण--saurav-pragatipustakस्वंयअध्ययन-भाषेचा व्यवहारात उपयोग-शब्दसंपत्ती’ हा योग्य नसून तो क्रम उलटा असला पाहिजे असे तिचे मत तयार झाले. मुलांकडे असलेल्या शब्दसंपदेपासून सुरुवात केली तरच मुलांना शिक्षणात रस येईल. तोच विचार घेऊन वैशालीने शाळेत पाचवी ते सातवी अशा वर्गांना शिकवत असताना, निरनिराळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. पण बहुतेक मुलांना लिहिता-वाचता येत नव्हते. वर्गातील बहुसंख्य मुले बोलायचीच नाहीत. ती मुले मोकळी व्हावीत, त्यांनी संवाद निर्भयपणे साधावा, खूप प्रश्न विचारावेत. त्यांना बौद्धिक आनंद उपभोगता यावा यासाठी त्यांना सुटीच्या दिवशी फिरण्यास घेऊन जात असे, घरी बोलावत असे. त्यांच्या सोबतीने स्वयंपाक आणि जेवणही करत असे. मुले कृती करत, पण मोकळेपणाने व्यक्त होत नसत. वैशालीने लीला पाटील यांची पुस्तके वाचली. तिच्या लक्षात शिक्षणाला वाहिलेली नियतकालिके व इतर पुस्तके वाचताना असे आले, की मुलांना आश्वासक वातावरण पहिल्या वर्गापासून मिळण्यास हवे. बरेच शिक्षक पहिल्या वर्गाला शिकवण्याला नाखूश असतात, पण तिने मुख्याध्यापकांशी भांडून पहिलीचा वर्ग अध्यापनासाठी मिळवला! 

 

हे ही लेख वाचा- 
हळदुगे येथील फुलपाखरांची शाळा
स्यमंतक - भिंतींपलीकडील शाळा!

वैशालीने बहुविध बुद्धिमत्तांचा सिद्धांत समजून घेतला, तेव्हा वैशालीला असे वाटू लागले, की मुलांच्या परीक्षा घेणे हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे. ती पुढील शैक्षणिक वर्षी जे काही करायचे, त्याचे डे टू डे नियोजन सुटीत करते. वैशालीकडे प्रेमळ स्वभाव हे शिक्षकी पेशासाठी लागणारे ‘भांडवल’ अंगभूत आहे. त्यासोबत तिने मुलांना स्वातंत्र्य दिले. मग खेळ, मस्ती, गाणी, गप्पागोष्टी... असे सुरू झाले. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या विषयात गती असते. मजूर आणि इंजिनीयर, दोघांचीही गरज समाजाला सारखीच असते. समाज दोघांच्या मेहनतीने पुढे जातो. मग एखाद्याच्या मेहनतीला ‘अ’ आणि दुसर्याचच्या मेहनतीला ‘क’ किंवा ‘ड’ ठरवण्याचा अधिकार कसा निर्माण झाला व तो दिला तरी गेला कसा? दोघे माणसेच; त्यांच्या जीवनेच्छा समान, मग एकाला मोबदला जास्त आणि दुसर्याकला कमी, हे कसे काय? वैशालीने मुलांना समजून घेत नाना प्रकारचे प्रयोग केले. तिने तिच्या वर्गातील मुलांच्या परीक्षेतील अंकात्मक गुणांकन पद्धत रद्द केली. मुलांसोबत परीक्षेचे पेपर सेट केले. मुलांना मोकळ्या वातावरणात, अगदी पुस्तकात पाहून उत्तरे सोडवण्याची सूट दिली. त्यातून मुलांची गुणवत्ता तर वाढलीच; सोबत त्यांची अभ्यासाची आवडही वाढली. इंग्रजीचा विशेष कोपरा मुलांकडून वर्गात तयार केला. त्या कोपऱ्यात गेले, की फक्त इंग्रजीमध्ये बोलायचे. वैशालीला तशा प्रयोगांमध्ये यश मिळत गेले. वर्ग पुढे जात होता तसा उत्साह वाढत गेला. त्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळाल्या असे वैशाली सांगते. 

वैशालीचे म्हणणे आहे, की निसर्गानेच माणसास जन्माला घातले आणि प्रत्येकाला अलौकिकत्व बहाल केले. त्याचे मूल्यमापन ‘उपरे’ लोक कसे काय करू शकतील? तिच्या मतानुसार, ‘मूल्यमापन म्हणजे किंमत ठरवणे. वैशालीचे मत पारंपरिक मूल्यमापनात व्यक्तीची ‘किंमत’ ठरवली जाते आणि तिला समाजाच्या बाजारात उभे करून विक्री केली जाते असे आहे. शिक्षणाने समाजात शांतता नांदावी, सुव्यवस्था यावी, पण तसे होत मात्र नाही. कारण शिक्षण बाहेरचे जग समजून घेण्यास कमी पडते. ‘शांततेसाठी शिक्षण’ हाच वैशालीच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे.

-mukhprusthaवैशालीने गावात प्रबोधन करण्याच्या हेतूने पहाटे पाच वाजता उठून ‘ग्रामगीते’वर बोलण्यास सुरुवात केली. ते पावणेदोन वर्षे चालले. गावातील नाले, रस्ते स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छ केले. गावात फिरते वाचनालय चालवले. महिलांचे मेळावे घेतले. ‘तान्हा पोळा’सारखे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केले. तशा कार्यक्रमांतून लोक एकत्र येऊ लागले. अशा वेळी त्यांना प्रबोधनाच्या चार गोष्टी सांगता येऊ लागल्या. तिचे काम शाळेत आणि समाजात, दोन्हीकडेही एकाच वेळी सुरू झाले. 

वैशाली तरल मनाची कवयित्री आहे. ती विविध नियतकालिकांतून लिहीत असते. मूल्यमापनातील तिच्या प्रयोगांचे पुस्तक ‘माझे प्रगतिपुस्तक’ या नावाने प्रकाशित झाले आहे. ती म्हणाली, की गुणपत्रिकेतून काय समजते? त्या अंकदर्शनातून काहीही हाती लागत नाही. म्हणून परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत स्वीकारण्यास हवी. शिक्षक मुलांचे मूल्यमापन जसे करत असते, तसेच मुले शिक्षकाचे, पालकांचे मूल्यमापन करत असतात. मी काम करत गेले, काहीतरी नवीन गवसत गेले, जे सापडले ते मुलांचा स्वतःवरील आणि शिक्षणावरील विश्वास वाढवणारे आहे. शिक्षक प्रयोगशील असेल तर शिक्षणदेखील प्रयोगशील राहते. शाळांचे मुख्य भांडवल म्हणजे शिक्षकांची सर्जनशीलता हेच होय हेच वैशाली ठासून सांगते.
वैशाली गेडाम 8408907701 gedam.vai@gmail.com 
- भाऊसाहेब चासकर 9881152455
bhauchaskar@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.