शेणींचा करूड


-heading गावाकडील बाया दसरा झाला, की शेणाच्या गवऱ्या थापण्यास घेतात. गुरेढोरे शेतात बांधण्यासही त्या दिवसांत सुरुवात होते. काहीजण गुरांचे, गाई-म्हशींचे शेण काढताना गवऱ्यांसाठी शेण एका ठिकाणी गोळा करून ठेवतात. घरची बाई तेथे येऊन ऊन चटकायच्या आधी गवऱ्या थापण्यास लागते. फाल्गुन किंवा चैत्र महिन्यापर्यंत जमलेल्या गवऱ्यांसाठी करूड लिंपतात. लग्नतिथी पाहून करूड रचण्याचा मुहूर्त शोधतात. करूडाखाली लहानमोठ्या दगडांची व लाकडांची चळत अंथरतात. त्यावर गवऱ्या रचतात. आरंभी, पाच गवऱ्यांची पूजा हळदकुंकू टाकून केली जाते. पूजा करतेवेळी ज्वारीची आख्खी भाकर व गवऱ्यांवर उलटी वहाण (चामडी चप्पल) ठेवतात. रचलेल्या गवऱ्यांच्या ढिगाला शेणाने सगळीकडून लिंपून घेतात. करूड बरसात लागण्याच्या आत बारीकसे भोसके पाडून फोडावा लागतो. तो नाही फोडल्यास पाऊस लवकर पडत नाही अशी समजूत आहे. करूड पावसाच्या पाण्याने भिजू नये म्हणून त्याच्यावर इरले टाकतात. पूर्वी इरल्यासाठी एरंडाचा त्रिशंकू टोप तयार केला जात असे. त्यावर उसाची पाचट व पळाट्या उभ्या करत. त्याकरता रायमुनीच्या बंधाट्या वापरून ते बळकट बांधण्यासाठी केकट्याची हिरवी पाने चिरून बंध तयार करतात. त्यानंतर सोपटाचा उपयोग केला जात असे. त्यासाठी चिंचेच्या बारीक फांद्यांचासुद्धा उपयोग केला जातो. अलीकडे, तारांचाही वापर केला जातो. इरले तयार झाल्यावर चार-पाच गडीमाणसे उचलून ते करूडावर ठेवतात. दोन माणसे उचलू शकतील इतके ते वजनाने हलके नसते.

गावोगावी गुरेढोरे कमी झाली आहेत. त्यामुळे शेण दुर्मीळ होत आहे. शेतीकामासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. मकापिकाचे उत्पन्न वाढल्याने चुलीत जाळण्यास लेंढरे उपयोगात येऊ लागली आहेत. घरोघरी गॅसही पोचला आहे. तरीही गोवऱ्याच्या व सरपणाच्या आहारावर खमंग शेकलेल्या भाकरीची चव गॅसवरील भाकरीत नाही, त्यामुळे, गोवऱ्या व त्यांची साठवण यांबाबतच्या आठवणी येत राहतात. 

बुलडाण्यात ‘करूड’ला ‘कलवड’ असेही म्हणतात. त्यालाच धाराशिव-लातूर जिल्ह्यांत ‘उडवा’ किंवा ‘हुडवा’ म्हणतात. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात ‘यिरोळं’
म्हणतात. त्याला गोवरी/शेणकुटे असेही म्हणतात. मुले पूर्वी होळी आली, की ‘उडवा’ फोडायचे आणि गोवऱ्या पळवायचे. गोवऱ्याची राख मंजन, भांडी घासणे, लहान रोपांच्या बुडाला शितळाई राहवी म्हणूनही वापरतात.
तुकाराम महाराजांच्या अभंगात त्याचा उल्लेख आढळतो. 

आवा चालली पंढरपुरा 
वेशीपासून आली घरा 
मजहातीचा कलवडू 
मजवाचुणी नको फोडू !

- रमेश रावळकर 094030 67824  

rameshrawalkar@gmail.com
 
 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.