एका गाईच्या मदतीने तीस एकर शेती- सुभाष पाळेकर यांची ‘झिरो बजेट’ शेती


-heading-subhash-palekarमुख्य पिकांचा उत्पादन खर्च आंतरपिकांच्या उत्पन्नातून भरून काढणे आणि मुख्य पीक बोनस म्हणून घेणे म्हणजे ‘झिरो बजेट’ अशी सुभाष पाळेकर यांची सहज-सोपी संकल्पना आहे. ‘झिरो बजेट’ या त्यांच्या संकल्पनेत नैसर्गिक शेतीचा मंत्र दडलेला आहे. त्या शेतीत विकत काहीच घ्यावे लागत नाही. एका गायीपासून मिळणारे शेण  आणि मूत्र यांपासून तीस एकर शेती कसता येते असा सुभाष पाळेकर यांचा दावा आहे. जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चांगल्या प्रकारे वाढतात. त्यांच्यात अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत नाही. मात्र मनुष्य रासायनिक पद्धतीने शेती करतो, तेव्हा त्यात काही कमतरता, रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे का व्हावे? ‘मानवाने अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतीत रासायनिक घटकांचा वापर सुरू केला, पण त्यातून चक्र बिघडले. माती आणि इतर सर्व संसाधने यांच्याकडून अधिक ओरबाडून घेण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे निसर्गाचे शोषण वाढले.’ हे म्हणणे सुभाष पाळेकर यांचे आहे. 

सुभाष पाळेकर ‘झिरो बजेट’ नैसर्गिक शेतीचे तंत्र शिकवण्यासाठी देशभर फिरत असतात, ठिकठिकाणी शिबिरे घेतात. त्यांचे कार्य दक्षिणेकडील राज्यांमध्ये विशेष परिचयाचे आहे. सुभाष पाळेकर यांना 2017 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाले, तेव्हा ते आंध्र प्रदेशातील एका शिबिरात मार्गदर्शन करत होते. सहा हजार शेतकरी त्या शिबिरात होते. पाळेकर यांनी आठ वर्षांच्या संशोधनानंतर त्या तंत्राची सिद्धता केली आहे. ‘झिरो बजेट’ शेतीत ओलिताच्या शेतीत जेवढे पाणी लागते, त्यांच्या केवळ दहा टक्के पाणी आणि दहा टक्के वीज लागते. उत्पादन मात्र कमी येत नाही. शिवाय जे उत्पादन मिळेल ते पाळेकर यांच्या शब्दांत, विषमुक्त, पौष्टिक आणि उत्कृष्ट चवीचे!

पाळेकर तंत्राच्या नैसर्गिक शेतमालाला बाजारात मागणी आहे आणि त्याला दीडपट ते दुप्पट भाव मिळतो. त्या तंत्रातून जमीन सुपीक व समृद्ध बनते. नैसर्गिक शेती ‘ग्लोबल वॉर्मिग’ रोखण्यास मदत करते. हवेतील कार्बन काष्ट आच्छादनात अधिकाधिक प्रमाणात बंदिस्त करण्याची आणि प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून हवेतील कार्बन डायऑक्साइड जास्तीत जास्त बंदिस्त करण्याची किमया ‘झिरो बजेट’ शेती करते असे सुभाष पाळेकर सांगतात. शेती ही निसर्गाने वाढवलेली आहे. त्यात मानवाची भूमिका ही सहाय्यकाची आहे. मानव हा कृषितंत्राचा निर्माता नाही. गव्हाचा दाणा, ज्वारीचा दाणा कारखान्यात तयार होऊ शकत नाही. ते माणसाचे सामर्थ्य नाही. पीके किंवा फळझाडे ही सर्व अन्नद्रव्ये जमिनीतून घेतात. वास्तविक, कोणत्याही झाडाझुडपाचे शरीर 98.5 टक्के हवा, पाणी आणि सूर्यशक्ती यांपासून बनलेले असते.

-palekar-subhash-farmaer-pratyakshikरासायनिक शेतीत फवारल्या जाणाऱ्या विषारी कीटकनाशकांमुळे 2017 मध्ये एकावन्न शेतमजूर आणि शेतकरी मरण पावले; सातशेहून अधिक जणांना विषबाधा झाली. मग ती शेती सुरक्षित कशी करता येईल? त्याला काही पर्यायी मार्ग नाही का? सुभाष पाळेकर यांनी त्या प्रश्नांची उत्तरे शोधली आहेत व त्यांचाच प्रसार करत ते भारतभर फिरत असतात. त्यांचे चहाते व अनुयायी जसे हजारो आहोत तसे त्यांचे टिकाकारही त्यांच्यावर तुटून पडतात व त्यांचीही संख्या कमी नाही. त्यांना पाळेकर तंत्र हे थोतांड वाटते. धंद्याचे यश हे नियोजन व त्यावर होणारा खर्च म्हणजे बजेटवर अवलंबून असते. बजेट योग्य नसेल तर व्यवसाय डबघाईस येतो. ‘चार आण्याची कोंबडी व बारा आण्याचा मसाला’ या म्हणीप्रमाणे देशातील शेतीबाबत होत आहे. खर्चापेक्षा उत्पन्न कमी होत आहे.

पाळेकर अमरावती जिल्ह्यात बेलोरा या खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मले. त्यांनी कृषी विषयाची पदवी घेतली. त्यानंतर रासायनिक शेती 1972 ते 1982 या दरम्यान केली. उत्पादन सुरुवातीची तीन वर्षें चांगले मिळाले; पण नंतर, उत्पादनाचा आलेख खाली तर खर्चाचा वर जाऊ लागला. ते कृषीतज्ज्ञांना भेटले, परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. म्हणून ते स्वत: उत्तर शोधू लागले आणि त्यामधून लागला ‘झिरो बजेट’ शेतीचा शोध. 

हे ही लेख वाचा- 
‘झिरो बजेट’ शेती – शेण हे विरजण
बेलोरा गाव
राजुरी गावचे रोजचे उत्पन्न, वीस लाख !

पाळेकर सांगतात, “1988 ते 2000 हा काळ प्रयोगाचा होता. त्या प्रयोगांदरम्यान पत्नीने घर चालवण्यासाठी दागिने विकले. माझे नातेवाईक आणि मित्र दूर गेले. मी अघोषित बहिष्कारच अनुभवला. लोक मला ‘पागल’ म्हणायचे.” पण त्याच काळात पाळेकर यांना शेतीतील मर्म सापडले, ते म्हणजे ‘या जमिनीत आणि निसर्गात सगळे आहे!’ त्यांनी पारंपरिक बीज वापरून रोपे तयार करण्यावर भर दिला आणि त्यांनी रसायनविरहित कीटकनाशके विकसित केली.

झिरो बजेट शेतीची सूत्रे चार आहेत. ती म्हणजे बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वाफसा. शेतीतील संसाधनांचा शेतीसाठी वापर, हे त्यांच्या तंत्राचे मूळ आहे. ‘बीजामृता’चा वापर बियाण्यावर जमिनीतून येणाऱ्या कीड-रोग नियंत्रणासाठी केला जातो. ते ‘बीजामृत’ देशी गाईचे शेण, गोमूत्र, चुना किवा चुनखडी यांचा वापर करून तयार करतात. पाळेकर यांनी पिकांच्या वाढीसाठी ‘जीवामृत’ महत्त्वाचे असल्याचे सांगितले. गाईचे शेण, गोमूत्र आणि गूळाचा वापर करून ‘जीवामृत’ तयार केले जाते. तिसरे ‘आच्छादन’. पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस कठीण होत आहे, त्यामुळे ‘आच्छादन’ या बाबीचा पाळेकर यांनी शोध घेतला. ‘आच्छादना’मुळे ओलावा जास्त काळ टिकून राहतो, पाण्याची नव्वद टक्के बचत होते. तसेच, जमिनीत गांडूळांची संख्या वाढून जमीन सुपीक होण्यास मदत होते. ‘बीजामृत’, ‘जीवामृत’ आणि ‘आच्छादन’ यांचा फायदा होण्यासाठी जमिनीत ‘वाफसा’ असणे गरजेचे आहे. सुभाष पाळेकर यांनी सुरुवातीला त्यांच्या शेतीत प्रयोग करून पाहिले, त्यांच्या शेतातील एका गायीपासून त्यांनी तीस एकर शेती केली. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्यावरच त्यांनी त्या तंत्राचा देशभर प्रसार सुरू केला.

-subhash-palekar-padmashriत्यांना त्यांनी स्वतः प्रयोग केल्यामुळे ह्या विषयावर संपूर्ण माहिती आहे. त्यांनी पुस्तक, व्याख्याने आणि शिबिरे यांच्या माध्यमातून या ‘झिरो बजेट’ शेतीचा प्रसार चालवला आहे. देशात चाळीस लाख शेतकरी ‘झिरो बजेट’ शेती करतात असे ते सांगतात. कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ या राज्यांत ‘झिरो बजेट’ शेती करणारे शेतकरी जास्त आहेत. महाराष्ट्रात मात्र ‘पाळेकर तंत्र’ काहीसे उपेक्षित राहिले आहे याची थोडीशी खंत पाळेकरांना वाटते. ते सांगतात, की त्यांच्या वेबसाईटचा वापर करून अमेरिका, आफ्रिका या देशांतही काही शेतकरी पाळेकर तंत्राचा उपयोग करत आहेत.

- सुभाष पाळेकर 09850352745
palekarzerobudgetspiritualfarming
palekarsubhash@yahoo.com 

- नितेश शिंदे info@thinkmaharashtra.com 
(बीबीसी न्यूज, लोकसत्ता यांवरून संकलित)

लेखी अभिप्राय

I am interested to work in this field. in farming small scale and individual level. Then we will expand.

Mohan tadmare18/06/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.