निवृत्त भूजल शास्त्रज्ञ झाला प्रयोगशील शेतकरी...

प्रतिनिधी 22/04/2019

-bhujal ओमप्रकाश गांधी भूजल शास्त्रज्ञ पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर ते त्यांच्या नागपूर येथील खेडी (रिठ) गावी शेतीत पूर्णवेळ रमले आहेत. गंमत म्हणजे, त्यांना शेती करण्यात खास रस नव्हता, म्हणून त्यांनी नोकरी करत असताना घरची सोळा एकर शेती विकून टाकली होती. परंतु ते म्हणाले, की मला निवृत्तीनंतर जमिनीची व्यापारी किंमत कळली. म्हणून मी पाच एकर शेतजमीन विकत घेतली. त्यात काळा तांदूळ, भाजीपाला अशी शेती केली. उत्पन्न चांगले मिळाले, तर त्यात रमून गेलो आहे. आता तीन वर्षें झाली. यंदा त्यांनी काळ्या तांदळाचा प्रयोग दहा गुंठ्यांत केला; शेती करारावर घेऊन त्यात भात व कापूस लावला आहे. भाजीपाला पिकांची मुख्य निवड, त्याचबरोबर फळबाग विकास यांवर त्यांचा भर आहे. त्यांनी मोसंबी, आंबा, सागवान यांचीही शेती सुरू केली आहे.

खेडी हे गाव नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यात त्या शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वसले आहे. त्यांचे राहणे तालुक्याच्या गावी आहे. तेथून तीन किलोमीटरवर त्यांची शेती येते. त्यांच्या घरी त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी आहेत. मुलगा सी.ए. करत आहे. ओमप्रकाश गांधी यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेत राज्यातील विविध ठिकाणी नोकरी केली, पण त्यांचा नोकरीतील अधिक काळ नागपूर, गडचिरोली या भागांतच गेला. ते 2017 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी पाच एकर शेती खरेदी केली. भाजीपाला पिकांना प्राधान्य दिले.

पीकपद्धतीचे नियोजन करताना गांधी यांनी सुरुवातीपासून प्रयोगशीलतेवर भर दिला. त्यांना डाळिंब शेती करायची होती. परंतु ती शेती खर्चीक असल्याचे लक्षात आले. शेतीतील अनुभव नसल्याने सल्लागार घेऊन काम करणेदेखील परवडणारे वाटत नव्हते. त्यांनी जवळच्या बाजारपेठा, पिकांचे दर आदींचा अभ्यास केला. त्यानंतर भाजीपाला पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला. भेंडी, ढेमसे, गवार, चवळी, टोमॅटो आदी प्रयोगांना सुरवात केली. जमीन मुरमाड असल्याने गादीवाफा पद्धतीचा व बारमाही भाजीपाला करताना ‘रोटेशन’ पद्धतीचा वापर केला आहे. दोन वर्षें वांगी लागवडीचा प्रयोग केला. परंतु किडींचा प्रादुर्भाव, वाढता उत्पादन खर्च, दर आदी मेळ न बसल्याने ते पीक घेण्याचे थांबवले.

•    उमरेड बाजारपेठ त्यांच्या शेतीजवळ असल्याने भाजीपाला शेती सोपी झाली. विक्रीमधील अडचणही दूर झाली.

•    पहिल्याच वर्षी प्रतिकिलोचा भेंडीला 20 ते 35 रुपयांप्रमाणे दर मिळाला. चवळी 15 ते 25 रुपये, गवारदेखील 35 ते 40  रुपये विकली गेली. त्यांना भाजीपाला पिकांनी समाधान मिळवून दिले.

त्यांनी कापूस, भात या पारंपरिक पिकांसाठी सुमारे नऊ एकर शेती करारावर घेतली आहे. धान काढणीनंतर तेथे गहू लागवड होते. तेथे त्यांनी कांदा, मुळादेखील लावला आहे.

गांधी यांनी ब्लॅक राईस अर्थात काळ्या तांदळाचा प्रयोग दहा गुंठ्यांत केला आहे. भारतात तो तांदूळ उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्ये होतो. त्यात आरोग्यदायी व पौष्टिक घटकांचा समावेश भरपूर असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गांधी यांनी दहा किलो बियाण्याची रोवणी केली. त्यातून सहा क्‍विंटल उत्पादन मिळाले. कृषी विभागाने छत्तीसगड भागातून त्या तांदळाचे वाण आणले असून ज्या शेतकऱ्यांना त्याच्या प्रयोगाचा लाभ देण्यात आला त्यांपैकी आपण एक असल्याचे गांधी यांनी अभिमानाने सांगितले.कृषी विभागानेच काळा तांदूळ बराच खरेदी केला. त्या तांदळात औषधी गुणधर्म चांगले असल्याने त्याला ग्राहकांकडून मागणी आहे. साहजिकच, किलोला 250 ते 300 रुपये दर मिळाल्याचे गांधी म्हणाले.

गांधी यांना कृषी विभागाकडून अनुदानावर पॅकहाउस मिळाले आहे. त्यात त्यांनी दोन टाक्या बांधल्या आहेत. ज्या वेळी भाजीपाल्याला दर चांगले नसतील त्या वेळी तो किमान चार दिवस त्या टाक्यांत सुस्थितीत राहू शकेल. टाक्यांमध्ये चारही बाजूंना वाळू भरण्यात आली आहे. त्यामध्ये पाणी सोडण्यात येते. त्यामुळे टाक्या थंड राहतात. त्यासाठी पाच लाख रुपये खर्च आला. त्यातील दोन लाख रुपये रक्कम अनुदानाने मिळाली. पाण्यासाठी परिसरात प्लॅस्‍टिक टँकही बसवण्यात आला आहे.

गांधी यांनी शेतीला जनावरांचे साह्य दिले आहे. त्यांच्याकडे दोन गायी, चार कालवडी, दोन बैल असे पशुधन आहे. ते घरची गरज भागवून उर्वरित दुधाची विक्री थेट व डेअरीलाही करतात.

गांधी यांनी पिकांची विविधता जपताना फळपिकांवरही भर दिला आहे. त्यांनी मोसंबीची तीनशे झाडे लावली आहेत. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतून त्यासाठी अनुदान मिळाले आहे. दीड वर्षांपूर्वी सीताफळाची पाचशे झाडे लावली. त्यातील चारशे जिवंत आहेत. त्यांनी आंबा, चिकू; तसेच, बांधावर सागवानाची पाचशे झाडेही लावून भविष्याची सोय केली आहे.

गांधी शेतीत लक्ष घालून ती करतात. तशा योजनेने पिके घेतात. सरकारी योजना समजावून घेतात व त्यांचे लाभ चतुराईने मिळवतात. काळा तांदूळ हा खूप पौष्टिक आहे. कृषी विभागाची 'आत्मा' नावाची संशोधन संस्था आहे. त्यांनी काळा तांदूळ पन्नास एकरांत लावण्याचा प्रयोग सतरा-अठरा गावांत केला. गांधी यांनी तो दहा गुंठ्यांत लावला. त्यांना तो खूप फायद्याचा वाटला. तो तांदूळ अडीचशे ते पाचशे रूपये किलो भावाने विकला जातो असे ते म्हणाले. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी त्यांच्याकडून काळा तांदूळ मागवला. काळा तांदूळ हे मूळ चीनचे उत्पादन. तेथून ते मणिपूर-गोहाटीमार्गे छत्तीसगडला आले. महाराष्ट्र सरकार त्याचे बियाणे छत्तीसगडमधून आणते. त्या तांदळाचे वैद्यकीय गुणधर्म उत्तम आहेत.
 

गांधी म्हणाले, की पाच एकरांत भात लावतो. आंतरपिक म्हणून भेंडी, चवळी, गवार, कार्ले या भाज्या घेतो. प्लॉटच्या काठाला आंबा, सीताफळ, मोसंबी, लावली आहेत. त्यात उत्पन्न हप्त्या हप्त्याने बरोबर येते. शेतकरी सोयाबीन, धान, कापूस या पलीकडील पिकांचा विचार करत नाहीत. मजुरीवर खर्च खूप होतो. त्याचीही योजना नीट करावी लागते. गांधी म्हणाले, की सरकारची शेतकऱ्याला अनुदाने फार आहेत. मी दोन वर्षांत पुढील पाच कारणांसाठी अनुदान मिळवले आहे. त्या म्हणजे ठिबक, मल्चिंग, पॅकहाऊस, स्प्रिंकलर व फळबाग. त्या गोष्टी केल्याही आहेत.

गांधी यांच्या शेतात एक बोअर वेल व एक विहीर आहे. विहिरीचे पाणी आटते. मग बोअरचे पाणी त्यात साठवले जाते. गांधी यांचा अनुभव आहे, की लक्ष देऊन शेती केली तर चार जणांचे कुटुंब तेवढ्या शेतीत सुखाने व आनंदाने जगू शकते.

संपर्क- ओमप्रकाश गांधी -7719069611

- विनोद इंगोले

(‘सकाळ अँग्रोवन’वरून उद्धृत, संपादित-संस्कारीत- विस्तारीत )

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.